कांदोळकरांना सुचले शहाणपण! खरी कुजबुज

मोठा गाजावाजा करून गोव्यात प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसला या राज्यातील विधानसभा निवडणडुकीत आलेले अपयश तसे सर्वज्ञातच आहे.
Kiran Kandolkar
Kiran KandolkarDainik Gomantak
Published on
Updated on

कांदोळकरांना सुचले शहाणपण!

गेल्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर महिनाभराने मतमोजणी झाली आणि त्यानंतर आतापर्यंत आणखीन सुमारे महिनाभराचा अवधी उलटून गेला. मोठा गाजावाजा करून गोव्यात प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसला या राज्यातील विधानसभा निवडणडुकीत आलेले अपयश तसे सर्वज्ञातच आहे. त्यात भरीस भर म्हणजे, निवडणुकीच्या संदर्भातील कित्येक जणांची बिले चुकती करण्यात पक्षाला अद्याप अपयश आल्याने आपसूकच स्थानिक नेत्यांची नाचक्कीही झाली. निवडणुकीच्या बाबत जबाबदारी सोपवलेले ‘आय पॅक’चे प्रशांत किशोर यांनी गोव्यातून सध्या काढता पाय घेतलेला असून, तृणमूलच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांना तसेच उमेदवारांनाही वाकुल्या दाखवल्या आहेत. निवडणुकीवेळी विविध कामांची जबाबदारी स्विकारलेले कंत्राटदार त्या बिलांची रक्कम वसूल करण्यासाठी सध्या किरण कांदोळकर यांच्या घराचे उंबरठे झिजवत आहेत. यामुळेच नाराज होऊन कांदोळकरांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. एवढे मात्र खरे, की कांदोळकरांना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे, अशी चर्चा सध्या त्यांच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांत होत आहे. ∙∙∙

वीज वरून जाते म्‍हणजे कुठून?

सध्या राज्‍यात विजेचा लपंडाव सुरू आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणची झाडांच्‍या फांद्या वीज वाहिन्‍यांवर पडल्‍याने वीज जाण्याचा प्रकार समजू शकतो. पण, दिवसाही वीज जात असल्‍याने अगोदरच उकाड्याने हैराण झालेले गोमंतकीय अधिक वैतागत आहेत. आपल्‍याकडे वीज गेली की बऱ्याचदा थेट वीजमंत्र्यांना फोन केला जातो. कारण परिघातील कार्यालयातील फोन एक तर एंगेज लागतो किंवा तो उचलला जात नाही, हा सार्वत्रिक अनुभव. चुकून फोन उचलला गेलाच तर वीज वरून गेल्‍याचे उत्तर दिले जाते. कुठल्‍याही वेळी फोन केला की साचेबद्ध उत्तर देण्याचे काम वीज खात्‍याचे कर्मचारी इमानेइतबारे पार पडतात. यावरून सामाजिक माध्यमांवर टिकेचे सूर उमटत आहेत. नेहमीच्‍या आणि त्‍याच त्‍याच उत्तराला वैतागलेल्‍या एका नेटकऱ्याने म्‍हटले की, वीज वरून म्‍हणजे कुठून जाते रे? ∙∙∙

भाऊंच्या गाठीभेटी

हे भाऊ म्हणजे आमचे बाळ्ळीचे माजी सरपंच रोहिदासभाऊ नाईक. वयोमानामुळे असेल कदाचित. पण, मागची काही वर्षे ते पंचायत राजकारणात तसे सक्रिय नव्हते. परंतु आता पंचायत निवडणूक तोंडावर आलेली असताना रोहिदास भाऊंनी काही ज्येष्ठ राजकारणी आणि मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. या मंत्र्यांबरोबर काढलेले त्यांचे फोटो फेसबुकवरही दिसू लागले आहेत. भाऊ ते लोकांना दाखवीत यांनीच आपल्याला पंचायत राजकारणात परत सक्रिय व्हायला सांगितले आहे असे सांगू लागले आहेत. भाऊ परत पंचायतीत कमबॅक करू तर पाहत नाहीत ना? ∙∙∙

