

पणजी: २०१३ च्या बलात्कार प्रकरणात दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेला ‘तहलका’चा माजी मुख्य संपादक तरुण तेजपालने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गोवा सरकारला नोटीस जारी केली आहे. गोवा खंडपीठाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या आणि शिक्षेला स्थगिती देऊन अंतरिम जामीन मिळवण्याच्या तेजपाल याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास अंतरिम दिलासा दिलेला नाही. त्यामुळे तेजपालला सध्या कारागृहातच राहावे लागणार आहे.
तेजपालच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय उलटविला आहे.
त्यानंतर उच्च न्यायालयाने यापूर्वी शिक्षेला तात्पुरती स्थगिती देखील दिली होती, असा युक्तिवाद करत त्वरित अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास अंतरिम स्थगिती दिली नाही. याप्रकरणी गोवा सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल याने आपल्या महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. गोव्याच्या सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये पुराव्यांअभावी तेजपालची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात गोवा सरकारने अपील केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल ६ ऑगस्ट रोजी रद्द केला आणि तेजपालला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दरम्यान, गोवा सरकारने देखील तेजपालच्या १० वर्षांच्या शिक्षेत वाढ करून ती जन्मठेपेमध्ये बदलावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.