शैलेश नागवेकर
Goa Sports News: ज्या क्षणाची वाट जवळपास दीड महिना पाहिली गेली तो क्षण आता काही तासांवर आला आहे आणि त्याासाठी अहमदाबादचा भव्यदिव्य रंगमंच नटून थटून तयार आहे. अवकाश पडदा उघडण्याचा, परंतु त्या अगोदरच संपूर्ण अहमदाबाद शहरात कमालीचा उत्साह संचारला आहे.
वानखेडे स्टेडियमवर मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजाला बुधवारी बाद केले आणि त्यावेळी मुंबईत वाजलेल्या फटक्यांचा आवाज येथे अहमदाबादमध्ये उमटला आणि त्या क्षणापासून येथील वातावरण
कमालीचे बदलू लागले. ‘चलो अहमदाबाद’ असा नारा देत असंख्य क्रिकेटप्रेमींनी अंतिम सामन्यास येण्याची तयारी सुरु केली आणि बघता बघता शुक्रवारीच हे शहर जवळपास हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र निर्माण झाले.
दिवाळीच्या सुटीचा हँगओव्हर अजूनही असल्याने एरवी असलेली वाहतूक कोंडी नव्हती, परंतु रेल्वे, रस्ते महामार्ग आणि विमानतळांवरची गर्दी मात्र वाढली. येथे येणारा प्रत्येक जण अंतिम सामन्यासाठीच जणू काही येत आहे असे समजून येथील स्थानिक वाहतूकदारांनी चढ्या भावाचे ‘रेडकार्ड’ तयार केले.
हॉटेलच्या दरांनी तर उच्चांक गाठला. लाखांच्या वर हॉटेलचे भाडे आणि २० हजारांच्यावर विमान प्रवासाचे भाडे, असे सुगीचे दिवस भारत-पाक सामन्यानंतर या अंतिम लढतीने आणले आहेत.
एक लाख 32 हजार क्षमता असलेल्या या स्टेडियमची तिकीटविक्री कधीच संपलेली आहे. तरीही येथील अनेक स्थानिकांनीही आशा सोडलेली नाही. भारतीय संघातील मोजके खेळाडू हलक्या सरावासाठी आज मैदानात आले. तर कोलकत्याहून अहमदाबादमध्ये आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टेडियममध्ये आलेच नाहीत. तरीही स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उत्साही प्रेक्षकांचा गलका वाढतच होता. त्यात भर होती पोलिसांची. 10 ते 15 हजार पोलिस आजपासूनच स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत.
जवळपास महिनाभरापूर्वी 15 ऑक्टोबरलाही भारत-पाक सामन्याच्यासाठी अशीच परिस्थिती होती. पण ती मोहीम फत्ते केल्यानंतर आत्ताच्या उत्साहाला विजेतेपदाच्या अपेक्षांची झालर लागली आहे.
मोदी, शहांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे रविवारच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विजेतेपदाचा करंडक पंतप्रधान देणार असल्याचेही खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.
विजेत्या कर्णधारांनाही निमंत्रण
विश्वकरंडक विजेते कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांच्यापासून ऑईन मॉर्गनपर्यंत सर्व कर्णधारांना अंतिम सामन्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. श्रीलंकेचे विजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा हे उपस्थित राहतील का, याबाबत शंका आहे. त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर काही दिवसांपूर्वीच टीका केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.