Mapusa Municipality म्हापसा पालिकेचे तांत्रिक विभागाचे अभियंते कामचुकार असल्याचा गंभीर आरोप करीत सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी अभियंत्यांच्या एकंदरीत कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. हे अभियंते बसून पगार घेतात. पाच पैशांचीही कामे करत नाहीत.
तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत उडवाउडवींची उत्तरे देतात, असा आरोप करत नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी सभागृहात अभियंत्यांच्या चुकांचा पाढाच वाचला.
गुरुवारी म्हापसा पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष विराज फडके, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर उपस्थित होते. मात्र, नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, अॅड. शशांक नार्वेकर हे गैरहजर राहिले.
बांधकाम परवाने नूतनीकरणासंदर्भात प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज हाऊसिंग डेव्हलपमेंटला म्हापसा पालिकेकडे 7 लाख रुपये शुल्क भरण्याचा निवाडा दिला आहे. मात्र, पालिका अभियंत्यांनी शुल्काचे अंदाजपत्रक बनवून हा आकडा 96 लाख इतका प्रस्ताव पालिका मंडळासमोर दिला होता.
याला या बिल्डरने डीएमए व त्यानंतर प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आव्हान दिले. त्यानुसार न्यायाधिकरणाने हे शुल्क जास्त असून राज हाऊसिंग डेव्हलपमेंटने पालिकेकडे फक्त 7 लाख रुपये भरावेत, असा निवाडा दिला. हा निवाड्याचा मुद्दा आजच्या बैठकीत गाजला.
चर्चेअंती या निवाड्यास उच्च न्यायालयात आव्हान न देण्याचे ठरले, तसेच निवाड्यानुसार हे 7 लाख रुपये शुल्क स्वीकारण्याचे ठरले. यावर भिवशेट म्हणाले, अभियंत्यांच्या चुकीमुळे पालिकेला शुल्कास मुकावे लागले.
अभियंत्यांनी आपली कामे व्यवस्थित केली असती तर पालिकेला डीएमए व प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जावे लागले नसते. ज्यांच्या चुकीमुळे 96 लाखांचा आकडा 7 लाखांवर आला, या अभियंत्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
नगरसेविका अन्वी कोरगावकर म्हणाल्या की, दोन वर्षांपूर्वी माझ्या प्रभागात जलस्रोत व साबांखाअंतर्गत कामासाठी प्रस्ताव सादर केले. परंतु, अद्याप ही कामे मार्गी लागलेली नाहीत.
28 दुकानांचा लिलाव
जुन्या बसस्थानकाजवळील आराम सोडा लेनच्या पहिल्या मजल्यावरील 28 दुकानांचा लिलाव करण्याचा ठराव या बैठकीत घेतला. यातील एक दुकान विधवा महिलेसाठी आरक्षित असेल.
त्याचप्रमाणे तीन वर्षाच्या काळासाठी पालिका कार्यालयात 3 कंत्राटी एलडीसी घेण्याचा ठराव घेतला. त्यांना महिन्याला 15 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.
डिसोझांसह पर्रीकरांचाही पुतळा उभारणार
अखिल गोमंतक महासंघ हितवर्धक मंडळाने पालिकेकडे उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस (बाबूश) डिसोझा यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावास पालिका मंडळाने मंजुरी देण्याचा ठराव घेतला.
या मंडळास माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचाही पुतळा उभारण्याची विनंती केली जाईल. जर मंडळाने नकार दिल्यास पर्रीकरांचा पुतळा मी स्वखर्चाने उभारणार, असे नगरसेवक तारक आरोलकर म्हणाले. त्यामुळे हे दोन्ही पुतळे पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
अधिकारी ‘सह्या’जीराव
त्याचप्रमाणे 15 व्या वित्त निधीअंतर्गत प्रत्येक प्रभागाला 15 लाख रुपये मंजूर झाले होते. दोन वर्षांपूर्वी मी या निधीअंतर्गत काही विकास प्रकल्पांचे प्रस्ताव मांडले. निविदा आल्या; परंतु अद्याप काम झालेली नाहीत.
याचाच अर्थ पालिका अभियंते हे सुस्तावले असून ते कामे करत नाहीत. विकासकामाच्या फाईलवर स्वाक्षरी घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जावे लागते, याकडेही भिवशेट यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.