
पणजी: पावसाळी अधिवेशनात राज्यातील पर्यटनच्या स्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार मायकल लोबो यांनी गेल्या पाच वर्षांपासून गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटल्याचा दावा करत सरकारला घरचा आहेर दिला.
२०२० मधील पर्यटनाची आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. याचे कारण कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध होते. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने घटत आहे, असे आमदार मायकल लोबो म्हणाले.
"पर्यटन व्यवसायातील प्रश्नांवर कुणीही तोडगा काढत नाही, आम्ही इथे फक्त भाषणांसाठी येतोय," असा घरचा आहेर लोबोंनी सरकारला दिला.
अनेक परराज्यातील लोकांचे गोवा हे 'सेकंड होम' आहे. ते गोव्यात आल्यानंतर आपल्या घरातच राहतात, त्यामुळे त्यांचा डेटा सरकारकडे उपलब्ध होत नाही. तसेच, पर्यटन काळात गोव्याबाहेर राहणारे गोमंतकीय गोव्यात आल्यावर त्यांनाही पर्यटक मानले जात असल्याने आकडे फुगवले जातात. प्रत्यक्षात राज्यात येणारे पर्यटक घटले आहेत, असे लोबो यांनी सांगितले. युरोपीय देशांतील पर्यटकांना 'व्हिसा ऑन अरायव्हल' सुविधा दिल्यास गोव्याच्या पर्यटनासाठी तो गेम चेंजर ठरू शकतो, असा दावा मायकल लोबो यांनी केला.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आमदार लोबो यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. पर्यटकांची संख्या कमी झाली नसून, उलट ती वाढत आहे. "आम्ही केरळपेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे पर्यटन क्षेत्रात सुधारणा केली आहे," असे खंवटे म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध उपक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळत असून, गोव्याला येणारी विमाने पर्यटकांनी भरलेली असतात, असा दावाही त्यांनी केला.
मंत्री खंवटे यांनी पर्यटन घटल्याचा दावा करणाऱ्यांना थेट आव्हान देत, "पर्यटनात घट झाली असेल, तर पुरावा दाखवा!" असे ते म्हणाले. त्यांच्याकडे पर्यटनाच्या वाढीचे अधिकृत आकडेवारी उपलब्ध असल्याचा दावाही मंत्री खंवटे यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.