Colvale Jail: पोलिसांच्या छाप्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या कोलवाळ कारागृहातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या कारागृहाच्या सुरक्षारक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या संशयास्पद कृतीमुळे त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
समीर मोटे असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. कारागृह आवारात तो कागदाची सुरळी करून त्यातून सिगारेटसारखे धुम्रपान करत असल्याचे आढळून आले आहे. तो रंगेहाथ आढळून आला होता.
कारागृह महानिरीक्षकांना याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. मोटे याला यापुर्वीही अशाच पद्धतीने रंगेहाथ पकडण्यात आले होते. यापुर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. कारागृह परिसरात मोबाईल वापरल्यावरून त्याच्यावर कारवाई केली गेली होती.
कोलवाळ कारागृहात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नेहमी कैद्यांकडून मोबाईल फोन, अंमली पदार्थ आढळून येत असतात. त्यामुळे हे कारागृह नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपुर्वीच येथे टाकलेल्या छाप्यात कैद्यांकडून तब्बल 18 मोबाईल संच, ब्लूटूथ, तंबाखू, सिगरेट्स असे साहित्य जप्त करण्यात आले होते.
अंडरट्रायल कैद्यांच्या बॅरेक क्रमांक दोनमधून तब्बल 18 मोबाईल्ससह अनेक चार्जर, हेडफोन्स सापडले. तसेच तंबाखू, गुटखा तसेच इतर अंमलीपदार्थही जप्त करण्यात आले.
त्यापुर्वी 5 मार्च रोजीदेखील अशाचप्रकारे कारागृह महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला होता. तेव्हा जवळपास 23 मोबाईल संच सापडले होते.
या छाप्यानंतर कारागृहाचे तत्कालीन सहाय्यक जेलर भानुदास पेडणेकर यांची पणजी मुख्यालयात बदली करण्यात आली. कारागृहाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असता, या प्रकारानंतर त्यांना जबाबदार धरून ही बदली स्वरुपाची कारवाई झाल्याची माहिती मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.