Goa School: मानसिक आरोग्याविषयी आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. अनेक नागरिक स्वतःहून आपल्या समस्यांबाबत डॉक्टरांशी सल्लामसलत करत असतात पंरतु दिवसेंदिवस मनोरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील 8 पैकी 1 विद्यार्थ्यांमध्ये मानसिक रोगाची लक्षणे आढळून येतात.
नैराश्य, तणाव, तसेच इतर समस्यांतून बाहेर पडण्याचे जीवन कौशल्य हा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे मत ‘कुज’ संस्थेचे संचालक डॉ. पीटर कास्टेलिनो यांनी व्यक्त केले. ते ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात ‘सांगात’ संस्थेच्या डॉ. देविका गुप्ता, ‘सेतू’ संघटनेचे नीलेश वरक यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान डॉ. देविका गुप्ता म्हणाल्या आपल्याला ज्यावेळी ताण येतो, नैराश्य येते, त्यावेळी आपल्याला आत्महत्येचा विचार येतो.
परंतु अशा ताण-तणावातून नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत,हे शिकवणे म्हणजेच जीवन जगण्याची कला शिकविल्यास त्या मार्गाचा अवलंब करता येईल. त्यासाठी जीवन कौशल्य अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे.
वाढत्या आत्महत्या चिंताजनक
आपल्या देशात तरूणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतेय ही चिंतेची बाब आहे. मानसिक आजार समस्या मातेच्या गर्भापासून असू शकते. मुलांच्या हसण्या, बोलण्यास उशीर होणे, अाकस्मित स्वभावात बदल, कधी-कधी शांत राहणे, आकस्मित राग वाढणे, स्वभावात बदल, अशी लक्षणे दिसतात. यासाठी वेळीच योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यासोबत आत्महत्या किंवा मानसिक रूग्णांत घट होण्यासाठी प्रयत्न करणे, हे आपल्या सर्वांचे सामाजिक दायित्त्व असल्याचे डॉ. पीटर कास्टेलिनो यांनी सांगितले.
वेळीच शंकासमाधान गरजेचे
पौगंडावस्थेत अनेक शारिरीक, मानसिक बदल होत असतात. अशावेळी तरूणाईला अनेक प्रश्न पडलेले असतात, त्यावेळी त्यांच्या प्रश्नांचे वा शंकाचे समाधान करणे गरजेचे आहे. परंतु अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रेमसंबंध तसेच इतर प्रश्नांबाबत समुपदेशन करण्यास दिले जात नसल्याचे सांगितले जाते. परंतु या विषयांवर देखील आवर्जुन बोलणे किंवा समुपदेशन करणे गरजेचे आहे. अशा संवेदनशील विषयांना हाताळणे काळाची गरज असल्याचे डॉ. देविका गुप्ता यांनी सांगितले.
पारिवारिक वातावरण महत्त्वाचे ः ‘सेतू’ संस्थेद्वारे जन्मलेल्या मुलांपासून १९ वयोमर्यादेपर्यंतच्या मुलांच्या मानसिक आरोग्यावर काम केले जाते. त्यांच्या सामाजिक, पारिवारिक वातावरण मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरत असते. याबाबत जागृतीसाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम देखील राबविण्यात येत असल्याचे ‘सेतू’ संघटनेचे नीलेश वरक यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.