Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

St. Francis Xavier DNA controversy: सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विरोधात फुत्कार सोडून हिंदू समाज वश होईल, अशी परिस्थिती गोव्यात नाही. हिंदू समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर या दोघांचे गुण आत्मसात करावे लागतील. दोन्ही समाज एकत्र येऊन गोव्याचा विचार करतील, तेव्हाच लोकांचे कल्याण आणि राज्याचे दीर्घकालीन हित जोपासले जाणार आहे.
St. Francis Xavier DNA controversy: सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विरोधात फुत्कार सोडून हिंदू समाज वश होईल, अशी परिस्थिती गोव्यात नाही. हिंदू समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना भाऊसाहेब बांदोडकर  व मनोहर पर्रीकर या दोघांचे गुण आत्मसात करावे लागतील. दोन्ही समाज एकत्र येऊन गोव्याचा विचार करतील, तेव्हाच लोकांचे कल्याण आणि राज्याचे दीर्घकालीन हित जोपासले जाणार आहे.
Subhash Velingkar | St Francis Xavier Relics DNA Test Canva
Published on
Updated on

सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विरोधात फुत्कार सोडून हिंदू समाज वश होईल, अशी परिस्थिती गोव्यात नाही. हिंदू समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर या दोघांचे गुण आत्मसात करावे लागतील. अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडून आणि हिंदू समाजामध्ये विष कालवून गोव्याची शकले निर्माण करून हे नेतृत्व कधीही वेलिंगकरांच्या हातात जाणार नाही. गोव्यातील हिंदू संघटनांनाही या परिस्थितीची जाणीव आहे. दोन्ही समाज एकत्र येऊन गोव्याचा विचार करतील, तेव्हाच लोकांचे कल्याण आणि राज्याचे दीर्घकालीन हित जोपासले जाणार आहे.

काही दिवसांत गोव्यातली शांतता, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना सलग घडल्या. गोमंतकीय सहसा लगेच माथे भडकवून घेत नाही. रस्त्यावर उतरून दगडफेक, जाळपोळ, हिंसा असले प्रकार करत नाही. हे समाजघातक प्रकार करणे गोमंतकीयांच्या रक्तात नाही. ‘म्हादई’सारख्या मुद्द्यावरही जसा हवा तसा आवाज उठवला नाही; परंतु दोन आठवड्यांपूर्वी गावागावांतून भू-रूपांतरणाविरोधात लोकं रस्‍त्‍यावर उतरले. ग्रामीण भागात झालेली ही जनजागृती व त्यांचे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अनेकांच्या भुवया उंचावून गेले. आपली डाळ सहज शिजणार नाही, याची जाणीव भू-माफियांना व त्यांचे हितरक्षण करणाऱ्यांना झाली.

डोंगर कापणी, झालेली भू-रूपांतरणे यावर सामान्य लोक प्रखरपणे व्यक्त होऊ लागले. अशा वेळी एरव्ही कुणी फारसे लक्ष दिले नसते असे एक वक्तव्य सुभाष वेलिंगकर यांनी केले आणि गेला आठवडाभर तेच गाजत ठेवण्यात संबंधित लाभार्थींना यश आले. वेलिंगकरांनाही तेच हवे होते. गेले किमान एक दशक आपल्याकडे लक्ष वळवण्यात आणि राजकीयदृष्ट्या स्वत:चे उपद्रवमूल्य शाबीत करण्यासाठी ते खपत आहेत. आता सेंट फ्रान्‍सिस झेव्हियर पवित्र अवशेषांचे दशवार्षिक प्रदर्शन नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने ती संधी त्यांना मिळाली.

