
Water supply delay in Bardez
पणजी: आमठाणे धरणातून पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोचून २४ तास उलटले तरी बार्देशचे अनेक भाग आजही तहानलेले आहेत. पर्वरीच्या अनेक भागांत आजही पाणीपुरवठा झालेला नव्हता.
पाणीपुरवठा कऱणाऱ्या टॅंकरनी आता फेरीमागे ९५० रुपयांऐवजी तब्बल २ हजार रुपये घेणे सुरू केल्याने पाणीटंचाईची झळ सर्वसामान्यांना बसू लागल्याची प्रतिक्रिया ऐकू येत आहे. त्यामुळे पूर्वी पाणी टंचाईवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग १७ च्या कार्यालयावर घागर, कळशी व बादल्या घेऊन मोर्चा काढणारे आज कुठे गेले, असा प्रश्नही स्थानिक पातळीवर विचारला जात आहे.
पर्वरीसाठी १० दलशक्ष लिटर्स क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. अस्नोडा प्रकल्पालाच पुरेसे पाणी मिळत नसल्याने पर्वरीच्या प्रकल्पाला पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने पर्वरीचा बोजा अस्नोड्यावर पडला आहे. त्यामुळे पर्वरीच्या काही भागांत गेले सात दिवस नळाच्या पाण्याचे दर्शन झालेले नाही.
ग्रामीण भागासाठी १०० लिटर आणि शहरी भागासाठी १५० लिटर दररोज दरडोई असे प्रमाण धरून गोव्याचा २०२५ सालापर्यंतचा मास्टर प्लॅन तयार केला होता. त्याप्रमाणे गोव्याची २०२५ सालापर्यंतची पाण्याची गरज ५९५ एमएलडी (दशलक्ष लिटर दरदिवशी) इतकी आहे. सर्व जलशुद्धीकरण प्रकल्पांची एकूण क्षमता ५९९ एमएलडी आहे तसेच आणखी सुमारे ८ कमी क्षमतेच्या काही लहान योजनाही कार्यरत आहेत. तरीही पाणी टंचाई का, याचे उत्तर मात्र कोणाकडेही नाही.
सरकार १६ हजार लिटर पाणी मोफत देते. पाण्याचा वापर योग्य रीतीने व काटकसरीने करण्यास प्रवृत्त करणारे दर असावेत. हे आताच्या धोरणाने अजिबात साध्य होत
नाही. खरे म्हणजे अशा मोठ्या अनुदानाने व सुरुवातीच्या टप्प्यांच्या मोठ्या व्याप्तीने नासाडी होईल, असाच पाण्याचा वापर होताना दिसतो. लोक गाड्या, ट्रक, गुरे धुण्यासाठी तसेच बागेसाठी वगैरे भरमसाट पाणी वापरतात. त्यावर कसलेही नियंत्रण नसल्याने आहे तिथे मुबलक पाणी आहे आणि नाही तेथे दुष्काळ, अशी स्थिती आहे. पर्वरीत सध्या अशीच पाणीबाणी आहे.
पाणीपुरवठा २४ तास व्हायला हवा. खेडेगावामध्ये दररोज कमीत कमी दरडोई ४० लीटर व सांडपाणी व्यवस्था नाही, अशा शहरांमध्ये दररोज दरडोई ७० लीटर व सांडपाणी व्यवस्था असलेल्या शहरी भागांत दररोज दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा केला पाहिजे.
पावसाचे किंवा नदीचे पाणी थेट पुरविले जात नाही, तर कच्चे पाणी नदीतून पंपाद्वारे प्रकल्पात आणून त्याचे शुद्धीकरण करून मोठ्या पाईपद्वारे गावागावांत नेले जाते. निरनिराळ्या ठिकाणी उंचावरील जलकुंभात पंपाद्वारे ते पाणी भरले जाते आणि ठराविकवेळी त्याचा पुरवठा केला जातो. पर्वरीत असे जलकुंभ असले तरी तेथपर्यंत पाणीच पोचत नाही, अशी स्थिती आहे.
जलशुद्धी प्रकल्पापासून गाव जवळ असेल तेथे जास्त वेळ पाणीपुरवठा होतो, तर दूरच्या ठिकाणी कमी वेळ पाणीपुरवठा होतो, त्यांना त्यांच्या कोट्यपेक्षा कमी पाणी मिळते. अस्नोड्यापासून पर्वरी लांबवर असल्याचा फटका सध्या पर्वरीवासीयांना बसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.