Goa Politics: खरी कुजबुज; गप्‍प बसतील तर ते गोविंद कसले?

Khari Kujbuj Political Satire: अभिनेते शरद पोंक्षे म्हणजे सडेतोड बोलणारे म्हणून ओळखले जातात. व्याख्यान देण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून बोलावले जाते.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

गप्‍प बसतील तर ते गोविंद कसले?

मंत्रिमंडळात असताना विविध कारणांमुळे नेहमी वादात राहिल्‍याने आणि मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडील आदिवासी कल्‍याण खात्‍याच्‍या कारभारावर जाहीर टीका केल्‍याने गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. इतका मोठा धक्‍का बसल्‍यानंतर गावडे शांत बसतील असे सर्वांना वाटत होते, पण आता त्‍यांनी ‘उटा’च्‍या महत्त्‍वाच्‍या नेत्‍यांना सोबत घेऊन ‘उटा’ला समांतर अशी ‘उटा–जीव्‍हीके’ नावाची संघटना सुरू केली आहे. यावरून मूळ ‘उटा’तील इतर संघटना आक्रमक झाल्‍याने गोविंद पुन्‍हा एकदा वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहेत. ∙∙∙

पोंक्षे तुम्हीसुद्धा?

अभिनेते शरद पोंक्षे म्हणजे सडेतोड बोलणारे म्हणून ओळखले जातात. व्याख्यान देण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून बोलावले जाते. कला अकादमीविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याने पोंक्षे कोणाची भीडभाड ठेवणारे नाहीत अशी प्रतिमा निर्माण झाली. व्याख्यान देण्यासाठी व्यासपीठावरून ते रोखठोक भूमिका मांडतात. रविवारी पणजीतील कार्यक्रमात पोंक्षे यांनी रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे यापूर्वी कला अकादमीवरून तत्कालीन मंत्री गोविंद गावडे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवर ते भाषणात काही बोलणार नाहीत, हे स्पष्ट होते. पालक आणि मुले हा व्याख्यानाचा विषय असल्याने त्यांनी त्याच अनुषंगाने भाषण केले. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्याकडून गोविंद गावडेंच्या टीकेवर, तसेच भाषणात धर्मांतरणावर बोलल्यामुळे देशभर गाजत असलेल्या छांगुर बाबाच्या धर्मांतरणाच्या प्रकरणावर आणि मुलांच्या नुकत्याच बदललेल्या शिक्षण पद्धतीवर म्हणजेच एनईपीवर ते बोलतील असे वाटले होते, पण त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे नाकारले. पत्रकारांकडे बोलणे नको, म्हणून तेथून पाय काढता घेतला. त्यामुळे राजकारणी किंवा अभिनेते प्रसारमाध्यमांना कधी जवळ घ्यायचे आणि कधी दूर ठेवायचे हे जाणतात, त्याचाच हा एक प्रत्यय. ∙∙∙

‘रेंट अ कार’ - ‘बाईक’चा मुद्दा

गोव्यात सरकारने नव्याने ‘रेंट अ कार’ची नोंदणी केली जाणार नाही असे जरी जाहीर केलेले असले तरी नोंद झालेली अशी वाहने व पर्यटकांना भाड्याने दिलेली खासगी वाहने निरपराध लोकांचा काळ ठरताना दिसत आहेत. गोवा फॅारवर्डवाल्यांनी तर अशा वाहनांमुळे नेमकी कोणाच्या घरावर सोन्याची कौले चढली आहेत त्याकडे निर्देश केला आहे, पण धुवाधार पाऊस कोसळत असलेल्या दिवसात अशी वाहने घेऊन गोव्यातील रस्त्यांची कसलीच जाणीव नसलेले पर्यटक ज्याप्रकारे भरधाव वाहने हाकताना दिसतात ते पाहिले तर इतरांचा थरकाप उडतो. काहीजण तर बरोबरच्या महिलेच्या हाती कार वा बाईक देत असतात व त्यामुळे जे काय घडते त्याचे प्रत्यंतर काणकोण वा पाळोळे रस्त्यावर येते. मजेची बाब म्हणजे हल्ली पोलिस गस्त नसते व त्यामुळे या लोकांना रान मोकळे मिळते. त्यांच्या या ड्रायव्हिंगमुळे अन्य वाहनचालकांची तारांबळ उडते अशा तक्रारी वाढत आहेत.∙∙∙

‘जेट पॅचर’चे काम संपले का?

