Goa Congress गोवा कोकणी अकादमीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी आणि ताबडतोब नवीन अध्यक्ष नेमावा, अशी मागणी करीत काँग्रेसने या सर्वोच्च पदासाठी आरएसएसमधून कोणालातरी आणण्याची तयारी तर नाही ना? असा सवाल त्यांनी केला आहे.
काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी शनिवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी विल्मा फर्नांडिस, केनिशा मिनेझीस व महेश नादार यावेळी उपस्थित होते.
पणजीकर म्हणाले, भाजप सरकार कोकणी लेखकांची फसवणूक करत आहे. नवोदित लेखकांना योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत आहे. कोकणी भाषेच्या प्रगतीसाठी आणि तिच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान राहिले आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रयत्नाने आमची मातृभाषा कोकणी भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट झाली. आपल्याला घटकराज्याचा दर्जाही मिळाला. परंतु कोकणी अकादमीवर सुरू असलेले राजकारण पाहून दुःख होत आहे.
माजी खासदार स्व. शांताराम नाईक यांनी त्यावेळी आपल्या निधीतून मोबाईल व्हॅन लायब्ररी अकादमीला दान केली, पण हे सरकार ते वाचनालय सांभाळण्यात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात ते वाचनालय नेण्यात अपयशी ठरले.
कोकणी अकादमीला कायमस्वरूपी जागा देऊन तिच्या वारंवार स्थलांतराचा प्रकार थांबवला पाहिजे. सध्याची जागा कायमची आहे की तात्पुरती आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.
कादमी अध्यक्षपदाचा अरुण साखरदांडे यांचा कार्यकाळ जानेवारीत संपला असला तरी नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
जोपर्यंत नवीन अध्यक्षाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत नवीन समिती आणि योजना कशा सुरू होतील. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने कधीच पूर्ण होत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.