काब्राल यांचे खरे बोल

गतकाळात भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर होते त्यावेळी राज्यातील जनतेला चोवीस तास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे वचन देण्यात आले. पण, आता सत्ता तीच आहे; मात्र पाणीपुरवठ्याचा मंत्री बदलला व त्यांना राज्यातील पाणीपुरवठ्याची जाण आली असावी किंवा त्यांनी वस्तूस्थिती जाणून घेतली असावी. कारण सध्या पाणीपुरवठा मंत्री नीलेश काब्राल खाण भागातले असल्याने खनिज हे पूनर्निर्मित न करता येणारे धन असल्याची जाणीव त्यांना आहे. त्याचा जपून वापर करणे गरजेचे असल्याचे ते अनुभवाने शिकले आहेत. त्यामुळे खाण व्यसायाचा त्यांनी बराच धसका घेतला आहे. पाणी हे पुनर्निर्मितीक्षम आहे तरीसुद्धा राज्यात नागरिकांना चोवीस तास नव्हे, 4 ते 5 तास पाणी पुरवठा करता येऊ शकतो असे सत्यवचन ते बोलले आहेत. ‘सत्य वदे वचनाला नाथा...’ असे राज्यातील जनता म्हणत आहे. चोवीस नव्हे, किमान चार ते पाच तास नियमित पाणीपुरवठा केला म्हणजे तुम्ही फोंडाधिशांवर विजय मिळवला असे जनताच म्हणेल. ∙∙∙

हे कुठले पदाधिकारी?

सध्या गोव्यातील तृणमूल पक्षात आपल्या पदांचे राजीनामे देण्याची चढाओढ लागली आहे, असे वाटते. कारण प्रत्येक दिवशी कुठल्या तरी पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला अशा बातम्या ऐकू येतात. असे म्हणतात निवडणुकीच्या वेळी प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’ या एजन्सीने काही जणांकडे वायदे केले होते ते नंतर पूर्ण केलेच नाहीत. त्यामुळे काही जणांनी अस्वस्थ होऊन राजीनामे देण्यास सुरवात केली आहे. मात्र, यात एक प्रश्न उरतोच आणि तो म्हणजे ज्यांनी कुणी तृणमूलचे राजीनामे दिले ते खरेच राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी होते का? कारण निवडणूक झाल्यानंतर तृणमूलने गोव्याची सर्व कार्यकरीणीच बरखास्त केली होती. त्यामुळे ज्या कुणी राजीनामे आता दिले आहेत त्यांची पदे कधीचीच काढून घेतली होती. असे म्हणतात, तृणमूल गोव्यात आपल्या कार्यकारणीत बदल करू पाहत होता आणि या नवीन बदलात यातील कित्येक जणांच्या हाती नारळ देण्याचे ठरले होते. त्यामुळे काही जण आधीच पक्षातून बाहेर पडले. पण, त्यातून झाले ते असे की आता तृणमूलने पक्ष कार्यकारीणीची पुनर्रचना करण्याचे ठरविले तरी त्यासाठी ज्या पदाधिकाऱ्यांची गरज आहे तेवढी सदस्य संख्याही सध्या त्या पक्षाकडे गोव्यात नाही. मग पुनर्रचना करणार काय कप्पाळ? ∙∙∙

(The failure of the Trinamool Congress in Goa)

Kiran Kandolkar
काँग्रेसला ब्लॅकमेल करण्यासाठीच प्रशांत किशोर गोव्यात; किरण कांदोळकर यांचा आरोप

अन्‌ पत्रकार संतापले

चिखली बायो-क्रुसादेर्स या संघटनेच्‍यावतीने नगरविकास मंत्री विश्‍वजित राणे यांना वास्‍को विकास योजना रूपरेषा (ओडीपी) रद्द करावा, या मागणीचे निवेदन देण्यात येणार होते. मंत्री राणे यांच्‍या दोनापावल येथील बंगल्‍यावर भेट घेण्यात येणार असल्‍याची माहिती सर्व पत्रकारांना देण्यात आली. दुपारी साडेतीन वाजता रणरणत्‍या उन्‍हान सर्व वृत्तवाहिन्‍यांचे आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले. यावेळी संघटनेचे लोक आलिशान वाहनातून आले आणि निघूनही गेले. पत्रकारांनी त्‍यांना अडवून विचारले असता, ते म्‍हणाले मंत्री राणे यांच्‍याकडे आमची खासगी बाब होती. यावरून उपस्‍थित पत्रकार संतापले. खरेच खासगी बाब होती की, पत्रकारांनाही बोलावले म्‍हटल्‍यावर बाबांनी संघटनेच्‍या लोकांची नाडी आवळली हे कळायला मार्ग नाही. ∙∙∙

