ओ नमो विश्वभरिता। देवा बापा सर्व समर्था।
परमेश्वरा सत्यवता । स्वर्ग पृथ्वीचा रचणारा ।।1।।
तू प्रसिद्धीचा दातारु। कूपानिधी करूणाकरू।
तू सर्व सुखोचा सागरू। आदि अंतू नाकडे।।2।।
रील ओव्या या कोणत्याही हिंदू पुराणातल्या नाहीत, कोणत्याही मराठी संताची परमेश्वराविषयीची रचना नाही. तर, या ओव्यात आहेत ख्रिस्ती धर्मग्रंथ 'बायबल'च्या मराठी अनुसर्जनातल्या. मराठीत आहेत म्हटल्यावर महाराष्ट्रातल्याच (Maharashtra) अशा कुणी महाराष्ट्रीय मराठी ख्रिस्ती व्यक्तीने किंवा धर्मगुरूने लिहित्या असतील, तर तसेही नाही. तर त्या लिहील्या आहेत सोळाव्या शतकांतत इंग्लंडमध्ये जन्मलेल्या फादर स्टीफन्स याने. आणि, कोणासाठी लिहील्या... तर गोव्यातील सासष्टी तालुक्यातील त्या काळातील नव ख्रिस्त्यांसाठी. अशा अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत फादर स्टीफन्सच्या जीवन कथेत.
गोव्यातील (Goa) ख्रिस्ती अध्यात्मिक किंवा धार्मिक साहित्याचा संस्थापक, मराठीतील पहिल्या छापील ग्रंथाचा लेखक, कोकणी भाषेचा पहिला व्याकरणकार अशी ओळख असणाऱ्या या प्रतिभावंत ख्रिस्ती धर्मगुरुच्या आयुष्याची आणि कार्यकाळाची सात वर्षं गोव्यात गेली. परंतु, दुर्दैव असे की फादर स्टीफन्स याने ज्यांच्यासाठी आपली हयात खर्च केली त्यांच्या सांप्रतकालीन वारसाना मात्र फादर स्टीफन्सचा पूर्णपणे विसर पडलाय. खरे तर त्यांच्याच धर्मग्रंथामुळे गोव्यातील ख्रिस्ती घराघरांत ख्रिस्ताची शिकवण कळाली, ख्रिस्तीधर्माच्या अध्यात्माची गोडी लागली. त्या धर्मग्रंथालाही गोव्याच्या ख्रिस्ती धर्मसंस्थेतून हद्दपार व्हावे लागले. याला काळाचा महिमा, एवढेच आपण म्हणू शकतो.
गोव्याच्या ख्रिस्ती धार्मिक जीवनाचे भरण पोषण करणाऱ्या फादर थॉमस स्टीफन्स यांचा जन्म इंग्लंडमधील विल्टशायर परगण्यातील बुशटन या गावात सन 1549 साली झाला. त्यांचे वडील गावातील नावजलेले व्यापारी होते. खाऊन पिऊन सुखी असणारे धार्मिक कुटुंब असे स्टीफन्सच्या घरचे वातावरण होते. सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्मामधील कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या पंथामधील स्पर्धा आणि संघर्ष शिगेला पोहोचला होता.
इंग्लडमध्ये प्रोटेस्टंटांचे वर्चस्व वाढून तेथे अल्पसंख्याक खिस्ती बनलेल्या रोमन कॅथोलिकांचा छळ होऊ लागला. तरुण स्टीफन्सला आपल्या रोमन कॅथोलिक पंथाचा अभिमान होता. थॉमस पौंड या कॅथोलिक धर्मश्रद्धेचे रक्षण आणि प्रसार करणाऱ्या चळवळ्या कार्यकर्त्याशी स्टीफन्सची मैत्री झाली. थॉमस पौंड स्टीफन्सला भारतात कॅथोलिक धर्माचा प्रचार करण्याचा जेजूइट पंथाच्या पोर्तुगीज मिशनऱ्यांची पत्रे वाचून दाखवत असे. यातून स्टीफन्सलाही जेजूईट मिशनमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली. त्याकरिता स्टीफन्स कॅथोलिक धर्मगुरुच्या शिक्षणासाठी प्रथम रोम येथे आला. तेथे धार्मिक शिक्षण घेऊन तो पोर्तुगालच्या राजधानीत लिस्बनला आला. तेथून जहाजाने त्याच्या उर्वरित आयुष्याच्या कर्मभूमीत, म्हणजे गोव्यात 24 ऑक्टोबर 1579 रोजी पोहोचला. त्याच्या आयुष्यातला मराठीतून शिक्षण घेण्यासाठी वसई येथे घालवलेला सन 1611-12 हा कालावधी सोडला तर 1579 नंतरचा आयुष्याचा काळ त्याने गोव्यातील सासष्टी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील चर्चमध्ये राहून धर्मप्रचारासाठी घालवला. सन 1590 ते 94 या काळात तो राशोलच्या जेजूइट कॉलेजचा रेक्टर होता तसेच मडगाव, बाणावली, नावेली येथे धर्मोपदेशक म्हणजेच फादर म्हणून स्टीफन्स याने काम केले.
