Subhash Faldesai : लोलये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर ग्रीन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
भगवती पठारावर आयआयटी, शिवाय फिल्म सिटी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तसेच अन्य प्रदूषणमुक्त प्रकल्पांचा विचार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला अजिबात धोका पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय काणकोणमधील अस्तित्वात असलेल्या स्थानिक जल पुरवठ्यावर या प्रकल्पांचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
ही जमीन लोलये कोमुनिदाद मालकीची असून या जमिनीच्या वापरासंबंधी कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. भागीदारी तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सरकार या प्रकल्पांसाठी निविदा जारी करणार आहे. त्यानंतर जे प्रकल्प सर्वाधिक महसूल देणार आहेत, त्या प्रकल्पांना सरकार मान्यता देणार असल्याचे सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
...तर आयआयटी लोलयेतच
सांगे येथे आयआयटी प्रकल्पासाठी दुसरी जमीन पाहिली आहे. पहिल्यांदा पाहिलेली जमीन मृदा तपासणीनंतर योग्य नसल्याने केंद्र सरकारने त्या जमिनीला हिरवा कंदील दाखवला नाही. दुसऱ्या जागेलाही मान्यता न मिळाल्यास आयआयटी प्रकल्पासाठी लोलये येथील भगवती पठाराचा विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती सुभाष फळदेसाई यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.