

पणजी: वागातोर समुद्र किनाऱ्याजवळील एका हॉस्टेलमध्ये कार्यरत असलेल्या कथित अमली पदार्थांच्या रॅकेटचा तेलंगणातील विशेष अमली पदार्थविरोधी पथक ‘ईगल फोर्स’ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गोव्याशी संबंधित अमली पदार्थ पुरवठा साखळी उघडकीस आली असून, तेलुगू चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तींनाही कोकेन पुरविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारांसह काही संशयित बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी चक्री, त्याचा सहकारी हर्षित आणि साथीदार सुशील कृष्णा यांनी वागातोर किनाऱ्याजवळील एक हॉस्टेल भाड्याने घेतले होते. या ठिकाणाचा वापर अमली पदार्थांच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी केला जात असल्याचा आरोप आहे. कोकेन, एमडीएमए गोळ्या आणि एलएसडी गोव्यात (Goa) आणले जात होते. त्यानंतर या पदार्थांचा पुरवठा हैदराबादसह विविध शहरांमध्ये केला जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे, ईगल फोर्सला त्यांच्या व्हॉट्स ॲप हेल्पलाईनवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराज्य अमली पदार्थ रॅकेटचे धागेदोरे समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या जाळ्याचा उद्देश केवळ अमली पदार्थांचा पुरवठा करणे नव्हता, तर विविध शहरांतील ग्राहकांचे विस्तृत जाळे तयार करणे, हाही होता. त्यामुळे पुरवठादारांबरोबरच ग्राहकांवरही लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली.
तपास यंत्रणांनी दावा केला की, मुख्य आरोपी चक्री हा तेलुगू चित्रपटसृष्टीशी संबंधित काही व्यक्तींना कोकेन पुरवत होता. मात्र, संबंधित व्यक्तींची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. अधिक तपासानंतर याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणातील प्रमुख पुरवठादार अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये मोहीम राबविण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार, दूरध्वनी संपर्क आणि डिजिटल पुरावे यांची सखोल तपासणी सुरू असून आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. तेलंगणा सरकारच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई केली असून, पुरवठा आणि मागणी या दोन्ही बाजूंवर एकाच वेळी प्रहार करण्याची रणनीती अवलंबल्याचे ईगल फोर्सने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात वागातोर परिसराचा कथित वापर झाल्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडित अमली पदार्थांच्या हालचालींबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात १५ विशेष पोलिस पथकांनी विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत १९ ग्राहकांना अटक करण्यात आली. त्यापैकी १४ जणांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांनी गांजा घटक (टीएचसी) आणि मेथॅम्फेटामाइनसारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. ४४ ग्राहकांची ओळख तांत्रिक विश्लेषण, दूरध्वनी संपर्क नोंदी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास पथकाने सुमारे ४४ ग्राहकांची ओळख पटविली. हे ग्राहक हैदराबाद, सायबराबाद, मलकाजगिरी, फ्युचर सिटी, महबूबनगर आणि निजामाबाद जिल्ह्यांमध्ये पसरल्याचे आढळले. काही ग्राहक इतर राज्यांतील असल्याचाही संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.