डिचोली शहरात एकाच रात्री तीन मंदिरे फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी (ता.२६) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनांमुळे शहरात खळबळ माजली आहे. चोरट्यांनी दोन मंदिरांतील फंडपेट्या पळविल्याची माहिती मिळाली आहे.
या घटना पाहता शहरात मंदिरे फोडणारी टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्रीही डिचोली शहरात अन्य एक मंदिर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या चोऱ्यांप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी मंदिरे फोडणाऱ्या चोरांनी डिचोलीत धुमाकूळ घातला होता. लाडफे, कासारपाल, भटवाडी-उसप, सर्वण, मुळगाव या भागात चोरांनी मंदिरे फोडली होती.
आता पुन्हा मंदिरे फोडण्याच्या घटना घडल्याने डिचोलीत मंदिरे फोडणारी टोळी कार्यरत असावी, असा संशय वर्तविण्यात येत आहे. डिचोली शहरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. श्री दत्त देवस्थानचे ज्ञानेश्वर गावकर आणि इतरांनीही तशी मागणी केली आहे.
बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी साष्टीवाडा-औदुंबरवाडी येथील श्री दत्त देवस्थान मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून मंदिरातील फंडपेटी पळवली. गुरुवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी डिचोली पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चोरीचा पंचनामा करून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवली आहे. सहा महिन्यांपूर्वी याच मंदिरात चोरी होऊन चोरांनी श्री दत्तमहाराज यांच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने लंपास केले होते.
अन्य एका घटनेत बुधवारी रात्रीच लामगावच्या माथ्यावर असलेल्या श्री म्हात्राई देवीच्या मूळ मंदिरातील फंडपेटी फोडण्यात आली. तर त्याच रात्री बोर्डे येथील श्री महामाया पंचायतन देवस्थानशी संबंधित श्री रवळनाथ देवस्थानच्या गर्भकुडीच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले. मात्र, चोरांनी काहीच चोरले नाही. दरम्यान, मंगळवारी (ता.२५) गावतड-बोर्डे येथील श्री सातेरी देवीचे मंदिर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.