Goa Politics: खरी कुजबुज: ...म्हशींचाही संप?

Khari Kujbuj Political Satire: राज्यात सध्या जी काही प्रकरणे गाजत आहेत. राजकीय चर्चांना ऊत आला आहे, त्याचा जर कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तर असे जाणवते मुख्यमंत्री बदलणार? की तेच कायम राहणार?
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

...म्हशींचाही संप?

वेस्टर्न बायपास रस्ता सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खुला केल्यावर दक्षिण गोव्यातील जनतेला आनंदाची उकळी फुटणे साहजिकच, पण म्हशींनाही आपले म्हणणे मांडावे, असे वाटले तर नाही ना? कारण रात्रीच्यावेळी या नव्याने उद्‍घाटन केलेल्या बगल रस्त्यावर म्हशींचा कळप दिसला. शेत जमीन बुजवून हा रस्ता बांधला गेला आहे. आमची चरण्याची जागा तुम्ही बळकावत असाल, तर आम्ही रस्त्यावर ठाण मांडून आमचा निषेध का व्यक्त करू नये? असे तर त्यांनी ठरविले नाही ना ?∙∙∙

राजकीय गोटात चर्चा

राज्यात सध्या जी काही प्रकरणे गाजत आहेत. राजकीय चर्चांना ऊत आला आहे, त्याचा जर कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तर असे जाणवते मुख्यमंत्री बदलणार? की तेच कायम राहणार? याबाबत स्थानिक आमदार देखील अनभिज्ञ असून ज्या काही राजकीय चर्चांना उधाण आले आहे, त्या सरकारमधील मुख्य घटकांद्वारे बातम्या पेरल्या जात आहेत. सारे विकल्प चाचपडून पाहिले जात आहेत, अशा राजकीय गोटात चर्चा आहेत. ∙∙∙

...रेती माफिया घाबरले!

या दिवसात बेकायदा रेती उत्खनानाविषयी सातत्याने बातम्या येत असल्याने रेती माफिया बरेच घाबरले आहेत. वास्तविक न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा रेती काढणाऱ्याला जबर दंड आणि अटकही होऊ शकते, त्यामुळेच सध्या तरी नको रे बाबा ते झंझट, असाच पवित्रा रेती माफियांनी घेतला आहे. एरव्ही मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदा रेतीवाहू ट्रकाची वाहतूक जोरात सुरू असते, पण या दिवसांत ही रेती वाहतूक बंद आहे, की काय, असा सवाल लोकच करतात, कारण मध्यरात्रीनंतर रस्त्यावर रेतीवाहू ट्रक काही दिसत नाहीत ना! ∙∙∙

क्राईम ब्रँच पोलिसांत जल्लोष

क्राईम ब्रँचच्या पोलिस कोठडीतून जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने पलायन केल्यापासून पोलिस खात्याची नाचक्की झाली होती. त्याला पलायन करण्यास मदत करणारा पोलिस कॉन्स्टेबल्सच असल्याने पोलिस किती लालसी असू शकतात, याची सीमारेषाच त्यांनी ओलांडली होती. सुलेमानला पुन्हा अटक करण्यासाठी गेले दहा दिवस पोलिस कर्मचारी मात्र शेजारील राज्यांमध्ये त्याचा शोध घेत होते. केव्हा संशयित सुलेमान हाती लागतो, याचाच ध्यास पोलिस अधिकाऱ्यांसह त्याच्या मागावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही लागला होता. राज्याबाहेर असलेली पोलिस पथके दिवसरात्र त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. दरदिवशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून केलेल्या तपासाचा आढावा घेत असल्याने क्राईम ब्रँच पोलिस व उत्तर गोवा पोलिसाच्या पथकांची झोप उडाली होती. गोवा पोलिसांनी संशयित सुलेमान याच्यासंदर्भात दिलेली माहिती खरी ठरल्याने व तो केरळ पोलिसांच्या ताब्यात आल्याचे कळताच गोवा पोलिसांनी जल्लोष केला. अखेर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले होते. ∙∙∙

नापास नाही, पद्धत ‘नापास’!

