G20 Summit Goa 2023:राज्यात उद्यापासून जी-20 च्या पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीसह पर्यटन कार्यगटाची शेवटची बैठक होत आहे.
चार दिवस चालणाऱ्या या बैठकीत 20 देशांचे 150 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती पर्यटन सचिव डॉ. व्ही. विद्यावती यांनी दिली.
यावेळी साहाय्यक सचिव राकेश वर्मा, राधा कटियाल, गोव्याचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज उपस्थित होते.
सचिव विद्यावती म्हणाल्या, पर्यटन कार्यगटाच्या बैठकीच्या मुख्य कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रूझ टुरिझम, ग्लोबल टुरिझम प्लॅस्टिक इनिशिएटिव्ह आणि सार्वजनिक खासगी क्षेत्रांच्या महत्त्वाच्या उपक्रमांसंदर्भात देखील पर्यटन मंत्रालयाकडून उप-कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये जी-२० सदस्य देश, केंद्र सरकारची मंत्रालये, विविध राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा सहभाग आहे.
राकेश वर्मा म्हणाले, पर्यटन क्षेत्रातील विविध भागांची आर्थिक वृद्धी बळकट करणे, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे गोव्यामध्ये होत असलेल्या जी-२० पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे उद्दिष्ट आहे.
शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यटनाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून भारताच्या जी-२० अध्यक्षतेचा चिरंतन वारसा निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्रालय वचनबद्ध आहे.
क्रूझ पर्यटनाला चालना देणाऱ्या धोरणावर लक्ष केंद्रित करून १९ जून रोजी ‘टिकाऊ आणि जबाबदार प्रवासासाठी क्रूझ एक मॉडेल बनवणे’ या विषयावर एका उप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जी-२० सदस्य देश, निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग क्षेत्रातील हितधारक सहभागी होतील. या कार्यक्रमात जागतिक स्तरावर क्रूझ पर्यटनाच्या विस्तारामधील आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली जाईल.
भारतातील क्रूझ पर्यटनावर भर
मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त राष्ट्रीय पातळीवरील इतरही कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात ‘भारताला क्रूझ पर्यटनाचे केंद्र बनवण्यावर’ लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात शाश्वत विकासाच्या तत्त्वांचे पालन करत भारतात क्रूझ पर्यटन विकसित करण्यात असलेली आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली जाणार आहे.
क्रूझ पर्यटनाचे विविध पैलू, (किनारी, बेटांवरील, प्रादेशिक आणि योटिंग पर्यटन) किनारी राज्यांचे दृष्टिकोन, आंतरदेशीय जलमार्ग व्यवस्थेत खासगी आणि सार्वजनिक भागीदार, नदी असलेल्या राज्यांचा दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या कार्यक्रमात भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात, महत्त्वाची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, उद्योग क्षेत्रातील हितसंबंधी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
संवाद सत्राचेही आयोजन
जी-20 अर्थव्यवस्थांसाठी प्रवास आणि पर्यटनाचे महत्त्व या विषयावर संवाद सत्र होणार आहे. 21 जून रोजी गोवा सरकारच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याने जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषद व संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्था (युएनडब्ल्यूटीओ) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या संवादाद्वारे दोन्ही क्षेत्रांना आपापल्या चिंता आणि प्राधान्यक्रमे मांडता येतील. तसेच अधिक व्यापक खासगी-सार्वजनिक भागीदारीसाठी परस्पर सहकार्याच्या संधीही शोधता येतील. 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’च्या निमित्ताने एका विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.