
बार्देश: थिवी ग्राम पंचायतीची निवडणूक होऊन तीन वर्षाचा काळ लोटला. मात्र थिवी पंचायतीचे सचिव धीरज गोवेकर यांच्या एकाधिकारशाही व आडमुठ्या धोरणामुळे पंचायतीचा विकास खुंटला आहे. सचिव उपलब्ध होत नसल्यामुळे कामे खोळंबून राहतात तसेच सरपंच व पंचसदस्यांनाही दादागिरीच्या भाषेत बोलतात, असा आरोप थिवी पंचायतीच्या कार्यवाहू सरपंच ॲड. हर्षदा कळंगुटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी माजी सरपंच संकटेश शिरोडकर, शिवदास कांबळी, गीता शेळके, निरज नागवेकर, प्रिती आरोलकर, मायकल फर्नांडिस, व शिवम परब उपस्थित होते. कार्यवाहू सरपंच हर्षदा कळंगुटकर यांनी सचिवांच्या मनमानीबद्दल बोलताना सांगितले की, गुरुवारी माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य व्यंकटेश शिरोडकर व निरज नागवेकर काही कामानिमित्त पंचायतीत सरपंचांच्या कार्यालयात बसले होते.
यावेळी सचिव धीरज गोवेकर यांनी पंचायतीच्या कारकुनाद्वारे त्यांना सरपंचांच्या केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले. ते ऐकत नसल्याचे पाहून पंचसदस्य व्यंकटेश शिरोडकर व निरज गोवेकर यांच्या अंगावर ते धावून आले व तुम्हाला सरपंचांच्या केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाही. तुम्ही येथून चालते व्हा, असे ओरडल्याचे कळंगुटकर यांनी सांगितले.
सचिव फक्त पंचसदस्यांनाच नाही तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अशीच वागणूक देतात. काल आमच्या अंगावर धावून आले. पंचसदस्यांना पंचायतक्षेत्राचा विकास करण्यास मदत करण्याचे सोडून थिवीची वाट लावल्याचे दिसून येते, असे माजी सरपंच व्यंकटेश शिरोडकर यांनी सांगितले.
पंचायत सचिव धीरज गोवेकर, हे पंचायत कर्मचाऱ्यांना ठराविक पंचसदस्यांची कामे करू नका, अशा धमक्या देतात. पंचसदस्य हे प्रभागातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीत येतात. सचिव कर्मचाऱ्यांना काम करण्यास मनाई करतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, असे पंचसदस्य शिवदास कांबळी यांनी सांगितले. सचिव धीरज गोवेकर यांच्यामुळे पंचायतीचा विकास खुंटला आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, सचिव धीरज गोवेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. पंचायतीच्या बैठकीत जेजे ठराव घेण्यात आलेत, ते मी पूर्ण केले आहेत. माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत, एवढेच मी सांगू शकतो.
पंचसदस्य निरज नागवेकर यांनी सांगितले, की आपण फक्त दोनच महिन्यांपूर्वी निवडून आलो असून सचिव धीरज गोवेकर आपल्यासह इतर पंचसदस्यांना हीन वागणूक देतात.
सचिव गोवेकर हे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या सांगण्यावरूनच मनमानी कारभार व दादागिरी करीत आहेत. या आठवड्यात आपण सर्वजण त्यांची तक्रार घेऊन संबंधित खात्याकडे व पंचायत मंत्र्यांकडेही जाणार आहोत,असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.