युवा उद्योजक व मडगावात उमेदवारी मिळावी म्हणून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले चिराग नायक यांनी काही दिवसांपूर्वी मडगावातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम सुरू केला. ही केवळ सुरवात आहे, जर १५ जुलैपर्यंत मडगावातील सर्व खड्डे बुजविण्यात प्रशासनाला यश आले नाही, तर स्वखर्चाने खड्डे बुजविण्याची तयारी त्यांनी दर्शवली आणि बरोबर १४ जुलै रोजी ‘जेट पॅचर’ मडगावात अवतरला. एक खड्डा बुजविण्यास सात ते आठ हजार रुपये शुल्क या यंत्राचे मालक घेतात. त्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत काही खड्डे बुजविण्यात आले व त्यानंतर हा ‘जेट पॅचर’ कुठे दिसेनासाच झाला. हा ‘जेट पॅचर’ पाऊस पडत असताना काम करू शकत नाही. पावसात केलेले काम निकामी ठरते, पण १४ जुलै रोजी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस अजूनही अधूनमधून पडत आहे. त्यामुळे या ‘जेट पॅचर’ला अनलक्की म्हणायचे का? ∙∙∙

सुशोभीकरणाचे वाढते प्रस्थ

सरकार डबल इंजिनामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे सांगत आहे. मात्र, यंदा पावसाळ्यात सगळीकडे लोकांची सुविधांअभावी जी दुर्दशा व गैरसोय झाली त्यामुळे हा कसला विकास असा सवाल जो तो करताना दिसतो. तर मुख्य मुद्दा सरकार व त्याच्या यंत्रणांकडून जे सुशोभिकरणाचे वाढते फॅड तयार झाले आहे त्याचा आहे. विविध शहरांतच नव्हे, तर गावांतही सुशोभीकरणाच्या नावाने लाखोंचा निधी खर्च केला आहे. त्याशिवाय आमदार तसेच जिल्हा पंचायत निधींतूनही सार्वजनिक ठिकाणी व देवस्थानांच्या जागेतही सुशोभीकरण केले जाते. गोव्यातील देवळे व अन्य धार्मिक संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, मग त्यांच्या जागा सरकारी निधीतून सुशोभित का कराव्यात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. केवळ देवालयेच नव्हे, तर चर्चेस व मशिदींचेही सुशोभीकरण सरकारी निधींतून कशाला हा मुद्दा तसा पटण्याजोगा आहे खरा, नाही का रे भाऊ.∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातली भुताटकी

फोंडा कलामंदिरात बत्ती गूल, मीटर चालू!

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. कलामंदिरातील अव्यवस्था, ठिकठिकाणी लागलेली गळती, गेली साडेतीन वर्षे संचालक मंडळाचा पत्ताच नाही, अशा अनेक कारणावरून राजीव गांधी कलामंदिराची वास्तू चर्चेचा विषय बनली आहे. मागच्या काळात पणजीतील कला अकादमीत नाटक सुरू असताना अचानक वीज गेली होती, नेमकी तीच स्थिती फोंड्यातही उद्भवली. कलामंदिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक बत्ती गूल झाली, जी तब्बल पाऊणतासाने पूर्ववत झाली. मध्यंतरीच्या काळात आयोजकांनी सावरून धरले, पण याला जबाबदार कोण, हा खरा प्रश्‍न आहे. मात्र, ‘बत्ती गूल आणि मीटर चालू’ हा विषय फोंड्यात चर्चेचा ठरला होता.∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: काँग्रेस,‘आप’मधील दरी वाढणार! निरीक्षकांचा अंदाज; ‘झेडपी’त दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

‘अमित’ गेले कुठे?

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात आपल्‍या पक्षाचे आमदार कोणत्‍या प्रश्‍नांवर भर देतील, लोकांच्‍या समस्‍या कशा पद्धतीने मांडतील, सरकारला कशारीतीने धारेवर धरतील याचा ऊहापोह करण्‍यासाठी याआधी काँग्रेस, आपचे प्रदेशाध्‍यक्ष अधिवेशन सुरू होण्‍याआधी पत्रकार परिषद घ्‍यायचे. यंदाच्‍या पावसाळी अधिवेशनात मात्र काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर तसेच आपचे राज्‍य संयोजक अमित पालेकर यांनी तशाप्रकारची पत्रकार परिषद घेण्‍याची तसदी अजिबात घेतली नाही. सगळे जबाबदार आमदारांवर सोपवून दोन्‍ही अमित नेमके गेले कुठे? असा प्रश्‍न जनता विचारत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com