पणजी: मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांना खातेवाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांत महत्त्वाचे असलेले वीज खाते मिळाले. विजेसह गृहनिर्माण व अपारंपरिक ऊर्जा ही खातीही या ज्येष्ठ नेत्याकडे सुपूर्द केली आहेत. नीळकंठ हळर्णकर यांना मत्स्योद्योगसह कारखाने आणि बाष्पक, पशुसंवर्धन खाते दिले आहे, तर सुभाष फळदेसाई यांच्याकडे समाजकल्याण, पुराभिलेख आणि पुरातत्व याशिवाय नदी परिवहन खातेही दिले आहे.
अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडे सर्वांत महत्त्वाचे औद्योगिक विकास महामंडळ देण्यात आले, अशी माहिती प्रशासनाच्या संयुक्त सचिव अंजू केरकर दिली.
खाण खात्यासह शिक्षण, गृह, वित्त, दक्षता व कर्मचारीविषयक ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. खाण खात्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. महामंडळ स्थापन करण्यात आले असले तरी त्यासंदर्भातील अनेक व्यवस्था तयार झालेल्या नाहीत. शिवाय खाण लिजांचा लिलाव व खासगी क्षेत्राला कंत्राटाचे काम अशा अनेक बाबी निश्चित करायच्या आहेत. 9 एप्रिल रोजी आणखी 3 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. ढवळीकर यांच्यासह भाजपचे नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांचा यात समावेश होता.
गृह, वित्त, खाण, शिक्षण खाते प्रमोद सावंतांकडेच
याबरोबरच प्रमोद सावंत सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप पूर्ण झाले आहे. मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहणार यात गृह, वित्त, खाण आणि शिक्षण यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 28 मार्च रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, नीलेश काब्राल यांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांकडील खात्यांविषयी भाजप सुकाणू समितीची बैठक
खाण क्षेत्र हे अर्थकारणाशी संबंधित असल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावे, असा विचार भाजपनेच पुढे आणला होता. भाजपच्या सोमवारी सकाळी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत भाजपकडे स्वतःची कोणती खाती असावीत, मगोपच्या नेत्याला कोणते महत्त्वाचे वजनदार खाते द्यावे व सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना महत्त्वाची महामंडळे कोणती द्यावीत, यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. याच सूचनेनुसार खाण आणि शिक्षण ही खाती मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली. तर मंत्र्यांना आज खाती मिळाली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.