Gadestove 2024: अदृश्य देवता आणि माणसांमधील खेळ

Gadestove 2024: डिचोली तालुक्यातील साळ या गावचा प्रसिद्ध गडेत्सव सोमवार, 25 मार्चपासून सुरू झाला. बुधवार, 27 मार्चपर्यंत हा उत्सव चालेल.
Gadestove 2024:
Gadestove 2024:Dainik Gomantak

Gadestove 2024:

दिलीप देसाई

डिचोली तालुक्यातील साळ या गावचा प्रसिद्ध गडेत्सव सोमवार, 25 मार्चपासून सुरू झाला. बुधवार, 27 मार्चपर्यंत हा उत्सव चालेल. भारत देशात होळी विविध प्रकारे साजरी केली जाते. संस्कृतीची कास धरुन गोव्यातील होळी वैविध्यपूर्णरित्या साजरी होते.

फाल्गुन  पौर्णिमेला ढोल-ताशांवर काठी पडल्यावर वातावरणात उल्हासाचा संचार होतो नि उत्सवाला सुरुवात होते. या फाल्गुन मासात होळी,  रंगपंचमी, करुल्यो, धुलीवंदन, धुळवट, मालगडी, रोमट, चपय, रणमाले, सती, सोकारती, फुगडी, घोडेमोडणी अशा विविधांगी कार्यक्रमाची रेलचेल असते. ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांचा हा जणू लोकोत्सव असतो.

या शिमगोत्सवाच्या काळात डिचोली तालुक्यातीळ बोर्डे- डिचोली, कुडणे, पिळगाव, आमोणा व साळ या ठिकाणी गडे उत्सव होतो. त्यातील रोमांच या उत्सवाचा चैतन्याविष्कार असतो. या उत्सवांचा शिरोमणी असलेला साळ येथील ‘गडे’ उत्सव खूपच प्रसिद्ध आहे.

Gadestove 2024:
Goa Road Accident: गोव्यात 2023 मध्ये 2,846 अपघातांची नोंद; दर आठवड्याला पाच जणांचा मृत्यू

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी उंच असे आंबा, फणस किंवा कोकमचे सरळसोड झाड, देवताना गार्‍हाणे घालून घाडीकरवी तोडले जाते. त्याची उंची लांबी ६० ते ७० फूट असते. हे झाड गावातून (किंवा परगावातून) ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत नाचत मिरवत शेकडो लोकांच्या उपस्थितीत गावची ग्रामदेवता श्री महादेव व भूमिका पंचायतन मंदिराच्या परिसरात आणले जाते.

स्वखुशीने अथवा नवसाची फेड म्हणून हे झाड लोक देतात.  प्रांगणात आणल्यानंतर या झाडाचा ओबडधोबड भाग च्यारी (मेस्त)कडून तासून घेऊन त्याला आंब्याच्या डहाळ्यांनी सुशोभित केले जाते. मध्यरात्री गावातील पुरुष मंडळी जमतात आणि ढोल ताशाच्या गजरात "हर हर" असा घोष करीत मध्यरात्रीच्या सुमारास त्याला गोलाकार खड्ड्यात (नॅमात) उभे करतात. त्यावर धार्मिक संस्कार होऊन होळी पूजन होते.

Gadestove 2024:
Dolphin In Goa: गोव्यात आढळणाऱ्या डॉल्फिनच्या दोन प्रजाती धोक्यात !

उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवतांना गाऱ्हाणी घातली जातात. त्यानंतर होळीच्या बुंध्यापाशी सुके गवत बांधून त्याला आग लावली जाते. ही होळी उभी करताना देवतासुद्धा मशाल पेटवून आनंद व्यक्त करीत भाविकांना दर्शन देतो.

श्री महादेव मंदिराच्या प्रांगणात होळी घातल्यानंतर पुढील तीन रात्री गडेत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की हा गडी उत्सवाचा खेळ श्री महादेवाने सुरू केला नि आदिमाया भूमिका देवीकडे खेळाची सुत्रे दिली  आणि माडयेश्वर ,बाबरेश्वर, जठार, घवनाळेश्वर, राष्ट्रोळी, दाडसाखळ, म्हालकुमी, आम्यानी  आदी सीमधारी देवतांकडे अधिकार दिले आणि आपल्या गणांचा, वेताळ, भूत पिशाच्चांचा त्यात समावेश केला.

अदृश्य देवता आणि दृश्य रूपातील जोगिनीच्या संचारातील माणूस (गडे) यांचा हा संघर्ष असतो. ६४ जोगिणी म्हणजे चौसष्ट गडे. त्यातील काही गड्यांचे (कुडी/शरीरात संचार झालेली व्यक्ती) निधन झाल्यामुळे त्यांची संख्या कमी झालेली आहे. गड्याचा खेळ पाहण्यासाठी तिन्ही रात्री हजारो संख्येने भाविक, पंचक्रोशीतील लोक साळात  येतात.

