Bardez Water Crisis: बार्देशवासीय अजून 'टँकर'वरतीच अवलंबून! जलसंपदामंत्री, मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी

Goa Water Shortage: गेले आठवडाभर मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जाणारा बार्देश तालुका किमान मंगळवारपर्यंत तहानलेलाच असणार आहे.
Tillari Canal Repair Work
Tillari Canal Repair Work InspectionDainik Gomantak
Published on
Updated on

Water Supply Problem In Bardez Porvorim Goa

पणजी: गेले आठवडाभर मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जाणारा बार्देश तालुका किमान मंगळवारपर्यंत तहानलेलाच असणार आहे. तिळारीतून पाणी मिळेपर्यंत पर्वरी येथील १५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प बंदच राहणार आहे. आमठाणे धरणातून पर्वरीत प्रकल्पात पाणी आणण्याची व्यवस्था नसल्याने पर्वरी तहानलेलीच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

तिळारीच्या कालव्याला १० मीटर लांब आणि तीन मीटर रुंद पडलेले भगदाड बुजविण्यात आले आहे. कालव्याखाली असलेला पाईप खचल्याने हे भगदाड पडले होते. तेथील जुना पाईप काढून त्याखाली कॉंक्रिट घालण्यात आले. त्यावर पाईप बसविल्यानंतर त्यावर पुन्हा कॉंक्रिट घालण्यात आले. आता शंभर ट्रक भराव घालण्याचे काम आज हाती घेण्यात आले. ते निम्मे पूर्ण झाले आहे. उद्या (ता.१) दुपारपर्यंत भरावाचे काम पूर्ण केले जाणार आहे.

जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी आज दुपारी मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्यासह कुडासेचीधनगरवाडी गाठली आणि भगदाड पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यांनी येथे घालण्यात येणाऱ्या भरावावर कॉंक्रिटही घालण्याची सूचना केली. त्यांनी नंतर तिळारी धरणालाही भेट दिली. तेथे महाराष्ट्राचे जलसंपदा कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. शिरोडकर यांनी अचानकपणे आज हा दौरा निश्चित केला. सर्वोच्च न्यायालयात म्हादईविषयी सुनावणी होण्याची शक्यता असल्याने काल मुख्य अभियंता प्रमोद बदामी दिल्लीत होते. कालच रात्री उशिरा ते राज्यात परत आले. त्यानंतर आज दुपारी त्यांना महाराष्ट्रात मंत्र्यांसोबत जावे लागले.

आमठाणेचे पाणी पर्वरीत आणणे अशक्य

मंगळवारी तिळारी कालव्यातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी आज ‘गोमन्तक’ला दिली. साबांखाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी सांगितले, की आमठाणे धरणातून पर्वरी प्रकल्पात पाणी आणण्याची थेट सोय नाही. तिळारीचे पाणी पर्वरीच्या १५ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्‍पात थेट आणण्याची सोय आहे. तिळारीचे पाणी मिळेपर्यंत पर्वरीचा प्रकल्प सुरू करता येणार नाही.

सोमवारपर्यंत कार्यपूर्ततेचे लक्ष्य

जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी केलेल्या सूचनेनुसार त्या भरावावर कॉंक्रिट घालण्यात येणार आहे. त्यानंतर भरावावर फिल्म बसविण्यात येणार आहे. हे काम सोमवारी रात्रीपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याने ठेवले आहे. या नियोजनानुसार काम झाले तर तिळारी जलसिंचन प्रकल्पातून गोव्यात पाणी येऊ शकेल.

पर्वरीच्या दिमतीला आठ टँकर

पर्वरीत सगळ्यांना किमान पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. उंचावरील इमारतींना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही. काही भागांत दिवसाआड पाणी द्यावे लागतेे. ओ कोकेरो चौक आणि पीडीए कॉलनी येथे पाणी साठवणुकीची व्यवस्था आहे. ते पाणी पंपाद्वारे उपसून उंचावरील टाक्यांमध्ये साठवून पुरविले जात आहे. त्याशिवाय सरकारच्या ८ टॅंकरमधून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Tillari Canal Repair Work
Bardez Water Crisis: अस्नोड्यात पाणी तरी बार्देश अजून तहानलेलाच! टँकरमाफियाकडून लूट; पर्वरीलाही फटका

पर्वरीचा जल शुद्धीकरण प्रकल्प बंद : तूट वाढली

आमठाणे येथील धरणातून आणि साळ येथील बंधाऱ्यातून अस्नोड्यापर्यंत पाणी येण्याची व्यवस्था असल्याने तो प्रकल्प सुरू झाला असून त्यातून सध्या पूर्ण तालुक्याला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पर्वरीचा १५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याअभावी बंद पडल्याने तालुक्याच्या पाण्याची तूट ४५ दशलक्ष लिटर्सवर गेली आहे.

Tillari Canal Repair Work
Bardez: प्रशासकीय कार्यालयात पाणी नाही मग सामान्य जनतेचं काय? पाणीप्रश्नावरून काँग्रेसचा 'साबांखा' कार्यालयावर घागर मोर्चा

कळंगुटला एक दिवस आड पाणीपुरवठा

पर्वरीतील पाण्याच्या टाक्यांमधून याआधी १० तास पाणीपुरवठा केला जात असे. आता केवळ ५ तास पुरवठा करता येतो. सध्या कमी दाबाच्या आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यास पर्वरीवासीयांना सामोरे जावे लागते. कळंगुट, हडफडे परिसराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी अस्नोडा येथे १०० दशलक्ष लीटर्स क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com