पक्षश्रेष्ठींनी शब्द पाळला: सुदिन ढवळीकर

नीलेश काब्राल हे शपथविधी सोहळ्याकडे फिरकलेच नाहीत.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: भाजप सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना घेण्याला अनेक आमदार आणि पक्षाच्या नेत्यांचा कडवा विरोध होता. मात्र, बिनशर्त पाठिंबा दिलेले मगोपचे शिलेदार सुदिन ढवळीकर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता बराच काळ मौन पाळले होते. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पहिले स्थान दिल्याने सुदिनबाब खूष होते. शपथविधीनंतर ‘पक्षश्रेष्ठींनी शब्द पाळला’, हे एकच वाक्य ते सतत उच्चारत होते. कदाचित त्यांच्या मौनाच्या पाठीमागचे हेच रहस्य असू शकते. उलट सुदिनना मंत्रिमंडळात घेण्यास विरोध करणाऱ्या गटाचे नेते बाबूश मोन्सेरात हे मात्र काहीसे अस्वस्थ दिसत होते. त्याशिवाय मंत्री रवी नाईक, गोविंद गावडे, नीलेश काब्राल हे कालच्या शपथविधी सोहळ्याकडे फिरकलेच नाहीत. यामुळे त्यांची मनोभूमिका काय असेल, हे वेगळे सांगायची गरज नाही, असाही सूर समारंभस्थळी उमटत होता. ∙∙∙

Sudin Dhavalikar
Goa: भूखंडांना सुविधा पुरवून विक्री, हे वितरण नाही!

सरपंचांवर नस्ती आफत!

बार्देश तालुक्यातील मयडेच्या भाजपसमर्थक पंच रिया बेळेकर आणि तृणमूल काँग्रेसचे समर्थक असलेले उपसरपंच ओस्वाल्ड कोर्देरो यांना पदच्युत करण्यासाठी मागच्या विधानसभा निवडणुकीतील हळदोणे मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार महेश साटेलकर यांनी सध्या पुढाकार घेतलेला आहे.

त्या निवडणुकीत सरपंच बेळेकर यांनी भाजपचे उमेदवार ग्लेन टिकलो यांना पाठिंबा दिला होता, तर उपसरपंच ओस्वाल्ड कोर्देरो यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार किरण कांदोळकर यांना पाठिंबा दिला होता. आश्चर्याची बाब म्हणजे, काँग्रेसचे उमेदवार कार्लुस फरेरा आमदारपदी निवडून आल्यानंतर कोर्देरो यांनी घुमजाव करीत ते सध्या फरेरा यांच्याभोवती घुटमळत आहेत. काही का असेना, विधानसभा राजकारणामुळे काहीजणांची सरपंच, उपसरपंच ही पदे धोक्यात आली आहेत. त्या निवडणुकीत प्रचारकार्य केल्याने नस्ती आफत स्वत:वर ओढवून घेतली, अशी सध्या पंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधींची भावना झाल्याचे ऐकिवात आहे.∙∙∙

ट्रेड परवान्याचे कोडे

पणजी महापालिकेसह अन्य नगरपालिकांत ट्रेड परवान्यासाठी अर्ज केला की पंधरवडा ते महिनाभरात तो हाती मिळतो. पण व्यापारी राजधानी असलेल्या मडगावची तऱ्हाच वेगळी. तेथे सहा सहा महिने उलटले तरी केलेल्या अर्जाची दखलच घेतली जात नाही. अर्जदार चौकशीसाठी आला तर प्रत्येकवेळी वेगवेगळ्या सबबी सांगितल्या जातात. एकीकडे मुख्याधिकारी असे परवाने घेण्याचे आवाहन करतात, बाजार निरीक्षक दुकाने तपासून परवाना नसल्याने ती सील करण्याची धमकी देतात, तर तिसरीकडे पालिकेतील कर्मचारी परवाने देण्यास टाळाटाळ करतात. मग व्यावसायिकांनी काम-धंदा सोडून पालिकेत हेलपाटे मारत राहायचे काय? असा सवाल ते करत आहेत. ∙∙∙