होळीच्या दुसऱ्या रात्रीपासून होळीभोवती गडे पडू लागतात. पायघोळ पांढरे शुभ्र धोतर व त्यावर चामड्याचा काळा पट्टा असा त्यांचा पेहराव असतो. या उत्सवाची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिराकडून होते. आबालवृद्ध ग्रामस्थ ढोल ताशाच्या गजरात नाचत मिरवत रोमट घेऊन येतात.

‘जय जयकार, जय जयकार माडयावयल्याचो जय जयकार

माडयावयलो देवचार इलो रे त्याच्या हातात फुलांचो झेलो रे….’

असा जयघोष करीत ते रोमट घालतात. तब्बल अडीच-तीन तासांनी भूमिका मंदिराजवळील होळीपाशी येऊन रोमट विसर्जित होते. त्यानंतर गावकरी, भाविक तिथे येऊन पुरोहित किंवा गडयाकरवी आपापले नवस बोलतात, फेडतात व नंतरच गडे पडण्यासाठी गाऱ्हाणे घालतात. ढोल ताशा वाजवतात नि नम्मान (देवतांची प्रार्थना आणि स्तुति) सुरू होते.

नम्मानामध्ये गावातील देव देवतांची स्तुती असते. नम्मान गाताना घाडी प्रमुख असतो व त्याच्याबरोबर गावातील काही मंडळी असतात. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना हे नम्मान पाठ नसते पण तिथे असलेल्या एका कातळाला (दगडाला) पायाने स्पर्श केला आणि एका हातात बांबू घेऊन उभा राहिला की ते त्यांना आपोआप सूचते नि तालात गायले जाते. ते ऐकण्यासाठी सुद्धा भाविकांची गर्दी असते.

गड्यांचा अवसर आल्यानंतर दहा फेऱ्या मारून होळीपासून दूर डोंगरावर करूल्या आणण्यासाठी जातात. वाटेवर त्या गडयांच्या स्वागतासाठी देवचार भव्य मशाल घेऊन उभा असतो. करयेश्वर स्थानाकडे पोहोचल्यानंतर करूल्या हस्तगत करण्यासाठी ते धावपळ होते नि त्या प्रयत्नात काही गड्यांना देवचार लपवितो.

हजारो लोक गडयाबरोबर लपविलेल्या गड्याला आणण्यासाठी त्यावेळी धावतात. त्यात त्यांना देवचार नि मशालीचे दर्शन घडते. ठराविक  स्थानावर, झाडावर लपविलेल्या गड्याला (कधी एकाला तर कधी दोघांना) बाकी गडयाकडे सुपूर्द केले जाते. त्यांची शरीरे ताठ  झालेली असतात. भूमिका मंदिरात येऊन त्याला तीर्थ घालतात व  होळीपाशी ठेवून नंतर त्याला फरफटत ओढले आणि फिरवले जाते. साधारणपणें पहाटेपर्यंत म्हणजे साडेचार ते पाच वाजेपर्यंत हा खेळ आटोपला जातो.

बाबरेश्वर , घवनाळेश्वर, आम्यानी, चिचेवर, म्हालकुमी, जठार, पातोळी व भूमिका मंदिर या ठिकाणी गडे दिले जातात तर शेवटचा गडा माडयेश्वर आपल्या स्थानावर दिला जातो. शेवटी ते स्मशानभूमीत ‘मसणे’ आणायला जातात. एरवी तिथे काहीही नसते पण येताना ते तिरडीचे दांडे, हुसकीच्या डहाळ्या, मटकी, बुजगावणे व स्मशानभूमीतील पेटती लाकडे  घेऊन येतात व होळीपाशी ठेवून तालात नाचतात. ही ‘मसणे’ परत स्मशानभूमीत पोचवली जातात  पण जाताना आपण आणलेलेच ‘मसणे’ ते अचूक घेऊन जातात. ती परत ठेवून आल्यानंतर होळीपाशी ते सारे विसर्जित होतात.

आज मानवाचे जीवन आधुनिक होत असताना, संगणक-इंटरनेटच्या युगात अशा या उत्सवाची संकल्पना स्पष्ट होत नाही. हे गडे रात्रभर अनवाणी काट्याकुट्यातून धावतात तरी त्यांच्या पायांना किंचितही ओरखडा नसतो. त्यांच्या मुखातून येणारा "ह" हा लयबद्ध हुंकार भाविकांना भुरळ घालत असतो. हा अद्भूत गडे उत्सव झाल्यानंतर या गावात धार्मिक कार्य चालूच राहते. होळीपाशी नवस फेडणे आदी कार्यक्रम होत असतात. सातव्या दिवशी घोडेमोडणी झाल्यानंतर रात्री श्री चव्हाटेश्वर मंदिरात ‘न्हावान’ होते. भाविक व सर्व गावकरी श्रध्देने देवीचे ‘न्हावान’ घेतात नि गडे उत्सवाची सांगता होते.                            

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com