सुभाष वेलिंगकर पूर्वीपासूनच आपल्या आक्रस्ताळेपणासाठी ओळखले जातात. गोव्यात संघ उभा करण्यासाठी त्‍यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे कार्य कुणी अमान्य करत नाही; पण त्यांची वक्तृत्व शैली कायम भडकावू व वादग्रस्त राहिली आहे. वेलिंगकरांना नेहमीच संघाबरोबर भाजपचे नेतृत्वही स्वत:कडे यावे, अशी महत्त्वाकांक्षा होती. तथापि, मनोहर पर्रीकरांना ती संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. गोव्यात एक नवा राजकीय पक्ष बांधून काढणे सोपे नव्हते.

त्यात पर्रीकरांना वेलिंगकरांची साथ जरूर मिळाली असेल. परंतु, पर्रीकरांचे राजकीय शहाणपण व जबरदस्त विजिगीषू वृत्ती महत्त्वाची ठरली. मनोहर पर्रीकरांनी राजकीय पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक दुखावले जाणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्न केले, जे वेलिंगकरांना कधीच जमले नसते. वेलिंगकरांना स्वत:च्या संघटन कौशल्याबद्दल जरूर काही भ्रम आहेत. त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा वरचढ ठरल्याने ते संघापासून दुरावले गेले व अखेर आक्रस्ताळेपणामुळे त्यांना संघ सोडावा लागला. तद्नंतर सेंट फ्रान्सिस झेवियरविरोधात जहाल वक्तव्य करून स्वत:चे नेतृत्व पुन्हा शाबीत करण्याचा त्‍यांचा प्रयत्न वेळोवेळी दिसून येतो.

वेलिंगकरांनी ‘गोवा सुरक्षा मंच’ स्थापन करत राजकारणात पाऊल टाकले. प्रचारादरम्यान त्यांची भाषणे पाहिल्यास धार्मिक भावना भडकवण्याचे त्यांचे प्रयत्न दिसतात. वेलिंगकरांची ही प्रवृत्ती शिक्षण धोरणाविरुद्धच्या आंदोलनातही दिसली आहे. भाषा आंदोलनातही त्यांची भाषा माथी भडकवणारी होती. भाषा आंदोलनाचा वापर करून संपूर्ण समाज - हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम - एकत्र आणणे शक्य होते. पण, नेतृत्व वेलिंगकरांच्या हाती गेल्यामुळे आंदोलनच फसले.

त्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरणाचा त्यांचा प्रयास फारसा सफल झाला नाही. त्याचा परिणाम निवडणुकीत समोर आला. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. लोकांनी त्यांचे राजकीय नेतृत्व नाकारले. मतदार फक्त मत ‘दान’ करत नाही, तर तो मत व्यक्तही करतो. मतपेटीत व्यक्त झालेले लोकांचे मत राजकारणी समजून घेत नाहीत. त्यांना घ्यायचे नसते किंवा ते त्यांच्यासाठी परवडणारे नसते. गोमंतकीयांना शांतता हवी आहे, धार्मिक कारणांवरून कलह नको आणि तुमचे धार्मिक ध्रुवीकरण आम्हाला मान्य नाही, हेच मत लोकांनी व्यक्त केले होते. पण, वेलिंगकरांना ते उमजले नाही.

दोन आघाड्यांवर अपयश येऊनही वेलिंगकरांना गोव्यातील संपूर्ण हिंदू समाजाचे नेतृत्व करण्याचे वेध लागले. त्यातून त्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांना हात घालायला सुरुवात केली. अल्पसंख्याकांविरोधातील त्यांची मते आधीपासूनच जहाल होती. त्यासाठी त्यांनी इतिहासातले कोळसे उगाळले. गोव्यातील लोकांवर पोर्तुगिजांनी अत्याचार केले हे सर्वज्ञातच आहे. यात गोव्यातील हिंदूंप्रमाणेच मुस्लीम, ज्यू, जैन हेसुद्धा भरडले गेले.

