
धारगळ येथे सनबर्न ईडीएम फेस्टीव्हल विरोधात जोरदार आंदोलन स्थानिक लोकांनी उभारले होते. त्यांच्या आंदोलनाला आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपला पाठिंबा दिला होता. जेथे लोक तेथे मी, अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यांची ही भूमिका विरोधकाची होती, की मतदारांना खूष करण्यासाठी हे गुलदस्त्यातच आहे. उच्च न्यायालयात सनबर्न गेल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी आमदार आर्लेकर आक्रमक दिसले नाहीत. त्यामुळे सनबर्न आयोजकांनी त्यांनाही गुंडाळले की काय? सरकारने त्यांच्यावर दबाव आणला अशी चर्चा केली जात आहे. नेहमीच सनबर्न फेस्टीव्हलला विरोध होतो. मग तो कोठेही झाला, तरी विरोध हा ठरलेला असतो. हा फेस्टीव्हल दक्षिण गोव्यात नेण्याचे आयोजकांनी ठरवले, मात्र त्यांना तो उत्तरेतच व्हायला हवा. त्यासाठी त्यांनी उत्तरेतील आमदारांना हाताशी धरले. या आमदारांनी आमंत्रणही दिले, मात्र अखेर त्यात त्याला यश आले नाही. धारगळ येथे सनबर्न फेस्टीव्हलच्या नावाने तेथे खरेदी केलेल्या जमिनींना भाव मिळावा व संबंधित कसिनो कंपनीला लाभ मिळवून देण्याचे हे षडयंत्र असू शकते, असा अनेकांचा संशय आहे. ∙∙∙
भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक यांची सध्या फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी यांच्याशी बरीच जवळीक झाल्याचे दिसत आहे. अशोकराव हे एकेकाळी कृषिमंत्री रवी नाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. रवी मुख्यमंत्री असताना अशोकराव दक्षिण गोवा व फोंडा अशा दोन पीडीऐचे चेअरमन होते, हे लोक आजही विसरलेले नाहीत. पण भंडारी समाजात सध्या सुरू असलेल्या राजकारणामुळे त्यांच्यात '' दूरी'' निर्माण झाली आहे. आता त्याचीच परिणीती कदाचित दळवींच्या जवळ येण्यात झाली असावी. आता याचा दळवींना फायदा होतो, की नुकसान होते, हे सांगणे कठीण असले, तरी आज सुद्धा भंडारी समाजातील बहुतेक लोक रवींनाच आपला नेता मानतात, हे दळवी यांनी विसरता कामा नये. हे आम्ही नाही बोलत हो... फोंड्यातील भंडारी समाजातील लोकच, असे बोलताना ऐकू येते... आता बोला. ∙∙∙
मायकल लोबो यांच्या घरी नाताळ उत्सव जोरात साजरा झाला. अनेक राजकीय नेत्यांनी, आमदार आणि मंत्र्यांनी हजेरी लावली. एवढेच काय, तर पेडणेचे उपजिल्हाधिकारी देखील लोबोंच्या घरी नाताळ साजरा करायला गेले होते. सरकारी अधिकारी राज्यकर्त्यांच्या जवळ असतात, हे तर माहीतच आहे. पण या भेटीमुळे जनमानसात वेगवेगळी चर्च रंगत आहे. मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या फेसबुकवर फोटो टाकला असून यात पेडणेचे उपजिल्हाधिकारी दिसल्यानंतर त्यांचा हा फोटो पेडणे तालुक्यात सर्वत्र ‘व्हायरल’ झाला आहे. विविध चर्चांना या फोटोमुळे उधाण आले असून या दोघांचे नाते काय? हा प्रश्न चर्चेत आहे. ∙∙∙
पर्यटन हंगामात सध्या विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढली असून व्यावसायिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र विदेशी पर्यटक कायद्यांचे उल्लंघन करत असल्याने हरमलमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी विदेशी पर्यटक बुलेट घेऊन हरमल भागात चालवत असताना लोकांनी पहिले, दुचाकीची नंबरप्लेट जीए११, सी ३० एवढीच होती. अन्य दोन क्रमांकावर पर्यटकाने कदाचित स्टिकर लावला असावा किंवा चोरीची दुचाकी असू शकते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. पण या परिसरातील पोलिस मात्र गप्पच होते. हरमलमध्ये एक किलोमीटरच्या पट्ट्यात तीन जागी वाहतूक व पोलिस खात्याचे अधिकारी चलनसाठी उभे असतात, मात्र अशा बदल केलेल्या दुचाकी चालवणाऱ्या पर्यटकांना पोलिस सोडून देतात आणि स्थानिकांच्या गाड्यांना वेगवेगळी कारणे दाखवून चलन देतात. त्यामुळे हरमल भागात घडलेली ही घटना मांद्रे पोलिसांच्या व्यवहारात ‘कुचे तो गडबड है! असे स्पष्ट करत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. ∙∙∙
