Pernem: रस्त्यावरच बाजार, स्‍मशानभूमीत दिव्यांचा गोंधळ, मोकाट गुरे; पेडणे परिसर समस्येच्या गर्तेत

Pernem Problems: सध्‍या पेडणे नगरपालिका क्षेत्रात सुमारे तीनशेच्यावर भटकी गुरे आहेत. गेल्या काही वर्षांत शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे.
Pernem Problems
Pernem ProblemsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: नगरपालिका क्षेत्रात भटक्या गुरांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. ही गुरे वाहतुकीस अडथळा ठरत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बाजारपेठेत, दुकानांच्या व्हरांड्यात या गुरांचा सर्रास वावर असतो. त्‍यामुळे दुकानदार, व्‍यापारी, विक्रेते हैराण झाले आहेत.

किराणामालाच्या दुकानात तोंड घालणे, बाजारातील भाजीपाला, फळफळावळ, फुले, फुलांचे हार फस्त करणे, दुचाकींना लावलेल्या भाजीपाल्याच्या पिशव्या व इतर साहित्‍य ओढून काढणे, त्‍यामुळे दुचाकी रस्‍त्‍यावर आडवी पडणे आदी प्रकार वाढले आहेत. साहजिकच पेडणे बाजारातील भटक्या गुरांचा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे.

सध्‍या पेडणे नगरपालिका क्षेत्रात सुमारे तीनशेच्यावर भटकी गुरे आहेत. गेल्या काही वर्षांत शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. काही मोजकेच शेतकरी शेती करतात व त्‍यासाठी ते पॉवर टिलर किंवा ट्रॅक्‍टरचा वापर करतात. पूर्वी बैलांना बांधून नांगरणी, मळणीची कामे केली जायची. ती आता हार्वेस्टिंग यंत्रांद्वारे केली जातात. गुरे मोकाट बनली, त्‍यांना बेवारस सोडून दिले. गोठ्यांतून त्‍यांना निर्दयीपणे बाहेर काढून तेथे घरे, बंगले उभारण्‍यात आली.

पेडणे बाजार, मासळी बाजार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील परिसर, कदंब बसस्थानक, सावळवाडा, देवाचे तळे, कोटकरवाडा, न्यूवाडा, सरमळेनाका, गडेकर भाटले, बागायत येथील श्री गणपती मंदिर परिसर, पराष्टे, खोपळीनी परिसरातील नागमोडी वळणावर रात्रीच्या वेळी गुरे ठाण मांडून बसतात. त्यातून वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्‍वारांना कशी तरी वाट काढून पुढे जावे लागते. अनेकदा अपघातही घडतात. कित्‍येकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे

दरम्‍यान, अनेकदा बाजारातच भटक्या गुरांच्‍या झुंजी लागतात. त्यात दुचाकी किंवा अन्य वाहनांची मोडतोड होते. त्‍यामुळे वाहनचालकांना नुकसान सहन करावे लागते.

शेती, बागायतींवर विपरीत परिणाम

ही मोकाट गुरे शेती, बागायती, परसबागेत घुसून तेथील पिकांवरही डल्ला मारतात. कुंडलवाड्यापर्यंत असलेल्या शेतीच्‍या मळ्‍यात तर ही भटकी गुरे हटकून दिसतात. शेतीचे मळे पडीक असण्‍यास किंबहुना शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविण्‍यास ही मोकाट गुरेसुद्धा एक महत्त्‍वपूर्ण कारण ठरली आहेत.

पकडलेल्या भटक्या गुरांना ठेवण्यासाठी पेडणे नगरपालिकेत सध्या एकही कर्मचारी नाही. डॉ. वासुदेव देशप्रभू नगराध्यक्षपदी असताना भटक्या गुरांविरोधात त्यांनी जोरदार मोहीम राबवली होती. पण त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून पेडणे नगरपालिकेने भटक्या गुरांना पकडण्याचे काम बंद केले आहे. कोंडवाडा झाडाझुडपांनी, वेलींनी वेढला आहे. पालिकेतर्फे गोशाळेला भटक्या गुरांना वाहून नेण्यासाठी वाहन देण्यात आले आहे. पण पालिका आणि गोशाळा यांच्‍यात समन्‍वय नसल्‍याने हे वाहन सध्‍या धूळ खात पडले आहे.

