ST Reservation : मडगाव, गोव्यातील एसटी बांधवांना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळेल की नाही, यासंदर्भातील सरकारने आपली भूमिका या लाेकसभा निवडणुकीच्या पूर्वी स्पष्ट करण्याची गरज विजय सरदेसाई यांनी गुरुवारी (ता.१) व्यक्त केली.
मतदारसंघाची फेररचना केल्यावर आरक्षणाचा निर्णय घेणार ही जर सरकारची भूमिका असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील एसटी बांधवांना आरक्षण मिळणे कठीण आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
गुरुवारी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन या संघटनेच्या शिष्टमंडळाने विजय सरदेसाई यांची ‘गोंयकार घर’मध्ये भेट घेतली आणि राजकीय आरक्षणाप्रीत्यर्थ ५ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेवर एसटी बांधवांतर्फे मोर्चा नेण्यात येणार आहे त्याला सरदेसाई यांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ही मागणी धसास लावण्यासाठी केंद्र सरकारकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्यात यावे, अशीही मागणी यावेळी या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात जोजफ वाझ, रवींद्र वेळीप तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गाेव्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे, त्यामुळे केंद्रात सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याची गरजच नाही.
जर गाेव्यातील भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करायची असेल, तर त्यांना केंद्र सरकारशी संपर्क साधून ही मागणी मान्य करणे सहज शक्य आहे. मात्र, या सरकारला तसे करायचे नाही, असे वाटते. भाजपात जे एसटी आमदार आहेत ते यासंदर्भात का आवाज उठवत नाहीत.
- विजय सरदेसाई, आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.