पणजी: पक्षाच्या रितसर स्थापनेनंतर तब्बल पंचवीस वर्षांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीतून (Goa Assembly Election) अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचा (TMC) ‘माँ, माती, माणूस’ हा नारा गोवा विधानसभेत पोहोचण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (luizinho faleiro) यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसला (Congress) नक्कीच हादरा बसला आहे.
प्रदेश काँग्रेसकडे नेत्यांची वानवा नसल्यामुळे त्या हादऱ्यातूनही काँग्रेसला सावरण्यास विलंब लागणार नसला, तरीही काँग्रेसच्या काही मतदारसंघांना विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस धक्का देणार आहे. बिगर गोमंतकीयांच्या मतपेढीवर विसंबून राहाणाऱ्या विद्यमान राजकारण्यांना तृणमूलचे गवतातले फूल डोकेदुखी ठरू शकते. तृणमूल काँग्रेसने गोव्यात यापूर्वी मागील काही विधानसभा निवडणुकीतून आगमन करण्याचे प्रयत्न केले. परंतु चांगल्या नेतृत्वाच्या अभावामुळे ते अयशस्वी ठरले होते.
फालेरो यांनी आमदारकीच्या राजीनाम्यानंतर ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले, ते पाहाता त्यांच्या हाती आता तृणमूलचे गोव्यातील नेतृत्व येणार आहे. माजी आमदार लवू मामलेदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस यतिश नाईक, संयुक्त सचिव विजय पै हे सुरवातीला त्यांच्या साथीला असतील. काही आजी - माजी आमदार त्यांच्या बरोबर महिनाभरात येतील, याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिक नेतृत्वाएवढाच त्यांना फायदा तृणमूल काँग्रेसच्या ईशान्येकडील राज्यांतील नेत्यांकडून होऊ शकतो. गोव्यातील ईशान्येकडे राज्यांतल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी तृणमूल काँग्रेस काही अंशी यशस्वी होऊ शकते.
विधानसभेत खाते उघडण्याची चिन्हे!
सरकार स्थापनेसाठी आवश्यक असे संख्याबळ विरोधकांच्या युतीतून तृणमूल काँग्रेस मिळवू शकणार नसले, तरी तृणमूलचे गोवा विधानसभेत खाते उघडण्याची चिन्हे आहेत. फालेरो यांचे नेतृत्व गोवा फॉरवर्ड, शिवसेना, म. गो. किंवा आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एका छताखाली आणू शकणार नाही. तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशाने एका बाजूने म. गो., भाजप, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टीच्या युती, आघाडी स्थापनेची प्रक्रिया गतिमान होऊ शकते. माजी आमदार लवू मामलेदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्यामुळे मगो बरोबर संधान जुळवण्याचे तृणमूलचे मनसुबे ढासळणार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी असल्याने युती शक्य आहे.
...तर अटीतटीची लढत शक्य?
उत्तर गोव्यातील काही मतदारसंघात ईशान्येकडील मतदारांचा भरणा मतपेढीच्या रुपाने वाढलेला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आजवर काही मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीतून चाळीस ते दोनशे मतांच्या फरकाने उमेदवार निवडून येत असल्याचे अभ्यास करता दिसून येते. त्यामुळे इशान्येकडील मतदार तृणमूलमुळे प्रामुख्याने उत्तर गोव्यातील विद्यमान उमेदवारांचे यश अपयशाचे गणित बिघडवणार आहेत. त्याचे परिणाम भाजप, काँग्रेसच्या मताधिक्क्यावर होऊ शकतात. भाजप कदाचित त्यासाठी निवडणुकीची रणनीतीच बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काँग्रेसने लवकर युतीने संयुक्तपणे कामाला जुंपून घेतल्यास कांही मतदारसंघात उत्तरेत काँग्रेसच्या उमेदवारांचे यश दूर नाही.
ईशान्येकडील ‘चाकरमानी’ लक्ष्य
पश्चिम बंगालच नव्हे, तर आसाम, मणिपूर, त्रिपुरा, ओरिसा, झारखंड, छत्तीसगढ, मिझोराम या राज्यांतून मागील दहा पंधरा वर्षांत गोव्यात येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. सुरक्षा रक्षक, मसाज पार्लरे, पर्यटन, कॅसिनो, कचरा व्यवस्थापन, बांधकाम, शेती, मच्छीमारी, रेती, खनिज काढण्याच्या व्यवसायांत तेथील नागरिक आहेत. ताळगाव, सांताक्रूझ, सांतआंद्रे, कुंभारजुवे, सांगे, साखळी, कळंगुट, नुवे, कुठ्ठाळी, मुरगाव, दाबोळी, नावेली, कुडचडे, वाळपई, फोंडा, प्रियोळ, म्हापसा, हळदोणे, पर्वरी इत्यादी मतदारसंघात हे नागरिक विखुरलेले आहेत. त्यातील किमान 50 - 60 टक्के नागरिकांकडे मतदार ओळखपत्रे असतील, असा अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.