

वास्को: येथील विविध शैक्षणिक संस्थाप्रमुख तसेच इतर संस्थांच्या प्रतिनिधीसमावेत मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक यांनी बैठक घेऊन विद्यालय तसेच संबंधित संस्थांच्या आवारात भटकी कुत्रे येऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी चर्चा केली. शैक्षणिक संस्था व इतर संस्था परिसरात भटकी कुत्री चावण्याच्या घटना शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टावर सिध्दीविनायक नाईक यांनी भर दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुरगाव पालिका क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थाप्रमुख तसेच बस स्थानक, विविध आरोग्य केंद्र, इस्पितळ संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.
शाळा आवारात भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी आठ आठवड्यांत योग्य कुंपण, दरवाजे, व इतर संरचनात्मक उपाययोजना करणे, भटकी कुत्री आवारात येऊ नयेत यासंबंधी देखरेख करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी नोडल अधिकारी नेमणे, नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क तपशील ठळकपणे प्रदर्शित करणे यासंबंधी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी एक सरकारी व एक अनुदान प्राप्त अशा दोन विद्यालयांच्या प्रतिनिधींनी शाळेच्या परिसरात कुंपण नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चिखली उपजिल्हा इस्पितळाच्या प्रतिनिधीने पायाभूत सुविधांवर झालेल्या मोठ्या खर्चामुळे कुंपण अपूर्ण राहिल्याचे सांगितले. सिध्दीविनायक नाईक यांनी संबंधित समस्यांची व तेथील भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पडताळण्यासाठी पाहणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
मुरगाव पालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांनी तसेच इतर सार्वजनिक संस्थांनी एक डिसेंबरपर्यंत आपल्या सीमांकनात कुंपण उभारावे. जर निर्धारित वेळेत निर्देशाचे पालन करण्यात आले नाही, तर त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल, असे सिध्दीविनायक नाईक यांनी स्पष्ट केले. पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक देणे तसेच संबंधित शैक्षणिक संस्थाच्या आवारातील कुंपणाची सद्यस्थितीसंबंधी माहिती देण्यासंबंधी सूचना केल्या.
विद्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यास तेथे कुत्र्यांची संख्या वाढू शकते, कुत्रा चावण्याच्या घटना वाढू शकतात.
त्यामुळे भटक्या कुत्र्यांना तेथे खायला देऊ नये. पीपल फॉर ॲनिमल एजन्सीने अतिरिक्त जागा व पायाभूत सुविधांची गरज असेल, तर पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.
आवश्यक कारवाई सुलभ करण्यासाठी भटक्या कुत्र्यांची ठिकाणे छायाचित्रांसह प्रसिध्द करावीत, असे आवाहन नाईक यांनी केले.
रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी उपद्रवी ठरत असलेली भटकी गुरे, कुत्रे व इतर जनावरांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे, त्या संदर्भात मडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरपालिका अभियंता दीपक देसाई यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. या संयुक्त बैठकीला वाहतूक, सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व गोशाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शहरात पालिकेची आहे. त्याप्रमाणे नोडल अधिकारी नियुक्त करून वरील सर्व खात्यांचे व पालिकेचे अधिकारी मिळून एक पथक तयार करणे आवश्यक आहे. हे पथक तयार झाल्यावर गुरुवारपासून मोहीम राबवणे सुरू झाले. त्यामुळे आता मडगावात रस्त्यावर भटकी गुरे दिसणार नाहीत, याची दक्षता पालिका घेणार आहे.
नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले की जे कोण रस्त्यावर आपली गुरे सोडतात त्यांनी तसे न करता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
नगरपालिका अभियंता दीपक देसाई यांनी सांगितले की, भटक्या गुरांसंदर्भात यंत्रणा तयार करण्यासाठी ही बैठक झाली. काही गोप्रेमी भटकी गुरे किंवा कुत्र्यांना नेताना अडवतात. पण आता तसे करता येणार नाही. जर कोणी अडवत असेल तर गोशाळा किंवा कुत्र्यांच्या निवारा घरातील प्रतिनिधींना पोलिस संरक्षण दिले जाईल, असे देसाई यांनी सांगितले. गुरांच्या कानाला टॅग बांधणे गरजेचे आहे. तसे केल्याने ही गुरे नेमकी कुणाची याची ओळख पटेल, असेही देसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.