भररस्‍त्‍यावरच भरतो आठवड्याचा बाजार

पेडणेचा आठवड्याचा बाजार दर गुरुवारी भरतो. मात्र पोर्तुगीजकाळापासून तो रस्त्यावरच भरत आहे. एकेकाळी दुपारी एक वाजेपर्यंत चालणारा हा बाजार कालांतराने संध्याकाळी सात-आठ वाजेपर्यंत चालायला लागला. या बाजाराला पेडणेसह सावंतवाडी, बेळगाव, डिचोली आदी ठिकाणांहून भाजीपाला, फळ, कडधान्य विक्रेते येतात. मासेसुद्धा वेंगुर्ला, शिरोडा, मालवण येथून येतात. तयार कपडे, जीवनावश्यक, इलेक्ट्रॉनिक्‍स वस्तूंचाही बाजार भरतो.

गेल्या काही वर्षांत या आठवड्याच्‍या बाजाराचा व्याप इतका वाढला आहे की पेडणे नगरपालिका ते न्यायालयापर्यंतच्‍या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी विक्रेते बसलेले दिसून येतात. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होते.

या व्यतिरिक्त मामलेदार कार्यालयासमोरील रस्ता ते पोलिस स्थानक, दुसऱ्या बाजूने पेडणे नगरपालिका इमारत ते महात्मा गांधी पुतळा, सरकारी विश्रामधामाकडे जाताना पेडणे शेतकरी सोसायटीच्या आस्थापनांपर्यंत हा बाजार भरलेला असतो.

पूर्वीचे कृषी कार्यालय ते न्यायालय परिसर ही जागा आठवड्याच्‍या बाजारासाठी पर्याय ठरू शकते. कारण हा रस्‍ता एका बाजूला असल्‍याने वाहतुकीत अडथळा येण्याची शक्यता नाही. कदंब बसस्थानकाजवळ असलेल्या जागेचाही विचार करता येणे शक्य आहे. तसे झाल्यास बसस्थानकाजवळच बाजार करून लोकांना येणे जाणे सोयीचे ठरू शकते. मात्र त्‍यासाठी पालिका आणि सरकारकडे इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.

पेडणे-चोपडे रस्ता ठेवावा लागतो बंद

सकाळपासून रात्रीपर्यंत पेडणे ते चोपडे रस्ता बंद करून वाहतूक श्री रवळनाथ मंदिराच्या बाजूच्या मार्गाने वळवावी लागते. न्यायालयाकडे मुख्य रस्त्याला हा रस्ता जोडला जातो, जेथे चढाव आणि वळण घ्यावे लागते. त्यामुळे बस, ट्रकसारख्‍या अवजड वाहनांना वाहतूक करणे कठीण बनते.

आयटीआयकडून खाली न्यायालयापर्यंत आलेला रस्ता तर खूपच उतरणीचा आहे. तेथे एखाद्या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. एकंदरीत मुख्य रस्ता बंद ठेवून आणखी किती वर्षे रस्त्यावर अशा प्रकारे आठवड्याचा बाजार भरवावा लागणार हा प्रश्‍‍न आहे.

कचरा प्रकल्‍पाचे भाग्‍य कधी उजळणार?

पेडणे नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठ वगळली तर इतर बहुतांश भाग हा तसा ग्रामीणच. बाजारपेठेतही आठवड्याच्या बाजार हा मोठा असतो. साहजिकच कचऱ्याची समस्‍या जाणवू लागली आहे. बाजारपेठेतून दरदिवशी तीन-चार टेम्‍पो रिक्षा कचरा भरला जातो. तर, अन्य भागांतून दरदिवशी दोन-तीन रिक्षा टेम्‍पो कचरा आणला जातो व तो जेथे इंधन निर्मितीचा प्रकल्प गेली काही वर्षे रखडत पडला आहे, तेथे टाकला जातो.