योग्य नियोजन, योग्य अंमलबजावणी व योग्य वेळ व मेहनत घेतली नाही, तर हाती घेतलेले काम फसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशात २०१० साली राबविलेली नापास नाही, ‘नो डिटेंशन पॉलिसी’. देशातील शिक्षण हक्क कायदा अंमलात आला आणि या कायद्याप्रमाणे पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करता येणार नाही किंवा विद्यार्थी नापास होणार नाही, याची दक्षता शिक्षकांना घ्यायची होती. मात्र या पद्धतीचा गैर फायदा विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही घेतला आणि ही पद्धत ‘फेल’ म्हणजे ‘नापास’ ठरली. आता केंद्र सरकारने पाचवी ते आठवीपर्यंत हे विद्यार्थी शिकत नाहीत, नापास होतात. त्यांना एक पुरवणी परीक्षा द्यावी व त्या परीक्षेत नापास झालास, त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवावी, अशी दुरुस्ती कायद्यात करण्यात आली आहे, याचा अर्थ सरकारने सुरू केलेली ‘नो फेलियर पद्धत’ दहा वर्षांनी फेल झाली असेच, म्हणावे लागेल. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: ..'मंत्रिमंडळ फेरबदल' आताच होणार असे नाही! तानावडेंच्या प्रतिक्रीयेमुळे चर्चांना पूर्णविराम

‘त्या’ अभियंत्याला अधिकार कोणी दिला?

रक्षकच जर भक्षक बनले, तर त्याचा दोष कोणाला देणार? दवर्ली पंचायतीने मडगाव-दवर्ली सीमेवर असलेल्या रस्त्याच्या कडेला उभे राहिलेले बेकायदेशीर गाडे हटविण्याचे काम पंचायतीने हाती घेतले आहे. त्याची प्रशंसा होत आहे, मात्र मडगाव पालिकेचे कार्यकारी अभियंते विनय देसाई यांच्या पचनी ही बाब पडली नसावी. दवर्ली पंचायतीचे सरपंच व भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते साईश राज्याध्यक्ष यांनी असा दावा केला आहे, की बेकायदेशीर गाडे न हटवण्यासाठी त्यांच्यावर म्हणे मडगाव पालिकेचे अभियंते विनय यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे विनय यांनी यासाठी दवर्ली पंचायतीला सहकार्य करण्याची गरज होती, शिवाय दवर्ली पंचायतीचा कित्ता गिरवून मडगाव पालिकेने ही अशीच मोहीम राबविणे गरजेचे होते. आता दवर्ली पंचायतीने बेकायदेशीर गाडे हटविले तर मडगाव पालिकेचे अभियंते विजयचे काय कनेक्शन ते विनयच सांगू शकणार. हल्लीच पालिकेत विनय याला एका नगरसेवकाने मारहाण केली होती, आता नव्या वादात विनय सापडले आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Suleman Khan Arrest: 14 पथके, 70 पोलिस, 3 राज्ये; वाचा 'सुलेमान'च्या अटकेचा घटनाक्रम

कला अकादमीच्या स्पर्धा

कला अकादमीने शालेय व महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा यंदा फोंड्यात घेतल्या. या दोन्ही स्पर्धांच्या तांत्रिक अंगांत समाधानकारक सुधारणा झाल्याचे स्पष्ट दिसून आले. कला अकादमीची मोडतोड व मध्यंतरी कोविड अशा अनेक कारणांनी मुलांची ही स्पर्धा बंद झाली होती. नवनवीन संहिता व विशेष करून स्वतंत्र संहिता येणे गरजेचे आहे. लेखनात भाषाशुध्दी नसणे व वाचिक अभिनय पुरेसा नसणे, हा एक रंगमंच रोग झाला असून रोगांच्या यादीतून त्याचे नाव गेल्यात जमा आहे. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत परीक्षक नेमताना जरा विचार व्हावा, अशी तज्ञांची मागणी आहे. ऐतिहासिक नाट्य स्पर्धेत योग्यतेच्या निकषावर आधीच वादग्रस्त ठरलेल्या परीक्षकाला कला अकादमीनेही नियुक्त करून काय साधले? हे कळणे मात्र मुश्कील. तथापि ‘अ’ गट नाट्य स्पर्धा लवकरच सुरू होत असून ध्वनियंत्रणा विषयी कांगावा करणाऱ्या संस्थांनी मूग गिळून गप्प बसून स्पर्धेसाठी पणजी कला अकादमीच स्वीकारली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com