Bilawal Bhutto India Visit For SCO Summit 2023 Goa: परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी गुरूवारी (दि.04) शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO summit 2023) बैठकीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. आज भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री यांच्यात चर्चा होणार आहे.
दरम्यान, बिलावल भुत्तो यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर सद्भावना म्हणून पाकिस्तानने 600 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील एका नामांकीत वृत्त संकेतस्थळाने (ट्रायबल न्यूज नेटवर्क) याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. पाकिस्तानने सागरी सीमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या 600 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तानुसार, 200 मच्छिमारांची पहिली तुकडी 12 मे रोजी सोडली जाण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 400 मच्छिमारांना 14 मे रोजी सोडले जाण्याची शक्यता आहे.
भारत - पाकिस्तान या शेजारी देशांमधील तणाव कमी करण्यासाठी या निर्णयाकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले जात आहे. दरम्यान, भारताकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दोन्ही देशांत परदेशी कैद्यांची वेळेवर सुटका करण्याबाबत कोणतीही स्पष्ट व सर्वसमावेशक यंत्रणा किंवा धोरण नाही, त्यामुळे अनेक कैदी शिक्षा पूर्ण करूनही शिक्षा भोगत आहेत. सध्या 705 भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत, त्यापैकी 654 मच्छिमार आहेत. त्याचप्रमाणे एकूण 434 पाकिस्तानी भारतीयांच्या ताब्यात असून त्यापैकी 95 मच्छिमार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHCR) अध्यक्षा राबिया जावेरी आगा यांनी 1 मे रोजी या मच्छिमारांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकून तुरुंगात टाकलेल्या मच्छिमारांच्या सुटकेची मोहीम सुरू केली होती.
NHCR ने आपल्या मोहिमेदरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय करारांचा देखील संदर्भ दिला आणि दोन्ही देशांनी या स्थलांतरितांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी केली.
दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मच्छिमारांना वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
इधी फाऊंडेशन 200 तुरुंगात कैद झालेल्या मच्छिमारांना रस्त्याने लाहोरला पोहोचवेल आणि सिंध सरकार प्रत्येक भारतीय मच्छिमाराला 5,000 रुपये, खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू देईल. अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.
बिलावल भुत्तो यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे मानवाधिकार संघटनांकडून कौतुक होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.