गोव्यात कुणीही किंगमेकर नाही; कोणत्याच पक्षाने भ्रमात राहू नये: मुख्यमंत्री

एकहाती सत्ता भाजपलाच मिळणार आहे, असे मत प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Pramod Sawant: विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेत. मागील काही दिवस प्रमुख पक्षांचे केंद्रीय नेते गोव्यात येऊन प्रचार करत आहेत. सत्ताधारी पक्ष भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. यावेळीही भाजपच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद (Pramod Sawant) यांनी एक खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, ‘आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळी गोव्याची जनता आम्हालाच बहुमताने निवडून देणार आहे. 2022 च्या ‘22 प्लस मिशन’ या संकल्पनेला आणि एकंदरीत आमच्या प्रचाराला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

लोकांचा भाजपला उदंड प्रतिसाद..

आम्ही प्रचार केलेल्या सर्वच मतदारसंघांमध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा दाखवला आहे. आणि त्यामुळेच यावेळीही बहुमताचे सरकार भाजपचेच असणार यात वाद नाही. भाजपने कधीच धर्माचे किंवा भेदभावाचे राजकारण केले नाही. भाजपने (Goa Bjp) आजवर फक्त लोकांसाठीच काम केले आहे. याआधी लोकांची मानसिकता फक्त एका आमदाराला निवडून देण्याची होती; पण यावेळी फक्त आमदाराचा विचार न करता सरकारचा आणि पक्षाचा विचार करण्याचे मी जनतेला आवाहन केले आहे. आणि मला खात्री आहे की जनता सरकार स्थापन करण्यासाठीच भाजपला मतदान करेल.

Pramod Sawant
गोव्यातून गुंडराज, भ्रष्टाचार आणि पक्षांतर संपवायला हवे; दिनेश गुंडू राव

अमित शहांचा गोवा दौरा

अमित शहांनी (Amit Shah) गोव्यातील मुक्काम वाढवल्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की भाजप काही वेगळी रणनीती तयार करत आहे का? यावर सावंत म्हणाले की, अमित शहा हे आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांनी गोव्यामध्ये मुक्काम वाढवण्याचे कारण हेच की ते फक्त प्रचारासाठी थांबले आहेत. बाकी जे काही बोलले जात आहे तसे वेगळे कोणतेच कारण यामागे नाही. भाजपला बहुमत मिळण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे.

भाजपमध्ये कॉंग्रेस नेते..

भाजप सत्ताधारी पक्ष असूनही काँग्रेसचे बरेचसे नेते आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर यामागचे कारण विचारले असता ते म्हणाले की, यातील बरेचसे नेते हे काही वर्षांपूर्वी आमच्या सोबत सरकारमध्ये कार्यरत होते. आणि अश्याच नेत्यांना परत संधी म्हणून तिकीट देण्यात आले आहे. इतर कोणत्याही नवीन व्यक्तीला तिकीट दिले नाही.

गोव्यात निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यांवरच..

उत्तर प्रदेशमध्ये चर्चेचा मुद्दा म्हणजे राम मंदिर. आणि हा भाजपने सर्वाधिक उचललेला मुद्दा मानला जातो. पण याचा उल्लेख गोव्यात कुठेच दिसून येत नाही. हिंदुत्वाची आस जपणाऱ्या भाजपने गोव्यामध्ये कुठेच राम मंदिराचा उल्लेख केला नाही. यावर मुख्यमंत्री यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, गोव्यातील जनतेला आवश्यक असणारी विकास कामे करण्यावरच भाजपचा भर आहे; त्यासाठी आम्हाला कधीच राम मंदिराचा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जाण्याची गरज वाटली नाही. राम मंदिर हा नक्कीच महत्त्वाचा आणि राष्ट्रीय मुद्दा आहे; आणि या संदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचे लोकांनी कौतुकही केले आ. पण निवडणुकीमध्ये मुद्दा फक्त विकासाचा आणि जनतेचा असतो, त्यापक्षाने केलेल्या कामाचा असतो. कारण ज्या गोष्टींची जनतेला खरंच गरज आहे, त्या गोष्टींवर काम करण्यासाठी आम्ही भर देत आहोत.

गोव्यात कुणीही किंग किंग मेकर असणार नाही..

बऱ्याच पक्षांना असे वाटते की ते राजकारणामध्ये आणि गोव्याच्या निवडणुकीसाठी किंग मेकर ठरू शकतात. पण मला त्यांना सांगावेसे वाटते की इथे कुणीही किंग मेकर नाही. त्यामुळे कुठल्याच पक्षाने भ्रमात राहू नये. सत्ता आणि विजय हा फक्त भाजपचाच असणार आहे. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, कॉंग्रेसने सांगितल्याप्रमाणे ते सत्तेवर आल्यावर आपला नेता ठरवून राजभवनावर दाखल होतील. पण मी सांगतो की भाजप पक्षाने या सर्व गोष्टी केंद्रीय नेतृत्वाखाली आधीच ठरवलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाने भ्रमात राहू नये.

राहुल गांधींनी भाजपची माफी मागावी..

राहुल गांधी प्रचारासाठी गोव्यात आले होते त्यावेळी कॉंग्रेसच्या सभेत दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी भाजपवर निशाणा साधताना स्व. मुख्यमंत्री मनोहर मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजप नेते आणि आम्ही सर्वच जण दुखावले गेले आहोत. एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याबद्दल आपण की बोलत आहोत हे कॉंग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना भान असले पाहिजे, त्यामुळेच राहुल गांधींनी याबाबत जाहीर माफी मागावी.

चर्चबद्दल 'या' विधानाबाबत मी चुकीचे बोललो नव्हतो...

मुख्यमंत्र्यांनी चर्चबद्दल केलेले विधान काही कालावधीपूर्वी खूप चर्चेत होते. त्यावर ते म्हणाले की, चर्चबद्दल मी काहीच चुकीचे बोललो नव्हतो. तेव्हा चर्च पाडण्याची किंवा अशा कोणत्याही प्रकारची माझी भावना नव्हती आणि इथून पुढेही नसेल. माझे विधान असे होते की ज्या ठिकाणी मंदिर/चर्च पडले आहेत, किंवा जिथे काहीच नाही, अशा ठिकाणी नवीन मंदिर बांधायला काहीच हरकत नाही. सरकार अशा ठिकाणी मंदिर उभारू शकत होते. यामध्ये माझ्या कुणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती. परंतु काही पत्रकारांनी माझ्या विधानाचा विपर्यास करून हा मुद्दा चर्चेत आणला. म्हणून मी त्यावेळीही हेच सांगितले होते आणि आताही मी हेच सांगत आहे की मी कोणतेच चुकीचे विधान केले नव्हते.

आता यंदाच्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com