
उत्तर गोव्यात पर्यटकांशी अप्रिय घटना घडल्यावर दक्षिण गोव्यात तशा घटना घडू नयेत म्हणून पोलिस अधिकाऱ्यांनी पावले उचलताना शॅकमालकांची एक बैठक बोलावून त्यासंदर्भात म्हणे चर्चा केली आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित अनेकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. दक्षिणेत पूर्वी अशा घटना घडत होत्या. त्यातूनच तर दक्षिणेतील पर्यटकांचा ओघ म्हणे घटला आहे असेही सांगितले जाते. पण मुद्याची बाब म्हणजे आता पाहुणे म्हणून आलेले पर्यटकच गोव्यात अप्रिय घटना करत असल्याचे रोजच पाहायला मिळते. विशेषतः उत्तर गोव्यात अशा घटना रोजच्याच झाल्या आहेत. दक्षिणेत तसे होऊ लागले, तर काय करावयाचे याचे धडेही पोलिस व अन्य सरकारी यंत्रणांना दिले तर उत्तम होईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ‘रेंट अ कार’ वा ‘बाईक’ घेऊन जास्त करून पाळोळेकडे जाणारे पर्यटक ज्या पध्दतीने वाहने दामटतात त्याकडे पोलिस यंत्रणा दुर्लक्ष करते. त्यामुळे अपघात होतात यासाठी शॅकवाल्यांपेक्षा दक्षिणेत पोलिस व अन्य यंत्रणांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सुट्टीच्या दिवशी अशी वाहने घेऊन पळणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्याची खरी गरज असल्याचे सांगितले जाते. ∙∙∙
हरमल किनाऱ्यावरील त्या शॅकचा परवाना अखेर पर्यटन खात्याने रद्द केला आहे. कायद्याने शॅक दुसऱ्याला भाड्याने देण्यावर कायद्याने बंदी असून त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी मूळ शॅक परवानेधारकाला पंचवीस लाखांचा दंडही ठोठावला गेला आहे. आता परवाना रद्द केल्यानंतर संबंधिताकडून खाते तो दंड वसूल कसा करणार हा मुद्दा निराळा आहे. असे सांगतात की पर्यटन व्यवसायातील हे गैरप्रकार आजकालचे नाहीत तर गोव्यात हा उद्योग मूळ धरू लागल्यापासूनचे आहेत. फरक एवढाच की पूर्वी ते दक्षिण गोव्यात होत होते व आता ते मोपामुळे उत्तरेकडे सरकले आहेत. खोणताही उद्योग असो वा व्यवसाय असो तो स्थानिकांच्या नावांवरच असतो. पण तो हाताळतात ते परप्रांतीय. शॅकचेच उदाहरण घेतले तर निम्म्याहून अधिक शॅक परप्रांतीयांच्या ताब्यात असल्याची कबुली खुद्द गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्षच देतात. एवढेच नव्हे तर सरकारला हवे असल्यास अशा शॅकची यादी सादर करण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यावर सरकारचे काय म्हणणे आहे, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. ∙∙∙
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ज्योएल आंद्रादे हे सध्या कुठे आहेत माहीत नाही. सध्या युवक काँग्रेसचे नेतृत्व कार्याध्यक्षांनाच करावे लागत आहे. मागील काही पत्रकार परिषदा असो की शुक्रवारी आझाद मैदानावर करण्यात आलेली निदर्शने असोत, तेथे कार्याध्यक्षांनाच पुढाकार घ्यावा लागला. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पणजीचे नगरसेवक ज्योएल आंद्रादे हे कुठेच नजरेस पडत नाहीत. विशेष बाब म्हणजे नावाला पद घेऊन ते बसलेत असाच त्यांचा पक्षातील वावर आहे. त्यामुळे त्यांची झालेल्या निवडीवर पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांतूनच आता प्रश्न उपस्थित होताहेत. एका बाजूला प्रदेश युवक काँग्रेसची ही स्थिती, तर दुसऱ्या बाजूला बिना नाईक यांनी महिला काँग्रेसचे अध्यक्षपद सोडून बरेच दिवस झाले, तरी अद्याप त्यांच्या जागी कोणाची निवड झालेली नाही अशी स्थिती आहे. चाळीसही मतदारसंघात पक्ष मजबूत करण्यास निघालेले प्रदेशाध्यक्ष अगोदर या पदावर खमके नेतृत्व उभे करतील काय? असा सवाल विचारला तर गैर वाटायला नको. ∙∙∙
पाणीबाणीमुळे बार्देश तालुक्याचे प्रचंड हाल झाले. पर्वरीत तर रेशनिंग सुरू करावे लागले. वास्तविक पाण्याचे टँकर पाठवण्याचे काम बांधकाम खात्याच्या कर्मचारी अभियंत्यांचे. त्यांच्याकडे तक्रारी आल्यावर ते टँकर पाठवायचे काम करणार, परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ती जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्यांच्या खासगी सचिवाला लोकांना फोन करावे लागले. याचे कारण संपूर्ण पर्वरीला टँकर पाठवावे लागले असते, तर त्यांना १५-२० टँकर लागले असते, परंतु बांधकाम खात्याकडे आहेत केवळ ९ टँकर. त्यामुळे मंत्र्यांना स्वतः नियोजन करावे लागते व अगदी टोकाला राहणाऱ्या लोकांची सर्वप्रथम सोय करावी लागली. या काळात खासगी टँकरवाल्यांची चंगळ झाली. त्यांनी टँकरमागे तीन हजार रुपये आकारले. दुर्दैवाने लोकांच्या घरच्या टाक्या एक हजार लीटरच्या असतात, तर टँकरची क्षमता असते आठ हजार लीटर. मग लोकांनी समाज माध्यमांवर पुकारा करून टँकरचे पाणी वाटून घेण्याची व्यवस्था केली. म्हापशात काही ठिकाणी पाणी सुरू झाले, परंतु ते केवळ २० मिनिटेच आले. पुढचे चार दिवस ही परिस्थिती अशीच राहणार आहे. अनेकांनी ‘गोमन्तक’ला फोन करून आमच्या पाणीबाणीच्या वार्तांकनाचे कौतुक केले. आमचा शुक्रवारचा अग्रलेख बार्देशमध्ये प्रामुख्याने पर्वरीत लोक एकमेकांना पाठवत होते. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे विशेषतः मानवनिर्मित टंचाईमुळे लोक सरकारला दोष देत होते. प्रशासन कोलमडले असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र येऊ लागली. ∙∙∙
राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांचा ५७ वा वाढदिवस शुक्रवारी थाटात साजरा झाला. पक्षाचे कार्यकर्ते सांगतात, दुपारपर्यंत दोन हजारवर लोक उपस्थिती लावून गेले. संध्याकाळपर्यंत आणखी दुप्पट तिप्पट लोक येऊन गेले. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला हा नेता. ते सामान्य कार्यकर्त्यांचे घरगुती समारंभही चुकवत नसत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पद नाही, तेव्हा बाजूला पडतील अशी अटकळ काहींनी बांधली होती, पण तसे घडले नाही. ते आता भाजपाचे गोव्यातील ‘लाडके’ नेते बनल्याचे शुक्रवारी शिक्कामोर्तबच झाले. गेल्या वर्षी राज्यसभेत असल्याने ते वाढदिनी गोव्यात येऊ शकले नव्हते, परंतु यंदा पहिल्या दिवशी त्यांनी संसदेतून रजा घेतली, पण अर्थसंकल्प असल्याने ते पहाटेच्या विमानाने संसदेत परततील. तानावडेंनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मोठा लोकसंग्रह गोळा केला. ∙∙∙
उत्तर गोव्यात निर्माण झालेली ‘पाणीबाणी’ ही मानवनिर्मित होती, हे आता जाहीर झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे तोंडी आश्वासन चालणार नाही, ते प्रत्यक्ष कृती कधी करतील, याकडे लोकांचे लक्ष आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत तरी कोणाविरोधात कारवाई झाली नव्हती. जलस्रोत खात्याचे प्रमुख बदामी यांना सरकारने चारवेळा मुदतवाढ दिली आहे. या चारवेळच्या मुदतवाढीत त्यांनी काय दिवे लावले, याचा आढावा सरकारने कधी घेतलेला नाही. खात्यात आणखी काही लायक अधिकारी नाहीत काय? २०२३ मध्ये ते निवृत्त होणार होते, त्यानंतर दर सहा महिन्यांच्या अंतराने चारवेळा त्यांना मुदत वाढवून देण्यात आली. मुख्यमंत्री तिळारी प्रकल्पाच्या कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करायला गेले होते. आमठाणे तलाव संपूर्ण भरलेला त्यांना दाखवण्यात आला. तेवढेच! पाण्याची गेट उघडत नाही हे त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले! तेथे उपस्थित असलेल्या अभियंत्यांना ही गोष्ट माहीत होती! परवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडेही मुख्यमंत्र्यांना ती गोष्ट मान्य करावी लागली की, गेट उघडत नाही, हे त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. सरकारचीही ही नामुष्की आहे! पर्रीकर असते तर किमान तीन अभियंत्यांना त्यांनी घरी पाठवले असते! ∙∙∙
किनारपट्टीवर वाहने चालवण्यास तसेच फेरीवाल्यांना विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यावर नजर ठेवण्यासाठी पर्यटन पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पर्यटक हे ‘अतिथी देवो भव’ असे संबोधले जाते. मात्र, हेच पर्यटक कायद्याचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सरकार का पावले उचलत नाही असा प्रश्न स्थानिक करत आहेत. पर्यटक गोव्यात ‘सब कुछ चलता है’ अशा आविर्भावात वावरत असतात. सरकारने अशा पर्यटकांना वठणीवर आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल असे गृहीत धरून पर्यटकांना डोक्यावर बसवून घेणे कितपत योग्य आहे? ∙∙∙
सदानंद तानावडे यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जी कमाई केली, ती दामू नाईक करून दाखवतील काय अशी चर्चा तानावडेंच्या घरासमोरील मंडपात काल चालली होती. तानावडेंच्या कारकिर्दीत पक्षश्रेष्ठींना गोव्यात संघटन मंत्रिपद नेमावे लागले नाही. सतीश धोंड गोव्यातून गेल्यापासून हे पद भरलेले नाही. अध्यक्षांना कारभार पेलवत नाही, असे दिसताच संघाच्या मुशीतील एक आक्रमक नेता गोव्यात पाठवला जातो, परंतु तानावडेंनी संघटना योग्य पद्धतीने बांधून काढली व कोणताही प्रश्न हाताबाहेर जाऊ दिला नाही. पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्षांना स्वस्त बसू देत नाहीत. इतके की शनिवार-रविवारही घरी बसू देत नाहीत. त्यामुळे कुटुंबाला अजिबात वेळ देता येत नाही. दामूंना हा ‘ताप’ मानवतो की नाही, ते सहा महिन्यांत कळून येईल असे पक्षाचे जुनेजाणते नेते सांगतात. दामूंचे एक वैशिष्ट्य आहे ते भंडारी समाज. गावागावांत हा समाज विखुरला असल्याने तेथे सर्वत्र दामूंचे चांगले स्वागत होईल, ही त्यांची निश्चितच जमेची बाजू आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.