आदिलशहाची मुलगीही ख्रिश्चन झाली होती. मूळ ज्यू असलेल्या डॉ. ग्रासिया द ओर्ता यांच्या बहिणीला जिवंत जाळण्यात आले. त्या इतिहासाला कुणी नाकारतही नाही. पण, त्याचे वर्तमानात काहीही स्थान नाही. आजचा गोमंतकीय समाज ते सर्व विसरून एकोप्याने राहत आहे. आपण पूर्वी हिंदू होतो याची जाणीव व माहिती ख्रिश्चनांना आहे. त्यामुळे, मणिपूरसारख्या इतर ठिकाणी होणाऱ्या धार्मिक दंगली गोव्यात कधीच होणार नाहीत. दंगली तर दूरची गोष्ट, धार्मिक ध्रुवीकरणही होणार नाही. ख्रिश्चन वगळून केवळ हिंदू बहुसंख्य समाज असलेल्या गोव्याची कल्पनाच न टिकणारी आहे.

आजचा गोवा जो संपूर्ण जगाला भुरळ घालतो तो याच बहुधार्मिक इंद्रधनुष्याचे देणे आहे. रा. स्व. संघालासुद्धा गोव्याच्या या वेगळेपणाची जाणीव आहे. या सगळ्याची पूर्ण कल्पना संघाला आहे. म्हणूनच संघाने वेलिंगकरांची पाठराखण केली नाही. गोव्यापुरते संस्थेचे नेतृत्व, राजकीय नेतृत्व गोमंतकीयांनी नाकारल्यामुळे सकल हिंदू समाजाचे नेतृत्व करण्याच्‍या महत्त्‍वाकांक्षेतून त्यांनी ‘सेंट फ्रान्‍सिस झेवियर’चा डीएनए तपासण्याची मागणी पुढे केली.

त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गोवा अशांत झाला नाही, उलट हे प्रकरण त्यांच्यावरच शेकले. सत्र न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. नाही म्हणायला राजकीयदृष्ट्या असफल प्रतिमा कुतिन्हो चेकाळल्या आणि त्यांनी अपेक्षित कृती केली. काही समाजमाध्यमांवरून माथी भडकवण्यात आली. यात चर्च, बिशप कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत म्हणून त्यांच्यावरही अर्वाच्य भाषेत टीका झाली. वेलिंगकरांचा डाव काही प्रमाणात सफल झाला. पण, गोव्याच्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या लढवय्यांच्या लक्षात ही बाब आली.

त्यांनी संपूर्ण ख्रिस्ती समुदायाला शांत राहण्याचे, माथी भडकू न देण्याचे आवाहन केले. हिंदू समाजातील अनेक विचारवंतांनीही शांतता राखण्याचे आवाहन हिंदूंना केले. त्यामुळे प्रचारतंत्राचा वापर करून धर्माच्या नावावर मतांचे एकत्रीकरण करण्याचे काही प्रमाणात सफल झालेले प्रयत्न दोन्ही समाजांनी हाणून पाडले. इथेही वेलिंगकरांच्या पदरी निराशा पडली व अटक टाळण्यासाठी लपून राहायची पाळी त्यांच्यावर ओढवली. अखेर कोर्टाच्‍या सूचनेनुसार त्‍यांना पोलिसांसमोर उभे राहावे लागलेच.

भारतात सध्या लोकांच्या भावना खूप ठिसूळ, तीव्र झालेल्या आहेत. कोणीतरी काही तरी बरळतो आणि आपले ईप्सित साध्य करतो. त्याला खतपाणी घालायला स्थानिक पातळीवर नेते, संघटना तयारच झालेल्या आहेत. अशी भलतीच वैचारिक दिशा देऊन लोकांना कसे वळवावे याचे तंत्र विकसित झाले आहे. हिंदू जवळ यावेत म्हणून खासकरून निवडणुकांआधी मंदिरांमधून असे तंत्र वापरले जाते. समाजामध्ये दुफळी निर्माण करणारे, समाज तोडणारे हे कार्य जसे देशाच्या इतर भागांत यशस्वी होताना दिसते, जसे त्याचे राजकीय लाभ मिळतात, तसे व तेवढ्या प्रमाणात ते गोव्यात मिळत नाहीत. यासाठी गोव्याचा इतिहास, ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. संपूर्ण जगाने समजून घ्यावा, असा गोव्याच्या सामाजिक उन्नयनाचा गाभा समजून घेणे गरजेचे आहे.

