

पणजी: २०१३ मधील बहुचर्चित बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि ‘तहलका’चा माजी संपादक तरुण तेजपालच्या शिक्षेत वाढ करून ती जन्मठेपेपर्यंत करावी, या मागणीसाठी गोवा सरकारने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने तहकूब केली.
न्यायालयाने ही याचिका तेजपालच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या मुख्य गुन्हेगारी अपिल अर्जासोबत जोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी निश्चित करण्यात आली होती. ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा २०२१ मधील निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द केला होता.
उच्च न्यायालयाने तेजपालला भा.दं.सं.च्या विविध कलमांखाली बलात्कार व गुन्हेगारी हल्ल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने सुनावलेली १० वर्षांची शिक्षा या गुन्ह्याच्या गांभीर्याच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे सांगत, ही शिक्षा वाढवून जन्मठेप करण्यात यावी, अशी मागणी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. पीडितेचे मालक व विश्वासाचे स्थान असलेल्या पदावर असताना तेजपालने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, असा युक्तिवाद सरकारने केला.
दरम्यान, न्यायालयाने तरुण तेजपालला आत्मसमर्पण करण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली असून, २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत ‘सरेंडर सर्टिफिकेट’ सादर केल्यास २२ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या मुख्य अपिलावर सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.