Panji Traffic Issue: राजधानी पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत तसेच जी-20 च्या पूर्वतयारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे डांबरीकरण आणि इतर कामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे.
सहन करण्याचीदेखील एक सीमा असते. सरकार आता सर्वसामान्य जनतेच्या संयमाचा अंत पाहत असाच प्रश्न सध्या राजधानीची अवस्था पाहून विचारला जात आहे.
पणजीचा विकास होणे गरजेचेच आहे; परंतु त्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. राज्यात सुट्टीच्या दिवशी तसेच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात काम होणे अपेक्षित आहे. राज्यातील जनता आपल्या विविध कामांसाठी पणजीत येते.
हजारो वाहनांच्या कोंडीमुळे पणजी गुदमरत आहे. मात्र, शासनाला याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष
स्मार्ट सिटीच्या या अनागोंदी कारभाराकडे स्थानिक राजकीय नेत्यांनी डोळझाक केलीच आहे; परंतु स्मार्ट सिटी प्रकल्प ज्यांच्या अखत्यारित येतो त्या जिल्हाधिकारीदेखील कोणतीच पावले उचलताना दिसत नाही.
त्याप्रमाणेच मुख्यमंत्रीदेखील या स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याची जनमानसात भावना असून या सर्व प्रकरणांबाबत जनता आक्रोश व्यक्त करत आहे.
पुलांवरील डांबरीकरणाचा परिणाम
काल गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने तसेच वर्दळ कमी असल्याने डांबरीकरणाचे काम करायाला हवे होते; परंतु काल डांबरीकरणाचे काम बंद होते. एकंदरीत जनतेच्या पिळवणुकीसाठीच ही कामे जाणीवपूर्वक वाहनांच्या वर्दळीच्या दिवशी करण्यात येत असल्याचे दिसून येते.
नव्या पाटो पुलावर डांबरीकरण सुरू आहे, तसेच अटल सेतूवरदेखील दोन्ही बाजूंना डांबरीकरण सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अटल सेतू, दिवजा सर्कल, मांडवी पूल, पर्वरी सिग्नल आदी सर्वच ढिकाणी भर दुपारी उन्हाच्या झळा सहन करत तासन्तास वाहतूक कोंडीत नागरिक अडकून पडल्याने संताप व्यक्त करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.