वेलिंगकरांचा नेहमी दावा राहिला- पोर्तुगिजांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले! परंतु त्याहूनही अधिक अत्याचार ख्रिस्तींवर झाला आहे, हेही विसरता कामा नये. त्यांना संस्कृतीपासून तोडण्यासाठी कातडे सोलून काढण्यापर्यंत त्यांचा अमानुष छळ पोर्तुगिजांनी केला. खरा ‘इन्क्विझिशन’चा परिणाम हिंदूंवर झाला नाही तर तो नवख्रिस्तींवर झाला. जे ख्रिश्चन धर्मांतरित झाले होते, पण ज्यांनी आपले पूर्वीचे हिंदू रीतिरिवाज सोडले नव्हते त्यांना इन्क्विझिशनच्या छळाला सामोरे जावे लागले.

हजारो वर्षांची परंपरा, संस्कार इतक्या सहज सुटणे शक्यच नव्हते. जरी धर्मांतरित व्हावे लागले तरी पोर्तुगीज फार काळ टिकणार नाहीत, अशी त्यांची भावना होती. जरी काही लोक जमीन, पद, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ख्रिश्चन झाले असले तरीही आपल्या कुटुंबापासून, देवांपासून उचकटून टाकल्यामुळे ख्रिश्चन झालेल्या बहुसंख्य लोकांना हे फार काळ टिकणार नाही, असेच वाटत होते. पण, इन्क्विझिशन बराच काळ टिकले. त्यातून लोकांवर अमानुष अत्याचार झाले हे निर्विवाद सत्य आहे.

लोकांना धर्म बदलला जाण्यापेक्षाही नाती दुरावली याचे जास्त दु:ख होते. एक भाऊ हिंदू तर दुसरा ख्रिश्चन अशी परिस्थिती ओढवली होती. आजही बहुतांश ख्रिस्ती समाज त्यातून सावरला नाही. आपण पूर्वी कोण होतो, आपले कुटुंब कोणते होते याचे भान त्यांना आजही आहे. त्यांच्या जखमा भरल्या नाहीत. ग्रामदेवतेला नारळ ठेवल्याशिवाय अनेक ख्रिस्ती आपले महत्त्वाचे कार्य करत नाहीत. त्याप्रमाणेच अनेक हिंदूंनाही आपले पूर्वज ख्रिस्ती झाले, आपल्या कुटुंबापासून दूर गेले याचे दु:ख आहे. नावे, आडनावे बदलली, धर्म बदलला; पण हृदयातले मर्मबंध आजही टिकून आहे. फेस्ताला जसे ख्रिश्चन जातात, तसेच मोठ्या संख्येने हिंदूही जातात.

इतिहासात कितीही, काहीही वाईट झालेले असले तरी वर्तमान कुणालाही सुटत नाही. दैनंदिन व्यवहारही चुकत नाहीत. नेहमीच्या चालण्याबोलण्यात खुपणाऱ्या गोष्टी येऊ नयेत एवढी दक्षता गोमंतकीय पाळतो. म्हणूनच गणेश चतुर्थीला ‘नेवऱ्या’ खायला ख्रिस्ती हिंदूंच्या घरी येतात व नाताळाला हिंदू ख्रिश्चनांच्या घरी भेट देतात. केवळ उत्सवापुरते हे मर्यादित राहत नाही. कुणी दिवंगत झाले तर त्याचे दु:ख फक्त त्या एका कुटुंबापुरते उरत नाही. गेलेला माणूस आठवतो, त्याचा धर्म आठवत नाही व आडही येत नाही. हे सुखदु:खातले अनुबंध तोडून टाकलेले कुणाही गोमंतकीयाला नकोत. त्याच्या मनातही असे विचार येत नाहीत. जुन्या जखमांसह पुढे जाणे गोमंतकीयाला जमते. त्यावरची खपली काढून या चिघळाव्यात व त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधला जावा, असे राजकारण्यांना व त्यांच्या मिंध्यांना वाटते; सामान्य गोमंतकीयाला नाही.

