Ponda Police Station: फोंडा, म्हार्दोळ आणि कुळे पोलीस स्थानकांमध्ये सध्या एकही शववाहिका कार्यरत नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. फोंडा पोलीस स्थानकात असलेली शववाहिका कुळे आणि म्हार्दोळ स्थानकांसाठीही वापरण्यात येते. मात्र सध्या ती उपलब्ध नसल्याने तपासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे पोलीस सांगत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, फोंडा पोलीस स्थानकाची शववाहिका बिघडल्याने दुरुस्तीसाठी पणजीतील मुख्यालयात पाठवण्यात आली आहे. मात्र आता दहा महिने उलटून गेले तरी शववाहिकाच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगण्यात येते. म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रासोबतच कुळे पोलीस स्थानकही फोंडा स्थानकाच्या शववाहिकेवरच अवलंबून आहे.
फोंडा तालुका हा राज्याच्या मध्यभागी असून त्याच्या चारही बाजूंनी औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे इथे रहदारीचे प्रमाण अधिक आहे. तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिगरगोमंतक वास्तव्यास असतात.
दुसरीकडे, फोंड्यामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक रस्ते अपघात घडत असतात. त्यामुळे इथले अनैसर्गिक मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे. अशावेळी अपघातामध्ये जर कुणाचा मृत्यू झाला तर मृतदेह नेण्यासाठी शववाहिकाच नसल्याने पोलीस निरीक्षकांना ताटकळत घटनास्थळीच तासंतास राहावे लागते.
इतर ठिकाणाहून किंवा स्वयंसेवी संस्थांची रुग्णववाहिका येईपर्यंत मृतदेहाची राखण करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना तिथेच थांबणे गरजेचे असते. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी लक्ष घालून फोंडा स्थानकाला लवकरात लवकर एक शववाहिका प्रदान करावी, अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.