Camurlim Sunburn Festival Dispute
म्हापसा: सनबर्न महोत्सवासाठी आयोजकांनी कामुर्ली कोमुनिदादकडे जागेची मागणी केली आहे. मात्र, कामुर्लीत सनबर्नचे आयोजन नको, या मागणीसाठी सध्या स्थानिक एकवटले असून त्यांनी शनिवारपासून गावात स्वाक्षरी मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. ‘आमका नाका सनबर्न’ असे म्हणत जमलेल्या ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. आजच्या बैठकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण गावात ही मोहीम राबवून नंतर हे निवेदन मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, स्थानिक आमदार तसेच खासदारांना देण्यात येणार आहे.
माजी सरपंच शरद गाड म्हणाले की, लोकांनी पुढे येऊन या महोत्सवाच्या विरोधात आवाज उठवावा. यात माझा वैयक्तिक स्वार्थ नाही. गावाच्या सुरक्षेसाठी लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन गाड यांनी केले. ते म्हणाले की, पर्यटकांना याठिकाणी आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न केला फक्त रहिवासी वसाहती, डोंगर आणि नैसर्गिक संपदा आहे, असेही ते पोटतिडकीने म्हणाले.
सनबर्न आयोजकांनी कामुर्ली कोमुनिदादशी संपर्क साधला आहे. कोमुनिदादने या प्रस्तावावर चर्चेसाठी ६ ऑक्टोबरला सर्वसाधारण सभा बोलावली आहे. सुमारे १.३० लाख चौरस मीटर जमीन या फेस्टिव्हलसाठी संभाव्य जागा म्हणून निवडली आहे. त्यामुळे सहा तारखेच्या सभेत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कामुर्ली गाव नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे. वनश्रीने हा गाव नटला आहे. गावची नैसर्गिक संपदा आम्ही उद्ध्वस्त करू देणार नाही. स्थानिकांनी राजकारणासाठी हे पाऊल उचललेले नाही किंवा राजकारण करून स्वतःची पोळीही भाजायची नाही. गावपण टिकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शरद गाड, माजी सरपंच, कामुर्ली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.