सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. सावंत सरकारमधील मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सरन्यायाधीशांचे स्वागत केले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबरोबर न्यायमूर्ती प्रसन्ना बी. कराळे आणि न्यायमूर्ती संजय करोळ देखील गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते मेरशी येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा व सत्र न्यायालय संकुलाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत उद्धाटन करण्यात आले.
मेरशीतील जिल्हा व सत्र न्यायालय संकुलाच्या उद्घाटनानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राजभवनात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी 'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे प्रकाशन केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. भाषणादरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, 'TRADITIONAL TREES OF BHARAT' या पुस्तकात भावी पिढ्यांना शिक्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. अन्य भारतीय भाषांसह हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात यावे.'
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, ''सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे कोकणी मराठीसह इतर भाषांमध्येही अनुवादीत होतील. आतापर्यंत आम्ही 37,000 निवाडे अनुवादीत केले आहेत. या निवाड्यांचे डिजिटायझेशन आणि अनुवादन करुन आम्ही एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.''
सरन्यायाधीश पुढे असेही म्हणाले की, 'आर्बीट्रेशन केंद्रासारख्या माध्यमातून जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनण्याची गोव्याकडे क्षमता आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे आणि आदेश स्थानिक भाषामध्ये उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.'
आम्ही न्यायिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहोत. न्यायाचे दरवाजे सर्वांसाठी खुले राहतील याची खात्री करणे सरकार आणि न्यायपालिकेचे प्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. न्यायपालिकेला आम्ही सर्वतोपरी पाठबळ देत राहू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.