

पणजी: राज्यात यापुढे भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न घालता येणार नसल्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोमवारी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक क्रीडा संकुले, बस स्थानके, डेपो आणि रेल्वे स्थानकांवरील भटक्या कुत्र्यांवर येत्या २० नोव्हेंबरपर्यंत नियंत्रण मिळवण्याचे निर्देशही त्यांनी सांगितले. गोव्यासह देशभरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ते स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांवर टोळ्यांनी हल्लेही करीत असल्याच्या घटना घडत आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबतचे प्रतिज्ञापत्र आठ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार मुख्य सचिव डॉ. कंदवेलू येत्या १५ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित एका अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी योग्य कुंपण उभारावे, कॅम्पसच्या देखभालीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा, महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायतींनी दर तीन महिन्यांनी या कॅम्पसची तपासणी करावी, पकडलेल्या भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करावी,
पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना जिथून उचलले होते, तिथे परत न सोडता, त्यांना स्वतंत्र शेडमध्ये स्थलांतरित करण्यात यावे तसेच भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न खायला घालू नये, अशी मार्गदर्शक तत्त्वे सर्वोच्च न्यायालयाने जारी केली होती. या सर्व तत्त्वांची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही डॉ. कंदवेलू यांनी बैठकीत दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.