St. Francis Xavier DNA controversy: सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विरोधात फुत्कार सोडून हिंदू समाज वश होईल, अशी परिस्थिती गोव्यात नाही. हिंदू समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना भाऊसाहेब बांदोडकर  व मनोहर पर्रीकर या दोघांचे गुण आत्मसात करावे लागतील. दोन्ही समाज एकत्र येऊन गोव्याचा विचार करतील, तेव्हाच लोकांचे कल्याण आणि राज्याचे दीर्घकालीन हित जोपासले जाणार आहे.
St. Xavier DNA controversy: आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या! 'वेलिंगकर' प्रकरणावरुन कुतिन्हो यांचा सरकारवर घणाघात

असे असले तरीही समाजभेदींचे प्रयत्न काही प्रमाणात सफल होतात. हिंदूंप्रमाणेच ख्रिस्ती समाजाचेही ध्रुवीकरण होऊ लागले आहे. अजिबात धार्मिक बाजू नसलेल्या गोष्टीसही केवळ धार्मिकतेमुळेच विरोध झाल्याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कॅथलिकांच्या वागण्याने मीही दुखावला गेलो आहे. ‘पांडव कपेल’च्या भागातील एका चौकाला दिवंगत चंद्रकांत केणी यांचे नाव द्यावे, असा विचार मांडण्यात आला तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला. वातावरण कलुषित करण्यात आले. वास्तविक चंद्रकांत केणी त्याच भागात राहायचे.

सामाजिक सद्भावना जपणारा त्यांच्यासारखा माणूस त्या भागात झाला नाही. त्यांचे कार्य, त्यांचे स्थान याबद्दल कधी कुणी शंकाच व्यक्त केली नव्हती. त्यांना मानणारे ख्रिस्तीही खूप मोठ्या प्रमाणात होते. पण, तरीही कारण नसताना चर्चने विरोध केला आणि सर्व कॅथलिक चर्चच्या बाजूने उभे राहिले. शांत असणारे वातावरण दूषित झाले. ज्याची काहीच गरज नव्हती. ‘पांडव कपेल’ हे सर्वांच्या तोंडी असलेले नावही नकोसे झाले आहे. या अशा नावे पुसून टाकण्यामागे, अस्मिता टोकदार होऊन विरोध करण्यामागे असलेली कारणे जाणून घेतली पाहिजेत. त्यांच्या जखमा भरतील, त्यावरची खपली निघणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

२२ टक्के उरलेल्या ख्रिश्चनांना हिंदूंनी जपले पाहिजेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आज आपण जे गोवा स्वतंत्र राज्य म्हणून मिरवतो, ते त्यांच्यामुळेच शक्य झाले आहे. अन्यथा गोवा हा महाराष्ट्राचा एक लहानसा दुर्लक्षित जिल्हा किंवा कोकणचा एक भाग बनून राहिला असता. गोमंतकीय म्हणून आपले अस्तित्वच उरले नसते. पर्यटक कारवार, मंगळूरला भेट देत नाहीत; पण गोव्यात येतात, यालाही इथले कॅथलिक कारणीभूत आहेत. इथले आदरातिथ्य कॅथलिकांमुळे जगात आदरणीय ठरले आहे. त्यांचे जेवण, त्यांचे संगीत, त्यांची संस्कृती हे जागतिक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. समाजमंथनातून धर्मच्छल हे हलाहल बाहेर पडले असले तरी त्यातून जी अनोखी सर्वसमावेशक संस्कृती घडली, ते अमृत आहे. हे अमृत सांभाळायला हवे. ती गोमंतकीय संस्कृती टिकवायला हवी.

