

पेडणे: येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील हंगामी तथा तासिका पद्धतीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदलीविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत वर्गांवर बहिष्कार टाकत विद्यालय परिसरात निदर्शने केली. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक वर्षे विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अचानक इतरत्र हलविल्याने शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत, ‘आम्हाला न्याय हवा, आम्हाला न्याय द्या’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयात अनेक वर्षांपासून तासिका पद्धतीवर काही शिक्षक अध्यापन करीत आहेत. काही शिक्षक तब्बल सहा, आठ, दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ या विद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे अचानक या शिक्षकांची बदली करून त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला मिशन फॉर लोकलचे संस्थापक राजन कोरगावकर, काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच, याबाबत मुख्यमंत्री व शिक्षण खात्याला निवेदन देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी कोरगावकर यांनी सांगितले की, या विद्यालयात काही शिक्षक अनेक वर्षांपासून तासिका पद्धतीवर अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक निकालातही योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून किमान चालू शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना विद्यालयात सामावून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत
यावेळी विद्यार्थ्यांनी, ‘आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत. आमच्या शिक्षणाचे नुकसान करू नका, आम्हाला न्याय हवा’, अशा मागण्या केल्या. तसेच, न्याय मिळेपर्यंत आम्ही वर्गात बसणार नाही, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
प्राचार्यपद रिक्त
या विद्यालयात सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत असले, तरी पटसंख्येच्या तुलनेत पुरेसा शिक्षकवर्ग येथे उपलब्ध नाही. प्राचार्यपदही रिक्त असून उपप्राचार्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे काही पालकांनी यावेळी सांगितले.
पाच शिक्षकांची नियुक्ती
राजन कोरगावकर यांनी उपप्राचार्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या बदलीबाबत तसेच विद्यालयातील सद्यस्थितीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यालयात शासनाकडून पाच नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे शिक्षक पदोन्नतीनंतर विद्यालयात पाठविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.