वनखात्याचे व्हिजन

वनमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केले त्यावरून त्यांचे वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची अनेकांना आठवण झाली. वनखात्याप्रती त्यांना कमालीची आस्था. अनेकदा ते वनपालांना घेऊन जंगलांचा दौरा करत, त्यांना सूचना करत. त्यांच्या पाठिमागे ती पध्दत बंद झाली ती पुन्हा सुरू झाली तर ती गोव्याच्या हिताची ठरणार यात शंका नाही. मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांना पाच वर्षांसाठीचे व्हीजन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात लोकांशी कसे संबंध ठेवावेत, वृक्षतोड परवाने किती कालावधीत हातावेगळे करावेत त्याचाही अंतर्भाव असावा असेही सांगितले जात आहे. ∙∙∙

चर्चिल झाले हतबल!

जर सूर्यच म्हणायला लागला ही धग सहन होत नाही, तर त्याला काय म्हणावे? गोव्याच्या राजकारणात स्ट्रॉंगमॅन म्हणून जाणले जाणारे गोव्याचे पहिले ख्रिस्ती मुख्यमंत्री व गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी अनेक अपयशे पचवली असणार. मात्र, त्यांना आजच्या एवढे हतबल झालेले कोणी कधीच पाहिलेले नाही. चर्चिल हे स्वतः आपण व कन्या वालांका निवडणुकीत हरले म्हणून हतबल व दुःखी नाहीत तर ते त्यांच्या फूटबॉल संघाच्या फूटबॉलपटूंनी मॅच फिक्सिंग केली. मात्र, चर्चिल फिक्सिंग करणाऱ्यांचे काहीही बिघडू शकत नाही म्हणून हतबल झाले आहेत. चर्चिल ब्रदर्स संघाच्या काही फुटबॉलपटूंनी स्थानिक स्पर्धेत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप खुद चर्चिलनेच केला आहे. क्रिकेटची मॅच फिक्सिंगची कीड फुटबॉल खेळात आली असून, ही कीड फुटबॉल खेळ नष्ट करण्यापूर्वी किडीला ठेवण्यास ग्रेट गोलकीपर ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी पुढाकार घ्यावा, असे चर्चिल म्हणतात. चर्चिलची ही हतबलता बरेच काही सांगते. जिथे गुळ असते तिथेच मुंग्या येतात, हे सत्य यातून सिद्ध झाले आहे. ∙∙∙

‘आयपॅक’चे पॅकअप

मोठा गाजावाजा करीत प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’ने अखेरच्यावेळी गोव्यात येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन राज्यभर नव्या, जुन्या, रुसव्या फुगव्यांना जवळ करून पैशाचे आमिष दाखवून निवडणूक बोहल्यावर चढविले. पण, मुळात गोव्यातील जनता खरी हुशार. कारण कोणीही यावे आणी लालूच दाखवून फासवण्याइतकी दुधखुळी नक्कीच नाही. परिणाम म्हणून निकाल शून्य लागला. देशात ‘आयपॅक’चे नाव खराब होईल म्हणून निवडणूक लढविली नसल्याचा कांगावा करून आता काही उपयोग नाही. म्हणून तर गोव्यातील एकएक करून निवडणूक काळातील दिग्गज राजीनामा देऊ लागले आहेत. राज्य जिंकले तर प्रशांत किशोर रणनीतिकार आणि हरले तर कोण रणछोडदास. काही का असेना ‘गोवा कें लोग अजीब है!’ हे म्हणत आता ‘आयपॅक’ने आपले पॅकअप करण्यास सुरवात केली. ∙∙∙

