Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Tarun Tejpal Life in Colvale Jail: उच्च पदस्थ कारागृह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वा. तेजपालच्या दिवसाची सुरवात होते.
Tarun Tejpal Life in Colvale Jail
Tarun TejpalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एकेकाळी देशातील सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारणारा, वातानुकूलीत कक्षात बसून पत्रकारितेचा गाडा हाकणारा आणि हाय प्रोफाईल जीवनशैलीसाठी परिचित असलेला तरुण तेजपाल आज कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा झालेल्या कैद्यांच्या विभागात इतर कैद्यांप्रमाणेच नियमानुसार दिवस काढत आहे. सकाळी ६ वा. सुरू होणारा त्याचा दिवस आता ठरावीक वेळा, ठरावीक भोजन आणि मर्यादित सुविधांच्या चौकटीतच पुढे सरकतो.

उच्च पदस्थ कारागृह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वा. तेजपालच्या दिवसाची सुरवात होते. ६.३० वा.च्या सुमारास चहा, पाव आदी नाश्ता दिला जातो. सकाळी ८ वा. बराखीतून बाहेर येण्याची मुभा असते. दुपारी १२ वा. जेवण, तर सायंकाळी ५ वा. रात्रीचे जेवण दिले जाते. कारागृहात प्रत्येक कैद्याचा आहार त्याचे वय, वजन आणि आरोग्य यांचा विचार करून निश्चित केला जातो. तेजपाललाही त्याच नियमानुसार भोजन दिले जाते. म्हणजेच बाहेरच्या आयुष्यातील पसंती-निवडींनुसार नव्हे, तर कारागृहाच्या नियमांनुसार ठरणारे भोजन आणि दिनक्रम हा त्याच्या सध्याच्या जीवनाचा भाग झाला आहे.

Tarun Tejpal Life in Colvale Jail
Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

सकाळच्या भेटीत वकिलाशी चर्चा

गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या सुमारास एक वकील तेजपालच्या भेटीसाठी कारागृहात येत आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर वकिलाने तेजपालला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला कोण भेटण्यासाठी आले आहे, याची माहिती तेजपालला दिली जाते. तेजपालने भेटीस संमती दिल्यानंतर वकिलाची ओळख तपासली जाते. त्यानंतर तळमजल्यावरील एका खोलीत दोघांना २० मिनिटे चर्चा करण्याची परवानगी दिली जाते.

कच्च्या कैदेतला मुसा पुन्हा शेजारी

तेजपाल कच्चा कैदी असताना त्याच्या खोलीत मुसा नावाचा एक कैदी होता. आता शिक्षा झाल्यानंतरही योगायोगाने मुसा नावाचाच कैदी त्याच्या शेजारी आहे. दिवसभरात अधूनमधून दोघे एकमेकांशी बोलताना कारागृह कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येतात.

उंचावरचा टीव्ही, हातात पुस्तके

बराखीत उंचावर एक दूरचित्रवाणी संच लावण्यात आला आहे. तेजपाल अधूनमधून टीव्ही पाहतो आणि विशेषतः चित्रपट पाहण्यास त्याची पसंती असल्याचे कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. कारागृहात येताना न्यायालयाच्या परवानगीने तो काही पुस्तके सोबत घेऊन आला होता. मोकळ्या वेळेत तो या पुस्तकांचे वाचन करतो. त्याच्या शेजारील खोलीत लुथरा बंधू आणि अजय गुप्ता हेही असून ते वाचन करत असल्याचे सांगण्यात येते.

Tarun Tejpal Life in Colvale Jail
Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

काम करण्याची तयारी अद्याप नाही

शिक्षा झालेल्या कैद्यांना कारागृहात उपलब्ध असलेले काम करण्याची संधी दिली जाते आणि त्यासाठी नियमानुसार मोबदला मिळतो. मात्र, तेजपालने आपल्याला कारागृहात काम द्यावे, अशी मागणी अद्याप प्रशासनाकडे केलेली नाही. त्यामुळे सध्या तो कारागृहातील कोणतेही काम करत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

बदललेल्या आयुष्याचे कारागृहातील चित्र

पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव, प्रसिद्धी आणि प्रभाव मिळवलेल्या तेजपालच्या आयुष्यातील सध्याचे चित्र मात्र पूर्णपणे वेगळे आहे. वातानुकूलीत कक्षातील आरामदायी जीवनापासून बराकीतील नियमानुसार जीवनापर्यंतचा हा प्रवास त्याच्या दैनंदिन दिनक्रमातून स्पष्ट दिसतो. पूर्वी आपल्या वेळेचा आणि कामाचा निर्णय स्वतः घेणाऱ्या व्यक्तीचा दिवस आता सकाळी ६ वा. सुरू होतो आणि कारागृहाच्या वेळापत्रकानुसार पुढे सरकतो.

Tarun Tejpal Life in Colvale Jail
Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

चहा-पावची वेळ निश्चित, जेवणाची वेळ निश्चित, बराखीतून बाहेर पडण्याची वेळ निश्चित आणि भेटीगाठींसाठीही ठरलेली प्रक्रिया. झोपण्यासाठी आवश्यक तेवढीच सामग्री, मनोरंजनासाठी बराखीतला टीव्ही आणि वेळ घालवण्यासाठी पुस्तके-याच चौकटीत सध्या तेजपालचे दिवस सरत आहेत. एकेकाळी ज्याच्या लेखणीने देशातील सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ केले, त्या पत्रकाराच्या आयुष्यात आज लेखणीपेक्षा पुस्तके, कार्यालयापेक्षा बराक आणि स्वतःच्या वेळेपेक्षा कारागृहाचे वेळापत्रक अधिक ठळक झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com