Margao News : एकीकडे प्रदूषणाचे कारण देत 15 वर्षांवरील वाहने स्क्रॅप करण्याची मोहीम राबवताना दुसरीकडे मात्र वातावरणाला मारक असलेल्या कोळसा वाहतुकीला प्रोत्साहन देत राज्य सरकार प्रदूषणाच्या बाबतीत दुहेरी मापदंड वापरत असल्याचा आरोप दक्षिण गोवा युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी केला आहे.
गोवा प्रदेश युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुटबण जेटी येथे सोमवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते.
कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी वीजेच्या नैसर्गिक स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असताना राज्य सरकार मात्र कोळसा वाहतुकीला प्रोत्साहन देत प्रदूषणामध्ये भर घालत आहे. सरकार याचे कसे समर्थ करेल, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अधिकारी तसेच सरकारी यंत्रणेने स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीसुद्धा निसर्गाप्रती आपले कर्तव्य समजून जबाबदारीने वागले पाहिजे. जेटीवर जमलेल्या स्वयंसेवकांनी यावेळी जेटीवरील कचरा एकत्र केला. खुल्या जागेत कचरा टाकणे टाळले पाहिजे. कचर्याचे वर्गीकरण करून लोकांनी एका ठरवून दिलेल्या जागेवर तो टाकला पाहिजे, असे नाडर म्हणाले.
कचर्यामुळे गटारे तुंबतात. त्यामुळे पावसाळ्यात पूरासारखी परिस्थिती उद्भवते. हा कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जमा होतो. त्यामुळे वातावरणाची हानी होते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आमची सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे.
शहरी आणि स्थानिक नागरी संस्थांनी स्वच्छतेची खात्री करण्यासाठी लोकांना नियमितपणे शिक्षित करणे आवश्यक आहे, तसेच मोकळ्या जागेत टाकलेला कचरा गोळा केला जातो आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते हे देखील सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
राज्य युथ काँग्रेसच्या उपाध्यक्ष केनिशा मिनेझिस यांनी प्लास्टिक कचरा हे मोठे आव्हान असल्याचे यावेळी सांगितले. लोकांनी प्लास्टिकचा वापर हळुहळू कमी केला पाहिजे. प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तू वापरल्या पाहिजेत. त्यामुळे आम्हाला आमचा निसर्ग वाचवणे शक्य होणार आहे.
निसर्गाला पूरक बाबी अनुसरल्या पाहिजेच. त्यामुळे आम्ही बदल घडवू शकतो, असे त्या म्हणाल्या. युथ काँग्रेसने यावेळी लोकांना मोठ्या संख्येने झाडे लावण्याचे आवाहन करताना त्यानी निगा राखण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.