सरकार दबाव टाकत असल्याची चर्चा गोव्यात सध्या जोर धरू लागली आहे. ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीही असे विधान करून चर्चेला नवीन वळण दिले आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करणे, काही नवीन नाही, परंतु आता सरकारला समर्थन करणारे काही लोकही खुलेआम प्रश्न उपस्थित करू लागल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. लोकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, की जर सरकार मोठ्या नेत्यांवर दबाव टाकत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय होईल? आम्ही आमच्या आमदाराला निवडून दिले आहे, परंतु तो कुठल्या चुकीच्या दिशेने तर जाणार नाही ना? आणि चुकीच्या दिशेने गेला तर आम्ही विरोध करणार, त्यानंतर माझा आमदार माझ्या विरोधात जाऊन पालेकरसारखी परिस्थिती तर करणार नाही नाय़ अशी धास्ती लोकांनी वाटत आहे. ∙∙∙
म्हापसा पालिका मंडळावर भाजपप्रणित आघाडीचे वर्चस्व आहे. यंदा पालिका नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षित असल्याने अलिखित करारानुसार मागील तीन वर्षांत तिसरा बदल झाला. मात्र, विद्यमान चेहऱ्यास सत्ताधारी पक्षातीलच अनेकांकडून अपेक्षित असे सहकार्य या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून मिळत नाही, हे बघणाऱ्या वाटते. माध्यमांना देखील ते वेळोवेळी भासते. कारण पालिका बैठकीत कितीजण खुर्चीवर विराजमान सदस्याच्या पाठीशी ठामपणे उभे असतात व कितीजण नाही, हे स्पष्टपणे दिसते. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, हाच विषय म्हणे स्थानिक आमदारांकडे नाताळनिमित्त मांडण्यात आला. आता आमदारांनी ही कैफियत ऐकून घेतली असून, नवीन वर्षांत यावर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन कैफियत मांडणाऱ्या संबंधित व्यक्तीला दिले. आता लोकप्रतिनिधींना सर्वांमध्ये समेट घडवून आणतात की नाही, हे वेळप्रसंगी समजेलच. कारण यापूर्वी अनेकदा हा मुद्दा सत्ताधारी गटात चर्चेला आला होता, परंतु अद्याप हा तिडा सुटलेला नाही हेच खरे... ∙∙∙
जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला केरळमधून पकडून गोवा पोलिसांनी गोव्यात आणले. त्याची सखोल चौकशी सुरू आहे, असे पोलिस सांगत असले, तरी त्यांच्याकडून काही माहितीच उघड होत नाही. गोव्यात आणण्यापूर्वी त्याला केरळमध्येच पोलिसी हिसका दाखवून पलायनच्या काळात त्याने आठवेळा ठिकाणे बदलली असे वदवून घेतले आहे. पोलिसांना शोध घेण्यास लागलेल्या उशिराचे अपयश झाकण्यासाठी ही माहिती दिली आहे. तो नऊ दिवसाच्या काळात तीन - चार राज्यात वास्तव्य करून होता, ही पोलिसांची ‘थेरी’ आहे, ती कितपत सत्य आहे, ते पोलिस किंवा संशयित सिद्दीकी जामिनावर सुटल्यानंतर सांगू शकतो. एका पोलिसामुळे बदनाम म्हणून पोलिस खात्याला दोष देता येत नाही, असे स्पष्टीकरण पोलिस महासंचालकांनी केले आहे. मात्र असे कलंकित पोलिस अधिकारी दोषी आढळूनही पोलिस खात्याच्या सेवेत आहेत, त्याचे काय? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.