पणजी, ता. २३ (प्रतिनिधी) ः साडेचार वर्षापूर्वी कांपाल - पणजी येथील मनोज यादव ऊर्फ अमन याच्या खूनप्रकरणी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघा संशयितांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरविले. संशयितांविरुद्ध सबळ पुरावे सरकारी वकील सादर करू शकलेले नाहीत, असे निरीक्षण न्यायाधीश एडगर फर्नांडिस यांनी दिलेल्या निवाड्यात नोंदवले आहे.
कांपाल येथे राहत असलेल्या उत्तरप्रदेशच्या मनोज यादव याचा खून तसेच आकाश दास याचा चाकूने खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी भादंसंच्या कलम 302, 207 व 201 खाली संशयित मंजुनाथ कोली, राजकुमार जयगडी व अनिकेत नाईक या तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. 16 जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. या प्रकरणाचा तपास पणजीचे तत्कालिन पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर व उपनिरीक्षक अरुण देसाई व राजाराम बागकर यांनी केला होता.
2017 साली मनोज यादव याचा संशयितांनी लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. या मारहाणीवेळी संशयितांना जाब विचारण्यास गेलेल्या आकाश दास यालाही त्यांनी मारहाण केली होती. पोलिसांनी आकाश दास याची तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता. त्यावेळी त्याने संशयितांची नावे सांगितली नव्हती. त्यानंतर संध्याकाळी त्याने तक्रारीत सुधारणा करून संशयितांची नावे उघड केली होती. पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेऊन खुनासाठी वापरण्यात आलेल्या चाकूचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तो सापडला नव्हता.
न्यायालयातील सुनावणीवेळी साक्षीदारानी दिलेल्या जबानीत मनोज यादव याच्यावर चाकूने वार करून खून केल्याचे कुठेच उल्लेख केला नव्हता. मयत मनोज यादव याच्या मृतदेहावरील जखमा चाकूच्या नसून त्या लाथाबुक्क्यांच्या असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता. ही घटना पहाटेच्या सुमारास काळोखात घडल्याने संशयिताना ओळखता आले नाही, अशी जबानी आकाश दास याने न्यायालयात दिली होती. त्यामुळे संशयितांविरुद्ध या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताच पुरावा नसल्याची बाजू ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी मांडली होती. संशयितांचा या खुनाशी संबंध असल्याचा कोणताच पुरावा सरकारी वकील सादर करू शकलेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.