
पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणात घडलेल्या घोटाळ्यासंबंधी आणि तत्कालीन मंत्री गोविंद गावडे यांच्या वृत्तीविरुद्ध वारंवार आवाज उठवणाऱ्या ‘कला राखण मांड’ या कलाकारांच्या संघटनेने पत्रकार परिषद घेतली. गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून कमी केले, तरी कला अकादमीसंबंधीचे प्रश्न आहेत, त्यावर सरकारने योग्य तोडगा काढल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असे कलाकारांनी जाहीर केले.
‘कला राखण मांड’चे निमंत्रक देविदास आमोणकर म्हणाले, की गावडे यांच्याकडून कला अकादमीच्या नूतनीकरणासंबंधी झालेल्या गैरकारभाराचा अजिबात हिशेब न घेता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना मंत्रिपदावरून हटविणे, ही एक ‘दुर्घटना’च आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च झाला असून भविष्यातही हा खर्च वाढणार, अशी अटकळ आहे.
अशावेळी या गैरकारभाराला कारणीभूत असलेल्या गावडे यांना काढून टाकणे म्हणजे सरकारने त्यांना लपविण्यासारखेच आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणात जो पैशांचा प्रचंड गैरव्यवहार झाला, त्याला एकटे गावडे कारणीभूत नव्हते, असेही आमोणकर म्हणाले. गावडे यांचा दबाव दूर झाला असल्याने या आंदोलनात गोव्यातील इतर कलाकारांनीही न घाबरता सामील व्हावे, असे आवाहनही आमोणकर यांनी केले.
गावडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना कला अकादमी आणि फोंडा रवींद्र भवनच्या अध्यक्षपदावरून पायउतार केले गेले आहे व त्यातून या क्षेत्रात चाललेली एकाधिकारशाही आता संपली आहे अशी आम्ही अपेक्षा करतो, असे संदेश प्रभुदेसाई म्हणाले.
कला अकादमीच्या सल्लागार मंडळावर तसेच कार्यकारी मंडळावर कलाकारांना स्थान दिले जावे, अशीही मागणी प्रभुदेसाई यांनी केली. ज्याप्रकारे कोकणी अकादमी, मराठी अकादमी, दाल्गाद अकादमी तसेच तियात्र अकादमी या स्वायत्त संस्था राजकारणीविरहित समित्यांद्वारे (कला क्षेत्रातील व्यक्तींद्वारे) चालवल्या जातात, त्याचप्रकारे कला अकादमीही चालविली जावी, अशी मागणी त्यांनी केली. गावडे अध्यक्ष पदावर असताना त्यांनी कुठल्याही समितीशिवाय कला अकादमीचा कारभार मनमानी पद्धतीने एकहाती चालवला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘कला राखण मांड’चे सुपारी आंदोलन सुरूच राहील, असेही ‘कला राखण मांड’ने यावेळी जाहीर केले. तसेच गावडे यांचे मंत्रिपद जाणे ही कला अकादमीच्या पुनरुज्जीवन होण्याच्या प्रक्रियेतली एक साधीशी घटना आहे, असेही ‘कला राखण मांड’चे म्हणणे आहे.
कला आणि कलाकारांबाबत राज्य सरकार किती असंवेदनशील आहे, हे कला अकादमी तसेचमडगाव व काणकोण येथील रवींद्र भवनांचे उदाहरण घेता लक्षात येते. महिनोन महिने ही मुख्य नाट्यगृहे बंद राहणे म्हणजे तियात्र तसेच इतर व्यावसायिक कलाकारांना उपाशी ठेवण्यासारखे आहे हे सरकारच्या लक्षात येत नाही का, असा प्रश्न ‘कला राखण मांड’ने उपस्थित केला आहे.
कला अकादमी तसेच राजीव गांधी कला मंदिरचे अध्यक्ष म्हणून गावडे यांचा कार्यकाल खरे तर एप्रिल महिन्यातच संपला आहे. नवीन अध्यक्षांसंबंधी फाईल अद्याप सरकारसमोर पडून आहे. त्यावर कार्यवाही झालेली नाही. म्हणजेच, एका अर्थाने गेले दोन महिने गावडे यांचा कला अकादमीच्या कारभारातील हस्तक्षेप हा बेकायदेशीर होता का, हा प्रश्नही या निमित्ताने उदभवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.