Goa Accident Case: अपघातांचे ग्रहण काही सुटता सुटेना!
Goa Accident Case: बोर्डे-व्हाळशी रस्त्याला लागलेले अपघातांचे ''ग्रहण'' सुटता सुटत नसून, या रस्त्यावर अपघाती मृत्यूचे प्रकार घडतच आहेत. गेल्या सहा महिन्यात दोन मिळून सात वर्षांत या रस्त्यावर जवळपास दहाजणांचे बळी गेले आहेत. यावरून हा रस्ता वाहतुकीस असुरक्षित आणि जीवघेणा बनला असल्याचे स्पष्ट आहे.
रुंदीकरण आणि वाहतूक पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे बोर्डे-व्हाळशी या जीवघेण्या रस्त्यावरील भीषण अपघातांवर हळूहळू नियंत्रण येत असल्याचे वाटत असतानाच, या रस्त्याला लागलेली अपघातांची मालिका थांबत नाही. या रस्त्यावरील यापूर्वीच्या भीषण अपघातांच्या घटना त्यातच अजूनही हा रस्ता अपघातप्रवण क्षेत्रमुक्त झाला नसल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे अजूनही तेवढेच धोकादायक आहे.
बोर्डे साष्टीवाडा ते व्हाळशी आयटीआयपर्यंतचा रस्ता वाहतुकीस अत्यंत असुरक्षित आहे. आयटीआय परिसरातील रस्ता तर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गेल्या सात वर्षांतील अपघात पाहता व्हाळशी ते बोर्डे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याचे स्पष्ट होत आहे. या रस्त्यावर काल (गुरुवारी) दुचाकीस्वार श्रीराम गावकर मिळून वेगवेगळ्या अपघातात चार दुचाकीस्वार, कारचालक आणि पादचारी मिळून गेल्या सात वर्षात जवळपास दहाजणांना प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय लहानमोठे अपघात होऊन अनेकजण जखमीही झाले आहेत. कालच्या भीषण अपघातापूर्वी या रस्त्यावर श्रीकांत पळ या ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेला होता.
व्हाळशी येथे कॅमेऱ्याद्वारे वाहनांची वेग मर्यादा तपासण्यात येत आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने अडवून त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण येत आहे. असा दावा पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र वाहतूक पोलिसांना चुकविल्यानंतर वाहनचालक नियम पाळतात की नाही. त्याबद्दल संशय वर्तविण्यात येत आहे.
वेग मर्यादा पाळा
व्हाळशी ते बोर्डे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असला, तरी रुंदीकरण केल्यानंतर गेल्या तीन वर्षात या रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रण आलेले आहे. या रस्त्याला जोडून व्हाळशी येथून बगलमार्गाचे काम चालू आहे. बगलमार्ग झाल्यानंतर शहराबाहेर जाणारी वाहने परस्पर बगलमार्गाने ये-जा करणार आहेत. त्यामुळे व्हाळशी-डिचोली रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ कमी होणार आहे. अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी वेगमर्यादाही पाळणे तेवढेच महत्वाचे आहे, असे नगसेवक विजयकुमार नाटेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.