सासष्टी : गतसाली ऑगस्ट महिन्यात लिक्विडेशनमध्ये गेलेल्या मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या ठेवीदारांसमोर ठेवीच्या रुपाने ठेवलेली आपली रक्कम परत मिळेल की नाही याबद्दल साशंकता होती. बॅंकेच्या दहा हजार ठेवीदारांनी ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज केले होते. आता डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) छाननी करून व ठेवीदारांच्या अर्जांचा अभ्यास करुन पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम परत करण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे. (Margao Urban Bank Update)
गेल्या आठवड्यापासून ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे लिक्विडेटरने नियुक्त केलेले अधिकारी किशोर आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत दहा हजारपैकी दोन हजार ठेवीदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. लिक्विडेटरने ठेवीदारांना आपले अर्ज सादर करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून दोन महिने मुदत दिली होती. तरीसुद्धा आम्ही अजूनही अर्ज स्वीकारणे चालू ठेवल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
मडगाव अर्बन बॅंकेचे एकूण 56,635 खातेधारक आहेत. मात्र केवळ दहा हजार खातेधारकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज केले. यातील जवळ जवळ 99 टक्के खातेधारकांना त्यांची पूर्ण म्हणजे पाच लाखापर्यंतची रक्कम मिळणार आहे. खातेधारकांचे पैसे परत करण्यासाठी बॅंकेने 136 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी बॅंकेच्या एकूण ठेवी 189.81 कोटी रुपये आहेत. जी बाकी रक्कम लागेल ती ऋण वसुलीतून व बॅंकेची मालमत्ता विकून फेडली जाईल असेही आमोणकर यांनी सांगितले.
ज्या खातेधारकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज केलेले आहेत, त्यांना पूर्ण रक्कम देण्याइतपत रक्कम बॅंकेकडे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बॅंकेच्या इतर शाखांतून लॉकर्स बंद करण्यात आले असून त्यातील मौल्यवान वस्तू मडगाव येथील मुख्य कचेरीत सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन ठेवल्या आहेत असे आमोणकर यांनी सांगितले. या लॉकरवाल्यांनी बॅंकेशी संपर्क साधून आपल्या वस्तू घेऊन जाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.