Panjim Smart City Accident: राजधानीत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात खोदकाम केले असून निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यात वाहने रुतण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
आज पुन्हा सांतिनेज येथे काम सुरू असताना शीतल हॉटेलजवळ रस्ता खचून मातीवाहू ट्रक रुतला. गत काही दिवसांतील ही सातवी घटना आहे.
पणजीवासीय सततच्या खोदकामांमुळे होणाऱ्या धुळीमुळे वाहतूक कोडींमुळे आणि रस्त्यात वाहने खचण्याच्या घटनामुळे वैतागले आहेत.
महानगरपालिका व ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहून आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये, अशा शब्दांत नागरिक चीड व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आझाद मैदानाशेजारी ट्रक कलंडल्याची घटना घडली होती. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाली नाही. परंतु अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत साशंकता निर्माण होत आहे. पावसाळ्यात स्थिती अजून बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता जे रस्ता खचण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यात अधिक वाढ होऊन पाऊस झाल्यास पणजीची दुरवस्था होणार आहे. सातत्याने वाहने रूतण्याच्या घटना घडत असून या घटनांवर सरकारने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.
- सुरेंद्र फुर्तादो, माजी महापौर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.