हरमल: हरमल किनारी भागात पर्यटकांची रेलचेल बरीच वाढली असून समुद्रकिनारा रस्ता व तिठा भागात नेहमी होणारी कोंडी दूर करू,असे सांगून रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस व गृहरक्षक तैनात करण्याचा आदेश वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिला. (traffic problem near Harmal seashore in Goa)
गेल्या आठवड्यात दोन्ही ठिकाणी वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. त्यासंबंधी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन उपअधीक्षक शिरवईकर यांनी वाहतूक विभागाचे अधिकारी,पोलिसांसमवेत नुकतीच हरमल येथे पाहणी केली. या कृतीचे स्वागत करून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या समवेत पेडणे वाहतूक विभागाचे निरीक्षक वीरेंद्र वेळूस्कर, पोलिस सहाययक अधिकारी बोमी शेटकर,उदय शिरोडकर,हवालदार रमेश फडते तसेच सरपंच मनोहर केरकर, पंच प्रवीण वायंगणकर, स्वरूप नाईक, आदर्श नाईक व नागरिक उपस्थित होते. तिठा व मैदानानजीकच्या वळणावर सततची वाहतूक कोंडी मोठी समस्या व डोकेदुखी बनली असून तेथील व्यावसायिकांनी नेहमीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले होते. जोपर्यंत वाहतूक पोलिस नियंत्रक,होमगार्डची नियुक्ती होत नाही,तोपर्यंत वाहतूक समस्या सुटू शकत नाही, असे मत पंच प्रवीण वायंगणकर तसेच स्वरूप नाईक,आदर्श नाईक,प्रणव परब यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले.
जिथे बेशिस्त पार्किंग होते,तिथे संबंधितावर दंडात्मक कारवाई होऊ शकते,मात्र तुम्हीच कारवाई केल्याचा कांगावा करून अधिकाऱ्यांना जेरीस आणता. त्याऐवजी नियम पाळून वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन शिरवईकर यांनी केले.
कर्णकर्कश दुचाकींवर कारवाईची मागणी
अलीकडे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींची संख्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढली असून, रात्रीची निरव शांतता किंवा सकाळच्या वेळेत असे प्रकार दिसतात. संबंधित दुचाकीस्वारांवर कारवाई करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर स्थानिक रहिवाशांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.