बांधकामांवर संक्रांत

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिस यंत्रणा सक्रिय होऊन तिने तेरेखोल पात्रात बेकायदा रेती उपसा करणाऱ्या तब्बल २६ होड्या जप्त केल्या. त्यामुळे एकाएकी रेतीचे दर मीटरमागे हजार ते पाचशे रुपयांनी कडाडले व त्याचा परिणाम बांधकामांवर झाला. मात्र, शेजारील महाराष्ट्र, कर्नाटकतून रस्ता मार्गे मोठ्या प्रमाणात रेतीची आवक होते व त्याचे कोडे सामान्यांना सुटत नाही. रेती उपसा परवाने घेऊन करता येत असेल तर गोव्यात त्यासाठी टाळाटाळ का केली जाते हा मुद्दाही उरतोच. ∙∙∙

तृणमूलला शाप लागला की काय?

तृणमूल काँग्रेसमध्ये राजीनाम्‍यांचे सत्र सुरू आहे. पक्षाच्‍या छोट्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झालेले हे लोण आता गोवा प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचले आहे. निवडणूक दरम्‍यान सत्ताधारी भाजपच्‍या अनेक नेत्‍यांकडून या निवडणुका संपल्‍या की, तृणमूल काँग्रेसचे नेते येथे राहणार नाहीत. इतकेच नव्‍हे तर पक्षही राहणार नाही, अशी विधाने केली जात होती. देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्‍यापासून भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्‍यापर्यंत प्रत्‍येक नेत्‍याने अनेक ठिकाणी हे विधान केले होते. भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसही या वाक्‍यावर जोर देत होते. भाजपा हा देव-धर्म, कर्मकांड मानणारा पक्ष मानला जातो. यामुळे भाजपच्या नेत्‍यांनी केलेल्‍या विधानाचे रुपांतर शापात झाले की काय? अशी चर्चा सध्या प्रसार माध्यमांतून सुरू आहे. ∙∙∙

Kiran Kandolkar
गोमंतकीय नागरिकांना बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’

भाटीकरांची ‘समाजसेवा’

फोंड्याचे मगोपचे नेते डॉ. केतन भाटीकर यांचा विधानसबा निवडणुकीत फक्त ७७ मतांनी पराभव झाला. पण, त्यामुळे विचलित न होता त्यांनी आपले समाजकार्य सुरूच ठेवले आहे. रक्तदान शिबिर असो वा परवा अवकाळी पडलेल्या पावसात झालेली पडझड दूर करण्याचे असो भाटीकर हे समाजसेवेत व्यस्त असलेले दिसतात. तशी त्यांना समाजसेवा नवीन नाही. गेली चार वर्षे ते फोंड्यात समाजसेवा करतच आहेत. पण तरीही त्यांचा पराभव झाला. थोडा संयम बाळगला असता तर ते जिंकू शकले असते असे फोंड्यात बोलले जाते. त्यांच्या काही खूष मस्कऱ्यांचा अतिउत्साहीपणाही त्यांना नडला असे सांगितले जात आहे. या ‘खूष मस्कऱ्यांनी’ डॉक्टरांना एवढे हरभऱ्याच्या झाडावर चढवले की त्यांना ‘मसिहा’चे स्वरुप प्राप्त झाल्यासारखे वाटायला लागले. या खूष मस्कऱ्यांच्या अतिरंजित वृत्तीमुळेच डॉक्टरांना पराभव स्वीकारावा लागला अशी चर्चा फोंड्यात सुरू आहे. काही का असेना निवडणूक हरूनही फोंड्यात या समाजसेवेमुळे सध्या डॉक्टरांचाच ‘बोलबाला’ ऐकू येत आहे. आता याचा फायदा त्यांना राजकारणात मिळतो की नाही याचे उत्तर मिळण्याकरिता आणखी पाच वर्षे थांबावे लागणार एवढे मात्र खरे.∙∙∙

गांजाचे जाळे

गोव्यात पर्यटन व्यवसायाबरोबरच अमलीपदार्थाचा व्यवसायही भलताच फोफावला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एकेकाळी तो फक्त किनारपट्टी पुरता तसेच हिप्पीपुरता मर्यादित होता. पण, हल्लीच्या काही महिन्यांत पोलिसांनी घातलेल्या धाडी पहाता या व्यवसायाने ग्रामीण भागात हात पाय पसरल्याचे उघड होते. गोव्यात बदली होऊन आलेले आयपीएस दर्जाचे अधिकारी गोवा अमलीद्रव्य मुक्त करण्याचे संकल्प सोडतात; पण या धाडी वेगळेच काही सांगतात. नवे पोलिस महासंचालक याची नोंद घेणार का? ∙∙∙

गोविंदा एक भेट इथेही द्या!