स्टीफन्स गोव्यात आला सन 1579 मध्ये. त्यावेळी सासष्टीतील पोर्तुगीजांच्या सत्तेचा चाळीस वर्षाचा काळ गेला होता. पोर्तुगीजाना सासष्टी तालुका सन 1543 मध्ये अदिलशहाकडून मिळाला. सन 1560 काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या धार्मिक जुलमी सत्तेचा वरवंटा फिरवून सासष्टीतील सर्व हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. सासष्टीतील हिंदू लोकांसाठी फक्त दोनच पर्याय ठेवलेः धर्मांतर तरी करा किंवा आपले गाव सोडून पोर्तुगीज हद्दीबाहेर निर्वासित व्हा! ज्यांना शक्य होते ते लोक आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांची आठवणी मागे ठेवून आपले गाव सोडून परागंदा झाले. परंतु अनेकांना ते शक्य नव्हते. त्याना धर्मांतराशिवाय पर्याय नहता. अशा असहाय्य स्थितीत जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्या सासष्टी गावातील नवख्रिस्त्यांपुढे नव्याने वसविलेल्या चर्चमध्ये फादर स्टीफन्सला बायबलमधील ख्रिस्ताची करुणा दया, शांतीची शिकवणूक शिकवावी लागे.
दहशतीने आणि जबरदस्तीने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले नवख्रिस्ती घरात गुपचूप हिंदू धर्मपरंपरांचे पालन करत. त्यांना चर्चमधील लेटीन भाषेतील प्रवचनाविषयी अजिबात रुची वाटत नसे. तरीही पोर्तुगीज धर्म अधिकाऱ्याच्या आणि धर्मसमीक्षेच्या शिक्षेच्या भयापोटी इच्छेविरुद्ध चर्चमधील प्रवचन ऐकणे भाग पडे. फादर स्टीफन्सचे चर्चमध्ये येणाऱ्या गावकऱ्यांच्या सर्व हालचाली व सवयींवर बारीक लक्ष असे. स्टीफन्सला कळून चुकले की सासष्टीतील नवख्रिस्ती लोकांना धर्मप्रवचनाची अजिबात रुची लागत नाही. तेव्हा फादर स्टीफन्सने गावकऱ्यांनाच विचारण्यास सुरुवात केली की तुम्हाला चर्चमधील धर्मप्रवचनाविषयी गोडी का नाही वाटत? तुमचे नक्की काय प्रश्न आहेत? यावर गावकऱ्यांनी स्टीफन्सला सांगितले की पोर्तुगीजांनी आमची जी जुनी पुराणे होती ती नष्ट केली. जशी मराठी भाषेची काही शास्त्रपुराणे आमच्याजवळ होती, तशा प्रकारची प्रतिपुस्तके तुम्ही आमच्यासाठी का नाही करत?
फादर स्टीफन्सने सासष्टीतील नवख्रिस्ती लोकांचे बोलणे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि या नव्या आव्हानाने झपाटून जात त्याने गोव्यातील सासष्टीतील हिंदू लोक ज्याप्रमाणे पूर्वी त्यांचे मराठी धर्मग्रंथ वापरत त्यांचा शोध घेऊन त्याचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी त्याने एक वर्षाकरिता वसई येथे जाऊन मराठी भाषेचा अभ्यास केला. मराठी भाषेतील वारकरी अथवा भागवत पंथाच्या संताच्या अाध्यात्मिक काव्य रचनांचा पुरेपूर अभ्यास स्टीफन्स याने केला आणि यातून ग्रीक-लेटीन भाषेतील बायबलचे भाषांतर नव्हे तर भावार्थ मराठीतून लिहिला. स्टीफन्सने या भावार्थाला नाव दिले 'ख्रिस्तपुराण.' फादर स्टीफन्स म्हणतो, 'भावार्थिया बखेया ख्रिस्तावांनो, हेआ पुराणातू स्वामिया जेजू ख्रिस्ताची, तारकाची कथा लिहिली आहे.' असे ख्रिस्तपुराण नक्की कसे आहे आणि त्यातून स्टीफन्स याने मराठी भाषेची थोरवी कशी लिहिली आहे,
फादर स्टीफन्सने सासष्टीतील नवख्रिस्ती लोकांचे बोलणे एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि या नव्या आव्हानाने झपाटून जात त्याने गोव्यातील सासष्टीतील हिंदू लोक ज्याप्रमाणे पूर्वी त्यांचे मराठी धर्मग्रंथ वापरत त्यांचा शोध घेऊन त्याचे मनन केले. त्याने एक वर्षाकरिता वसई येथे जाऊन मराठी भाषेचा अभ्यास केला.
- सचिन मदगे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.