केपे : आज दुपारी 1.30 वा. कुडचडे येथील शिवाजी चौकाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने एका महिलेला धडक दिली. ही महिला रस्त्याशेजारी बसची वाट बघत उभी होती. या महिलेसोबतच एका विध्यार्थीनीला आणि आणखी एका महिलेला धडक दिल्याने या तिघींनाही मडगाव येथे जिल्हा रूग्णालात दाखल करण्यात आले आहे.
दैव बलवत्तर होते म्हणून या अपघातातून जीवित हानी झाली नसल्याचे उपस्थित लोकांनी सांगितले. या अपघातात अन्य दोन विद्यार्थीनींना किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात येत आहे.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि.9 रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर शिवाजी चौकाजवळ बससाठी उभ्या असलेल्या कुडचडेहून सांगे मार्गे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने येऊन रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थिनीला आणि एका महिलेला ठोकर दिल्याने त्या दोघीही वाहनाच्या खाली अडकून पडल्या.
सदर अपघात भर चौकात घडल्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्वरित गाडी उचलून दोघींनाही बाहेर काढून काकोडा सरकारी आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांना पुढील उपचारासाठी मडगाव येथे जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कुडचडे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातास कारणीभूत वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
कुडचडे बाजारात मुख्य विद्यालये असल्याने सुमारे अडीच हजार विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात व यासाठी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी कुडचडेतील प्रमुख रस्त्यावर पोलिसांना तैनात करावे, अशी मागणी प्रदीप काकोडकर यांनी केली आहे.
शाळा सुटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना रस्त्यावरून कसे चालावे ते कळत नसल्याने ते मिळेल तसे रस्त्यावरून धावत असल्याचे दिसून येते. यासाठी कुडचडे पोलिसांनी प्रमुख रस्त्यावर व चौकात पोलिसांना तैनात करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.