पणजी (Panjim): स्वस्तिक आयोजित व प्लॅनेट मराठी प्रस्तुत दशकपूर्ती स्वरमंगेश संगीत महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी, गोव्याच्या युवा प्रतिभेच्या गायिका मुग्धा गावकर व प्राची जठार (सहगायन), नंदिनी शंकर (व्हायोलीनवादन), कुमारवयीन गायिका श्रीमोयी आचार्या व रंजनी आणि गायत्री (कर्नाटकी शास्त्रीय गायन) यांच्या मैफलींनी रंग भरला.
मुग्धा व प्राची यांनी परमपुरुष नारायण... या चौतालातील बंदिशीने गायनाला प्रारंभ केला व नंतर पटदीपराग आळविला. मधुर आलापी, रसिली बोलआलापी, तानेतील फिरत व भावपूर्ण पेशकश यामुळे त्यांनी रसिकांची दाद घेतली. त्यांना दत्तराज सुर्लकर व ऋषिकेश फडके यांनी पुरक साथ दिली. नंदिनी शंकर यांनी व्हायोलीनवर शामकल्याण राग विलक्षण तयारीने वाजविला. वादनातील नजाकतही अत्यंत प्रभावी होती.
मिश्र पिलू रागातील ‘रघुवीर तुमको मेरी लाज’ हे भजन व ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग त्यांनी विविध स्वरछटांनी पेश करून रंगत आणली. त्यांच्या वादनाला उत्स्फुर्त दाद लाभली. त्यांना युवा तबलापटू ईशान घोष यांनी वादनाच्या अंगाने बहारदार तबलासाथ दिली. श्रीमोयी हिने मारू बिहाग राग छान आळविला. तिचा आलापीतील आर्त भाव, बोलआलापीतील रसपूर्णता, दमदार सरगम व प्रभावी तानक्रीया याने रसिकांना मनमुराद आनंद दिला. तिला डॉ. उदय कुलकर्णी (तबला) व चिन्मय कोल्हटकर (संवादिनी) यांनी रंगतदार साथ दिली.
रसिकांना भावली रंजनी व गायत्री यांची पेशकश
रंजनी व गायत्री या भगिनींच्या कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या मैफलीने छान वातावरण निर्मिती केली. नाटई रागाने त्यांनी गायनाला प्रारंभ केला. रसपरिपोषक आलापी व लयकारीचा आनंद देत केलेली सरगम व एकूणच रसिली पेशकश रसिकांना भावली. नंतर त्यांनी तोडी राग पेश केला. त्यांनी हुसेनी रागात राम वनवासाला जातांना सीतेची भाववस्था व्यक्त करणारी रचनाही पेश केली. त्यातील आर्तता रसिकांना थेट भिडली. के. साई गिरीधर (मृदंगम) व एल. रामकृष्णन (व्हायोलीन) यांची उत्तम साथ त्यांना लाभली. रागम तालम पल्लवी या कर्नाटक शैलीतील प्रमुख अंगाच्या रचनेने त्यांनी छान माहोल निर्माण केला. हेतल गंगानी व नम्रता वायंगणकर यांनी सूत्रसंचालन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.