Ponda- Sanquelim Municipal Council Election Result साखळी पालिकेत झालेले विक्रमी मतदान आणि फोंड्यात घसरलेला टक्का कुणाच्या बाजूने निकाल देणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून दावे-प्रतिदावे आणि पैजा यांना ऊत आला आहे.
आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून उद्या, रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी11 वाजेपर्यंत सर्व प्रभागांचे निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या झालेल्या साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १० प्रभागांकरिता 31 उमेदवार रिंगणात आहेत. इथे सरासरी 87.56 टक्के मतदान झाले असून साखळी हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असल्याने राज्याचे लक्ष या नगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे.
भाजपकडून हा गड जिंकण्यासाठी अनेक प्रकारच्या रणनीती आखण्यात आल्या होत्या. त्या कितपत यशस्वी होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या पालिकेची जबाबदारी घेतली होती आणि युवा मोर्चा, महिला मोर्चासह सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची कामे वाटून दिली होती.
प्रत्येक प्रभागामध्ये मतदार प्रत्यक्ष मतदान करेपर्यंत ही जबाबदारी संबंधितांवर होती. फोंड्यात 2 प्रभागांमध्ये निवडणुकीआधीच आपले उमेदवार निवडून आणण्यात मंत्री रवी नाईक यांना यश आले आहे.
अशी असेल मतमोजणी-
साखळीत प्रत्येक प्रभागात सरासरी 600 मतदार आहेत. साखळीत मतमोजणीसाठी 5 टेबल असून 2 फेऱ्यांमध्ये इथला निकाल हाती येईल. प्रत्येक टेबलवर दोन निवडणूक अधिकारी आणि एक सुपरवायझर यांच्यासह काही राखीव कर्मचारी असतील.
फोंड्यात मतमोजणीसाठी 8 टेबल असतील, तर प्रभाग 1 ते 9 पहिल्या फेरीत मतमोजणी होईल. उर्वरित निकाल दुसऱ्या फेरीत लागतील.
वाढलेले मतदान कोणाच्या बाजूने?
साखळीत ‘टुगेदर फॉर साखळी’ पॅनेलच्या वतीने कडवी झुंज देण्यात धर्मेश सगलानी, राजेश सावळ, प्रवीण ब्लेगन कितपत यशस्वी झाले, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.
अनेक प्रभागांमध्ये 80 टक्क्यांच्या वर तर प्रभाग 7, प्रभाग 11, प्रभाग 12 मध्ये 90 टक्क्यांच्या वर मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघांत चुरस वाढली आहे.
फोंड्यात सायलेंट मतदार घडवणार चमत्कार-
कृषिमंत्री रवी नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या फोंडा पालिकेच्या निवडणुकीत 74.65 टक्के मतदान झाले. 2018 च्या निवडणुकीपेक्षा इथे 2 टक्के कमी मतदान झाले. याचा फायदा कुणाला होणार आणि फटका कुणाला बसेल हे उद्या कळेलच.
मात्र इथेही चुरस कायम आहे. रवी नाईक यांनी आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार, असा दावा ठोकला आहे. तर राजेश वेरेकर यांच्या मतानुसार या पालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात 'सायलेंट' मतदान झाल्याने पालिकेत विरोधी गटाला बहुमत मिळेल असा दावा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.