St. Francis Xavier DNA controversy: सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विरोधात फुत्कार सोडून हिंदू समाज वश होईल, अशी परिस्थिती गोव्यात नाही. हिंदू समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांना भाऊसाहेब बांदोडकर  व मनोहर पर्रीकर या दोघांचे गुण आत्मसात करावे लागतील. दोन्ही समाज एकत्र येऊन गोव्याचा विचार करतील, तेव्हाच लोकांचे कल्याण आणि राज्याचे दीर्घकालीन हित जोपासले जाणार आहे.
Subhash Velingkar: धार्मिक भावना दुखावल्या नसल्याच्या मतावर 'ते' ठाम! पोलिस स्थानकात 'एंट्री' मात्र पत्रकारांना चुकवत

यासाठी दोन्ही समाजांतील विचारवंतांनी एकत्रितपणे धुरा आपल्या हाती घ्यावी लागेल. अन्यथा असे प्रकार घडत राहतील. गोव्यातील हिंदूंच्या समस्या दूर करून, त्यांच्या जमिनी वाचवून, सर्व स्तरांवरील समाजाला एकत्र घेऊन पुढे गेल्याशिवाय हिंदूंचे नेतृत्व करता येणार नाही, ही बाब वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्‍या वेलिंगकरांच्या लक्षात येत नाही. आपण जे काही करतोय, त्यामुळे हिंदू समाजाला ‘तालिबानी’ बनवत आहोत, हेही त्यांच्या ध्यानी येत नाही.

ही कट्टरता निदान गोव्यात तरी चालणार नाही, हे संघाला पुरेपूर माहीत आहे. संघाच्या मुशीत वाढलेल्या वेलिंगकरांना मात्र नाही. चर्चनेही ख्रिस्ती धर्माची आध्यात्मिक बाजू धर्मीयांना अनुसरण करण्यास सांगावे. चर्च, धर्मगुरू यांनी ख्रिश्चनांची सामाजिक व राजकीय भूमिका ठरवू नये. वेलिंगकरांच्या वक्तव्यावर जी भूमिका घेतली, जो संयम चर्चने दाखवला तो खरोखर वाखाणण्यासारखाच आहे. इतर धर्मसंस्थांसाठी अनुकरणीय आहे. क्लॉड अल्वारिस, ऑस्कर रिबेलो, सबिना मार्टिन्स यांसारखी तारतम्याने वागणारे विचारवंत समोर आले.

डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी तर संपूर्ण गोवेकर समाजाला वैचारिक दिशा दिली. ते म्हणतात, इतिहास उकरून काढण्याऐवजी आमच्या तरुणांना उद्याच्या गोव्याचे खरेखुरे स्वप्न दाखवा. भविष्यातील गोवा आपल्या हातून निसटत चालला आहे. सर्व समाज एकत्र आल्याशिवाय आपला गोवा शिल्लक राहणारच नाही. अशा या अस्तित्वाच्या टोकावर उभ्या असलेल्या गोव्याला वाचवण्यासाठी त्याची धार्मिक शकले पाडून किंवा हिंदू समाजाचा मनभेद, बुद्धिभेद करून काही साध्य होणार नाही. सर्व समाजाने एकत्र येऊनच गोव्याला वाचवण्याचे उत्तरदायित्व घ्यावे. समाजातील बुद्धिवाद्यांनी हे आव्हान स्वीकारावे. मागे नव्हे तर समाजाला पुढे घेऊन जाणारे, आजच्या समस्यांवर बोलणारे, चिंतन करणारे व गोव्याचे सर्वसमावेशक अस्तित्व टिकवून ठेवणारे लोक सर्व स्तरांतून एकत्र यावेत. त्यांनी समाजाला दिशा द्यावी. हेच वेलिंगकरांसारख्यांच्या फुत्कारांना तारतम्याने दिलेले संयमी व सुसंस्कृत उत्तर ठरेल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com