शपथविधीसाठी गर्दी

आज झालेल्या शपथविधी सोहळ्याला सामान्य नागरिकांची अमाप गर्दी होती. यात फोंडा आणि थिवीकर नगण्यच होते. मात्र, राजधानी पणजीपासून सुदूर असलेल्या सांगेमधून या शपथविधी सोहळ्याला गाड्याच गाड्या भरून लोक आले होते. त्याचा प्रत्यय आजच्या शपथविधी सोहळ्यातही आला. सुदिन ढवळीकर यांच्या शपथविधीनंतरच सभागृहात मागून थोड्या टाळ्या वाजल्या, तर नीळकंठ हळर्णकर यांच्या शपथविधीनंतर पुढून थोड्या टाळ्या वाजल्या. मात्र, सुभाष फळदेसाई यांच्या शपथविधीनंतर सभागृहात टाळ्यांचा अक्षरश: कडकडाट झाला. यावरून या सोहळ्याला त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय होती, हे स्पष्ट झाले. सांगे तालुक्याला अनेक वर्षांनंतर मंत्रिपद मिळाल्याचा हा परिणाम असू शकतो. ∙∙∙

समारंभावर सुभाषची छाप

शनिवारी सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई या तीन मंत्र्यांनी शपथ घेतली तरी सर्वांत अधिक चर्चेत राहिले ते सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई हेच. प्रत्यक्षात सुभाष हे शपथ घेणारे तिसरे आणि शेवटचे मंत्री होते. त्यामुळे त्यांना अधिक टाळ्या मिळाल्या, की आणखी कशासाठी हे कळू शकले नसले तरी सर्वांत जास्त टाळ्यांचा कडकडाट सुभाष यांची शपथ संपल्यावर, हे मात्र खरे. या सोहळ्याला सुदिन आणि नीळकंठ शर्ट घालून आले होते. मात्र, सुभाष निळ्या रंगाच्या शर्टवर भगव्या रंगाचे मोदी जॅकेट घालून आले होते. त्यामुळे ते अगदी खुलून दिसत होते. त्यामुळे या साऱ्या सोहळ्यावर त्यांचीच छाप ठळकपणे दिसून आली.∙∙∙

आलेक्सचा रोष दोतोरांवर

काँग्रेसमध्ये असताना कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा काँग्रेस आमदारांपेक्षाही अधिक भरंवसा होता तो त्यावेळी सभापती असलेले त्यांचे मित्र प्रमोद सावंत यांच्यावर. आताही त्यांना मंत्रिपद मिळणार की नाही, याबद्दल तर्क-वितर्क सुरू असताना रेजिनाल्ड आपल्या समर्थकांना सांगायचे, दोतोर आहे तोपर्यंत ‘भिवपाची गरज ना.’ पण शेवटी त्यांच्या दोतोर मित्राने त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवलेच.

शेवटी दुखावलेल्या रेजिनाल्ड यांनी शनिवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणेच पसंत केले. असे म्हणतात की, रेजिनाल्ड यांना आपल्याला मंत्री केले नाही याचे फार मोठे दुःख नाही. मात्र, गेले 25 दिवस आपल्याला झुलवत ठेवले, याचाच जास्त राग आहे. आपल्याला ही वागणूक मिळावी आणि तीही दोतोराकडून, याचेच त्यांना अधिक दुःख झाले आहे.∙∙∙

मंत्रिपदासाठी लॉबिंग

भाजप सरकारात तीन मंत्रिपदे रिक्त होती. त्यासाठी अनेकांनी अगदी खालपासून वरपर्यंत लॉबिंग केले. काहीजणांनी जाती-धर्माचे तर काहीजणांनी समाजाचे कार्ड पुढे करत लॉबिंग केले. पण वाढत्या महागाईने जनता त्रस्त असल्याने त्यापैकी कोणीच पुढे येऊन आपल्याला आमदारकीचे फायदे पुरे, आम्हाला महामंडळसुद्धा नको, असे म्हणणारा एकही माईचा लाल गोव्याच्या राजकारणात निपजला नाही, हे खरे म्हणजे दुर्दैव म्हणावे लागेल.

आमदारकीचे फायदे घेणार, तितकेच महामंडळ पदरात पाडून घेऊन फायदा मिळवणार, मग कसला समाजसेवक म्हणून मान-सन्मान घेऊन फिरणार? त्यापेक्षा आपल्याला आमदारकीशिवाय महामंडळाचा फायदा नको, आमदारकीचा कालावधी संपल्यानंतर कोणताही फायदा नको म्हणणारा कोणी छाती पुढे करून येत असेल तर त्या आमदाराचे स्वागत राज्यातील जनता नक्कीच करील. केवळ मंत्रिपदासाठी लॉबिंग केले आणि जनतेचा विचारच केला नाही तर मग जनताही पाच वर्षांनंतर आपला अधिकार गाजवते. त्यामुळे अशा आमदारांनी आताच सावध व्हावे, असा सूर लोक व्यक्त करू लागले आहेत. ∙∙∙

