Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Tarun Tejpal Rape Case: न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली.
Tarun Tejpal Rape Case
Tarun Tejpal CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘तहलका’चा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याने बलात्कार प्रकरणात दोषसिद्धी आणि १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणारी दाखल केलेली याचिका तसेच गोवा सरकारने त्याची शिक्षा वाढवून जन्मठेप करण्याची मागणी करणारी याचिका, या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी (१५ ऑक्टोबर) पुढे ढकलली. आता या प्रकरणांची पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. गोवा सरकारने तेजपालच्या याचिकेवरील उत्तर दाखल केल्याची माहिती न्यायालयाला दिल्यानंतर सुनावणी पुढे ढकलली. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरील प्रकरणाच्या स्थितीनुसार, पुढील सुनावणीसाठी ३ नोव्हेंबर ही तात्पुरती तारीख नमूद केली आहे.

Tarun Tejpal Rape Case
Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

तेजपालच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार तेजपालने आत्मसमर्पण केले असून, त्याच्या याचिकेवर लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका सिब्बल यांनी मांडली. तेजपालने १४ सप्टेंबर रोजी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली. तेथे तो १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ६ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये तेजपालची केलेली निर्दोष मुक्तता उच्च न्यायालयाने रद्द केली आणि त्यांना बलात्कार तसेच संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान, लिफ्टमध्ये कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपालवर होता. याप्रकरणी गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला होता.

उच्च न्यायालयाने सुनावलेल्या १० वर्षांच्या शिक्षेवर गोवा सरकारने आक्षेप घेतला आहे. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता ही शिक्षा अपुरी असून, तेजपाल याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

Tarun Tejpal Rape Case
Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

पुढील सुनावणीकडे लक्ष

तेजपालने उच्च न्यायालयाच्या दोषसिद्धीच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका बाजूला दोषसिद्धी आणि शिक्षेविरोधातील तेजपाल याची याचिका, तर दुसऱ्या बाजूला शिक्षा वाढवण्याची राज्य सरकारची मागणी विचाराधीन आहे. दोन्ही याचिकांवरील पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com