Bengaluru Tourist Death At Baina Beach Goa Water Sports
पणजी : बायणा समुद्रकिनाऱ्यावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूतून आलेल्या एका पर्यटकाचा जलक्रीडेनंतर परतत असताना मृत्यू झाला. संजय श्रीनिवास असे या पर्यटकाचे नाव असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी गोवा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर जलक्रीडा आणि सुरक्षितता याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. देशविदेशातील पर्यटक गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करतात. बंगळुरूत राहणारे संजय श्रीनिवास (वय ३२) हे पत्नी, मुलांसह गोव्यात आले होते. रविवारी श्रीनिवास यांचे कुटुंबीय जलक्रीडेसाठी बायणा समुद्रकिनाऱ्यावर आले. पॅराग्लायडिंगनंतर श्रीनिवास कुटुंब स्कुबा डायव्हिंगसाठी गेले. तिथून परतत असतानाच बोटीवर संजय यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही मिनिटांमध्येच ते भोवळे येऊन कोसळले.
बोटीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने किनाऱ्यावर आणले. स्थानिकांच्या मदतीने संजय यांना किनाऱ्यापासून जवळ असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बायणा समुद्रकिनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. 23 वर्षीय विशाल नाईक हा किनाऱ्यावरील जलक्रीडा करणाऱ्या एका नौकेवर कामाला होता.
हार्बर कोस्टल पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास पर्यटकांना तो आपल्या नौकेत घेऊन समुद्रात गेला होता. त्यानंतर तो समुद्रात अंघोळीसाठी उतरला. खोल समुद्रात असलेल्या एका बेटाजवळ तो अंघोळ करत होता. बराच वेळ तो दिसला नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा शोध सुरु केला असता काही अंतरावर तो तरंगताना दिसला. त्यानंतर त्वरितच त्याला चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.