Sudin Dhavalikar
गोवा लोकसभा निवडणूकीसाठी भाजपची 'धूर्त' खेळी

महत्त्वाच्या मंत्र्यांची दांडी

मंत्रिमंडळ विस्ताराच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात मगोप नेते सुदिन ढवळीकर यांना प्रथम स्थान देण्यात आले. कदाचित ही बातमी कालच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना मिळाली असेल. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, यासाठी आग्रही असलेले रवी नाईक, नीलेश काब्राल आणि गोविंद गावडे, माविन गुदिन्हो यांनी आज शपथविधी सोहळ्याला येणेच टाळले. त्यांची अनुपस्थिती यावेळी जाणवत होती. याशिवाय क्रमांक दोनचे मंत्री विश्‍वजीत राणे आणि मंत्रिपदासाठीचे सर्वाधिक दावेदार असलेले आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही शपथविधीकडे पाठ फिरवली. यावरून सत्ताधारी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे दिसत नसल्याची चर्चा आज सुरू होती. परंपरेनुसार शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेतेही उपस्थित असतात. मात्र, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांचा पत्ताच नव्हता. याचीही खुमासदार चर्चा समारंभस्थळी रंगली होती. ∙∙∙

चारही दिशांना चार तोंडे

फोंडा तालुक्याने यावेळी नवा विक्रमच केला आहे. तेथील सर्व चारही आमदार मंत्री झाले आहेत. तालुक्यासाठी जरी ही अभिमानाची बाब असली तरी त्यामुळे मंत्रिमंडळ एकजिनसी होणार नाही, अशी भीती सत्ताधारीच व्यक्त करताना आढळतात. त्यांचीही काही चूक म्हणता येणार नाही. सुदिन आणि रवी पात्रांव यांच्यात जसा विस्तव जात नाही, तसेच सुदिन आणि प्रियोळच्या गोविंद गावडे यांचे आहे. मागे एकदा त्यांची चक्क मंत्रिमंडळ बैठकीतच जुंपली होती. त्यामुळे या परस्परविरोधी वृत्तीच्या आमदारांना एकत्र आणून मुख्यमंत्र्यांनी हे विकतचे श्राध्द तर घेतले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.∙∙∙

वजनदार फळदेसाईंची सोहळ्यामध्ये चर्चा

सावंत मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात सुभाष फळदेसाई यांनी मात्र बाजी मारली. कारण यापूर्वीच त्यांची उपसभापतिपदी वर्णी लावून मंत्रिमंडळात सामावण्याच्या आकांक्षांचे पंख छाटले होते. प्रत्यक्षात मात्र फळदेसाई यांनी आज सकाळीच उपसभापती पदाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळात स्थानही पटकावले. त्यामुळे फळदेसाई यांचे वाढलेले आणि त्यांनी यासाठी वापरलेले वजन मोठेच होते, अशी चर्चा समारंभस्थळी सुरू होती. त्यासाठी त्यांनी कोणते हुकमी एक्के वापरले, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र, सांगेची अटीतटीची निवडणूक फळदेसाई यांनी एकहाती जिंकली, याचेच त्यांना फळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिल्याने त्यांनी निवडणुकीत घेतलेल्या कष्टांची प्रचीती येते. त्याचीच त्यांना बक्षिसी मिळाली, असे म्हणावे लागेल. ∙∙∙

बाबूंचा रवींशी ‘याराना’

हे रवी म्हणजे फोंड्यातील पात्राव नव्हे, तर बंगळुरू येथील पात्रांव असलेले गोव्याचे प्रभारी सी. टी. रवी. मंत्रिमंडळाच्या विस्तार सोहळ्याला सी. टी. रवी उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हेही उपस्थित होते. या संपूर्ण सोहळ्यावेळी बाबू या रवींच्या मागे सावलीसारखे फिरत असताना कित्येकांनी पाहिले. सोहळा संपल्यावरही रवी ज्या कक्षात गेले, तिथे त्यांच्यासोबत बाबूही गेले. एवढेच नव्हे, तर ते जाताना त्यांना बाबूंनी गाडीपर्यंत पोहोचवून गाडीचे दारही उघडून दिले. बाबूंचा रवींबरोबरचा हा ‘याराना’ कित्येकांना बुचकळ्यात टाकणारा होता. एकूणच त्यांच्या वर्तनावरून बाबू आता नक्कीच नवीन काहीतरी करू पाहतात का? असे वाटल्याशिवाय राहिले नाही.∙∙∙

आताच असे...मग पुढे काय?