‘न्यू ब्रूम स्वीप व्हेल’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचप्रमाणे आपले नवीन मंत्री व आमदार मोठ्या उमेदीने काम करताना दिसतात. क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी सध्या कला व संस्कृती खात्याला बाजूला ठेवून क्रीडा खात्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सुस्तावलेल्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी गोविंद गावडे सगळीकडे फिरत आहेत. गोविंदजी एकदा कुंकळळीला भेट द्या. इथे एक मैदान आहे. मैदानाला लागून वॉलकिंग ट्रेक अशे त्याची दशा व दिशा पहा. मैदान असूनही स्थानिकांना खेळायला मिळत नाही. मैदान ‘आयएसएल’च्या टीमला भाड्यावर दिले आहे. त्या मैदानावर लोंबकळणारे हायमास्ट दिवे पहा व हे मैदान स्थानिकांसाठी की व्यावसायिक संघासाठी हे एकदा स्पष्ट करा, अशी मागणी आम्ही नव्हे कुंकळ्ळीतील क्रिडाप्रेमी करीत आहेत. आता पाहुया आपले क्रिडा मंत्री स्पोर्टसमॅन स्पीरीट दाखवितात की नाही. ∙∙∙

मायकलला फटका

विश्वजित राणे यांनी ओडीपी प्रक्रिया स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा सर्वात जास्त फटका भाजपातून सध्या काँग्रेस पक्षात आलेले मायकल लोबो यांना बसला आहे. मायकल उत्तर गोवा पीडिएचे अध्यक्ष असताना त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ असे ज्या भागांना म्हणू शकतो ते पर्रा आणि कलंगुट हे गाव पीडीएच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णय घेतला होता. विश्वजित यांनी नेमका तोच निर्णय स्थगित केला. दुसऱ्या बाजूने बाबूश मोन्सरात यांनी केलेले काही बदलही शितपेटीत टाकले. एका बाजूने भाजप सोडलेल्या मायकलला टार्गेट करताना दुसऱ्या बाजूने भाजपला बळकटी दिलेल्या बाबूशलाही सोडले नाही म्हणायचे. ∙∙∙

वेळ्ळीची खासियत

वेळ्ळी हा खरेतर ख्रिस्ती बहुल मतदारसंघ. प्रत्येक निवडणुकीवेळी आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. तेथून मानू फर्नांडिस यांनी अपक्ष म्हणून निवडून येऊन इतिहास घडविला. त्यानंतर हा मतदारसंघ कॉंग्रेसने काबीज केला. पण, नंतर २०१२मध्ये परत भाजपच्या पाठिंब्यावर राहिलेल्या बेंजामिन यांनी तेथे झेंडा फडकावला. नंतर परत कॉंग्रेस व यावेळी आपने तेथे इतिहास घडविला. यावेळची खासियत म्हणजे पक्षाशी गद्दारी केलेल्या माजी मंत्र्याला तेथे हार पत्करावी लागली. ∙∙∙

बाबाशानही अडचणीत

मडगावचा बाह्य विकास आराखडा अधिसूचित झाला असतानाही नव्याने एसजीपीडीएची धुरा सांभाळलेले बाबाशान डिसा यांनी आपले इस्पित साधण्यासाठी हा आराखडा पुन्हा बदलण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी त्यांनी नगरनियोजन मंत्री बाबू कवळेकर यांचेही आशीर्वाद घेतले होते. पण, त्यांच्या वाईट नशिबाने ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच बाबाशान पडले. बाबाशानच्या भरवश्यावर ज्यांनी पैसे खर्च केले होते तेही बिचारे गोत्यात आले म्हणायचे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com