पेडणे नगरपालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्‍या उग्र नसली तरी त्‍याची तीव्रता कमी करण्‍यासाठी २०१० मध्‍ये पेडणे आयटीआय केंद्रापासून काही अंतरावर कचरा प्रकल्पासाठी यंत्रसामग्री बसविली. पण त्याकडे कुणी लक्ष न दिल्याने तसेच आवश्यक पाठपुरावा न केल्याने त्‍यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च कचऱ्यात गेला.

कोट्यवधींचा खर्च ‘कचऱ्यात’

या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून तयार होणाऱ्या इंधनावर दोन टक्के रक्कम पेडणे नगरपालिकेला मिळणार होती. प्लास्टिक कचऱ्यावर इंधननिर्मिती करण्याबरोबरच ओल्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्याची योजना होती. सरकारच्या धोरणानुसार हा प्रकल्प सुरू करण्यामागे ‘गोवा प्लास्टिकमुक्त’ करणे हा उद्देश होता. सध्या पेडणे नगरपालिकेने या प्रकल्पाच्‍या ठिकाणी प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून ठेवला आहे. पण गेले वर्षभर या प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. ते सुरू होणार की पूर्वीच्‍या दोन उद्‌घाटनांनंतर गेला तसाच आता तिसऱ्या वेळीही हा प्रकल्‍प कचऱ्यात जातो, याकडे लक्ष आहे.

Pernem Problems
Pernem: पेडणे-चोपडे परिसरात मोकाट गुरांचा हैदोस, नागरिक त्रस्त

बॅटरीच्‍या, वाहनांच्‍या प्रकाशावर उरकावे लागतात अंत्‍यसंस्‍कार!

काही वर्षांपूर्वी पेडणे नगरपालिका क्षेत्रात सुसज्ज स्मशानभूमी नव्हती. लोक आपापल्या वाड्यावरील ठरावीक जागेत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे. विशेष म्‍हणजे त्‍याच वाड्यावरील लोकांना तेथे जागा मिळायची. इतरांना अशा स्मशानभूमींत अंत्यसंस्कार करण्यास प्रतिबंध केला जायचा. त्‍यामुळे पेडणे कृषी खात्‍याच्‍या जमिनीत सार्वजनिक स्‍मशानभूमी बांधण्‍यात आली. पण त्‍यास लागलेले समस्‍यांचे ग्रहण सुटायचे काही नाव घेत नाहीय. विशेष म्हणजे रात्रीच्‍या वेळी बॅटरीच्‍या, वाहनांच्‍या प्रकाशावर अंतिम संस्‍कार उरकून घ्‍यावे लागतात.

Pernem Problems
Pernem News: पेडणेतील 'हा' पूल धोकादायक स्थितीत; "तातडीने मार्ग काढा" स्थानिकांची मागणी

वाहतूक कोंडी नित्‍याची

पेडणे पालिका क्षेत्रातील सर्व रस्ते व बाजूच्‍या इमारती या पोर्तुगीजकालीन आहेत. त्या काळाचा विचार करता हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य होते. पण आता वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्‍यामुळे हे अरुंद रस्‍ते मोठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. सदर रस्‍त्‍यांच्‍या रुंदीकरणाचा विचार केल्यास दोन्ही बाजूला जुन्या इमारती आहेत. त्‍यात दुकाने, हॉटेल्‍स तसेच अन्य आस्थापने आहेत. त्‍यामुळे रस्तारुंदीकरण कसे करायचे, असा प्रश्‍‍न उपस्थित होतो. त्यातच तुये औद्योगिक वसाहत तसेच चोपडे, हरमल, केरी या बाजूने माल-साहित्‍याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनाही पेडणे शहरातूनच जावे लागते. त्‍यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्‍प होते.

पेडणे शहरात एक-दोन ठिकाणच्या जागा सोडल्या तर पार्किंगसाठी विशेष सोय नाही. वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, कारवार आदी लांब पल्ल्याच्या बसगाड्या पेडणे शहरात न येता परस्पर राष्ट्रीय महामार्गाने जाणे पसंत करतात. परिणामी या गाड्यांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची गैरसोय होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com