दरबार हॉलमधील शपथविधी सोहळ्याला तीन मंत्र्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. हे तीन मंत्री म्हणजे फोंड्याचे पात्रांव रवी नाईक, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे आणि सावंत मंत्रिमंडळात 3 नंबरचे मंत्री असलेले माविन गुदिन्हो हे. या तिन्ही मंत्र्यांचे सुदिन ढवळीकर यांच्याशी संबंध चांगले नसल्याने त्यांनी ढवळीकरांना मंत्रिमंडळात घेण्यास विरोध केला होता. पण ‘वरून’ आदेश आल्याने त्या तिघांचा नाईलाज झाला. तरीही हे तिघेही सोहळ्याला गैरहजर राहण्यामागे ढवळीकरांचा प्रवेश हेच कारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता सुरुवातीलाच असे तर हे चौघेही मंत्रिमंडळ बैठकीत एकमेकांच्या समोर येतील तेव्हा ते काय करतील? कल्पनाच करवत नाही बुवा! ∙∙∙

सासष्टीच्या वाट्याला केवळ महामंडळे

भाजपच्या सासष्टी मिशनचे फलित काय, तर भले मोठे शून्य. हे आम्ही म्हणत नाही तर या महालातील प्रत्येकाच्या तोंडात तेच वाक्य दिसते. कुडतरीच्या रेजिनाल्डने काँग्रेसशी पंगा घेऊन भाजपला विनाअट पाठिंबा जाहीर केल्यावर त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होणार, असाच सर्वांचा कयास होता; पण त्या आशांवर पाणी पडले आहे. त्यामुळे सासष्टीच्या वाट्याला आता एखाद-दुसरे महामंडळ वा एसजीपीडीएच, हे स्पष्ट झाले आहे. आता उल्हास तुयेकरांच्या वाट्याला काय येते आणि रेजिनाल्डना काय मिळते, ते पाहणे रंजक ठरणार आहे.∙∙

खातेवाटपावर मुख्यमंत्र्यांचे मौन

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेच उर्वरित मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली होती. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच खातेवाटप होईल, अशी शक्यता होती. हे विचारण्यासाठी आतुर झालेल्या पत्रकारांना शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी थेट बगल देत राज्यपालांसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे आज शपथविधी झालेल्या मंत्र्यांना खात्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार, याचे स्पष्ट संकेत मिळत होते. आता उर्वरित खात्यांमध्ये वीज, समाज कल्याण, मासेमारी, खाण अशी मोजकीच खाती उरली असली तरी कोणते खाते कुणाला मिळणार? याबाबत मात्र उत्सुकता लागून राहिली आहे. ∙∙∙

Sudin Dhavalikar
गोव्यातील पराभवानंतर काँग्रेसचा आढावा; पदभार सोहळा

‘कहीं खुशी कहीं गम’

शेवटी सुदिन यांची मंत्रिपदी वर्णी लागलीच. त्यामुळे गेले तीन वर्षे आशेने डोळे लावून बसलेल्या मडकईच्या बेरोजगार युवक-युवतींना आता ‘अल्लाद्दिनचा चिराग’ मिळाल्यासारखे झाले आहे. सुदिन मंत्री असताना मडकई मतदारसंघात नोकऱ्यांची खैरात झाली होती. एकेका घरात दोन-तीन सरकारी नोकऱ्या दिल्या होत्या. त्यातल्या बहुतेक साबांखा व वाहतूक खात्यातील होत्या. पण आता सुदिनना ही दोन्ही खाती मिळणार नसल्यामुळे त्यांना बहुतेक वीज खात्यावर समाधान मानावे लागणार, असे दिसते.

साबांखा हे सुदिन यांचे आवडते खाते. त्यामुळे एकीकडे मंत्रिपदाची खुशी साजरी करताना दुसरीकडे बांधकाम खाते न मिळाल्याचे दु:खही आहे. पणजीतला ‘हेरंब’ हा सरकारी बंगलाही सुदिन यांचा आवडता बंगला. पण या बंगल्याचा कृषिमंत्री रवी नाईक यांनी आधीच ताबा घेतला आहे. एकीकडे विरोध असून मंत्रिपद मिळाल्याची ‘खुशी’ तर दुसरीकडे बांधकाम खाते आणि हेरंब बंगला हातातून गेल्याचे ‘दु:ख’ अशी सुदिन यांची अवस्था झाली असून हीच चर्चा आज मडकई व फोंड्यात सुरू होती. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com